सुभाष बावनी भाग २६ | ऑर्लॅंडो मॅझ्यूटा –
“मी माझ्या बायकामुलांच्या काळजीने घाबरून गेलो होतो उत्तमचंदजी, मला माफ करा!” रस्त्यात गाठ पडलेला रामलाल उत्तमचंदांना अजीजीने म्हणाला.
“स्वतःच्या बायकामुलांची काळजी करणारे आपण सगळेच सामान्य लोक आहोत रामलाल; पण दुसऱ्याच्या बायकामुलांची काळजी करणारे सुभाषबाबूंसारखे लोक जेव्हा घरातून बाहेर पडतात नं; तेव्हा त्यांना मदत करता येत नसेल, तर निदान त्यांना त्रास होईल, असे तरी वागू नये!” उत्तमचंद उद्वेगाने म्हणाले.
“माझं चुकलं उत्तमचंदजी. पण मी वचन देतो की मी हे कुणापाशीही बोलणार नाही. तुम्ही त्यांना परत घेऊन या.”
“आता तर ते नेमके कोणत्या सराईत गेले हे तर मलाही माहिती नाही. काबूलमध्ये आहेत की आसपासच्या एखाद्या खेडेगावात जाऊन लपले, हेही समजायला मार्ग नाही.” निराश झालेले उत्तमचंद रामलालचा निरोप घेऊन निघाले.
सराईतील जेवणामुळे सुभाषबाबूंना अपचनाचा त्रास सुरू झाला, तेव्हा भगतराम त्यांना घेऊन एक दिवस अवचित उत्तमचंदांच्या दारात उभा राहिला. त्यांना पाहून उत्तमचंदांना अतिशय आनंद झाला. आता तसा वाच्यता होण्याचा धोका टळला होता.
घरगुती जेवणामुळे तब्येतह सुधारत होती, पण सुभाषबाबूंचं मन रमत नव्हतं. त्यांना दिसत होते फक्त युद्ध! ऐकू येत होते फक्त धडाडणाऱ्या तोफांचे आणि कानठळ्या बसवणाऱ्या डॉक्यूटा विमानांचे आवाज! जर्मनीकडून काही प्रतिसाद नाही. काय करावं? या चिंतेत सुभाषबाबू-भगतराम-उत्तमचंद बसले असतानाच जर्मन दूतावासातल्या हेर थॉमसचा निरोप आला-
“इटालियन दूतावासात जाऊन आल्बर्टो पिएन्नो कारोनी यांना जाऊन भेटा!”
त्याप्रमाणे सुभाषबाबू आणि भगतराम इटालियन दूतावास धुंडाळत कारोनी समोर उभे राहिले.
“हे बघा मिस्टर बोस! उशीर होतोय हे खरं आहे, पण काही गोष्टींना इलाज नसतो. आपल्याला बर्लिनला पोहोचवण्याचं काम जर्मनी आणि इटली यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी होणार आहे. जर्मन वकिलातीवर ब्रिटिशांची पाळत असल्याने आपल्याला इटालियन पासपोर्टवर पाठवायचे आहे. वकीलात तुम्हाला रशियाच्या सीमेजवळ कुठल्यातरी स्टेशनवर पोहोचवेल, तिथून आगगाडीने मॉस्को आणि मॉस्कोवरून विमानानं बर्लिन! आपल्या रशियन व्हिसासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राहिला तुमच्या पासपोर्टचा प्रश्न; तर पुढच्या आठवड्यात आमचा ओरलँडो मॅझ्युटा नावाचा एक अधिकारी काबूलमध्ये येतोय. त्याच्याच पासपोर्टवर तुमचा फोटो चिकटवून ते काम होईल. त्यासाठी तुमचे फोटो लागतील. ते लवकरात लवकर द्या”
आता पठाणी झगा उतरवला गेला. थ्री पीस सूट अंगावर चढला. डोक्यावरील फेट्याची जागा फेल्ट हॅटने घेतली. दाढी कोरून थोडी आखूड केली गेली. मोहम्मद झियाउद्दिन पाहता पाहता ओरलँडो मॅझ्युटा होऊन गेला.
पासपोर्टचे काम झाले. निघण्याची तारीख ठरली. १८ मार्च! आदल्या दिवशी सुभाषबाबूंचं सामान कारोनी यांच्या घरी पोचवलं गेलं. शेवटी निरोप घ्यायची वेळ आली. उत्तमचंद-रामदेवी नमस्काराला वाकले. रामोदेवी म्हणाल्या,
“सुभाषबाबू! आम्ही गरीब माणसं! आपल्याशी बोलताना, वावरतांना आमच्याकडून काही आगळीक झाली असेल तर आम्हाला माफ करा.”
“झाली आहे तर!” सुभाषबाबू हसून म्हणाले,
“जेवताना तुम्ही सगळेजण आपापल्या ताटातला परोठा आग्रहा आग्रहाने मला खाऊ घालायचात, ही गोड आगळीक मी कधीही विसरणार नाही.”
हेलावून गेलेला भगतराम दूर उभा होता. गेल्या काही दिवसात सुभाषबाबू हेच त्याच्या जगण्याचं उद्दिष्ट झालं होतं. पेशावर ते काबूल प्रवासात कुठेही निराशाजनक प्रसंग घडला, तर सुभाषबाबू त्याला विचारीत, “रहमतखान अब क्या होगा?”
आणि भगतराम वातावरण हलकं करण्यासाठी
“जी सब ठीक होगा, आज नहीं तो कल!” अशा शब्दात सुभाषबाबूंना आश्वस्त करत असे. असे अनेक अनेक प्रसंग मनात साठवून माघारी फिरणारा भगतराम नमस्काराला पुढे झाला; त्याला सुभाषबाबूंनी धरलं आणि घट्ट मिठी मारली. निरोपाचे हात हलले. गाडी समरकंदच्या दिशेने चालू लागली. भगतराम आणि उत्तमचंद कितीतरी वेळ हात उंचावून गाडी गेलेल्या दिशेने पाहत होते. समरकंदवरून मॉस्कोपर्यंत आगगाडीने व तिथून विमानाने बर्लिन असा प्रवास करून सुभाषबाबू २८ मार्च १९४१ ला जर्मनीत पोहोचले.
भगतराम सरळ कलकत्त्याला न जाता आधी बरद्वानला गेला. तिथून लोकलने कलकत्त्यात उतरून हॉटेलमध्ये राहिला आणि एका संध्याकाळी शरदबाबूंच्या वूडबर्न पार्क येथील घरी पक्षकाराच्या अविर्भावात पोहोचला. भगतरामने शरदबाबूंना सुभाषचंद्रांचे बंगालीतील पत्र, ‘फॉरवर्ड ब्लॉक कशासाठी?’ हा आणि ‘अ मेसेज टू माय कंट्रीमेन फ्रॉम समव्हेअर इन युरोप’ असे दोन लेख ही कागदपत्रे दिली.
पुढे वर्षभरानंतर सुभाषबाबूंचे उत्तमचंदांच्या घरातील वास्तव्य उघडकीस आले. अफगाण सरकारने उत्तमचंदांना काबूल सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिला. कुटुंब, व्यापार, घर यामुळे दिलेल्या वेळेत काबुल सोडणं उत्तमचंदांना शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांना अटक करून जलालाबाद येथील अंधार कोठडीत ठेवले. राहते घर, दुकान यासह सर्व स्थावर-जंगम मालमत्ता गमावलेले उत्तमचंद वेगवेगळ्या तुरुंगात फिरत राहिले. शेवटी १९४५ साली रावळपिंडी येथील तुरुंगातून त्यांची मुक्तता झाली.
असामान्य लोकांच्या यादीत नाव नसलेले उत्तमचंद- रामोदेवींसारखे सामान्य लोक काबुल कंदाहारसारख्या परमुलखात अज्ञातपणे वावरत असतात, त्यामुळे महानायकांची रणभूमीवर जाण्याची वाट मोकळी होत असते. अन्यथा या रणशार्दूलांच्या खांद्यावरील जडशीळ धनुष्यांचा टणात्कारही जगाला ऐकायला मिळाला नसता.
सुभाषबाबूंच्या शोधात असलेल्या ब्रिटिश पोलिसांनी सुभाषबाबू विमान अपघातात मारले गेल्याची अफवा पसरवून दिली. संपूर्ण भारतात त्या बातमीमुळे निराशा पसरली. शरदबाबू खरं काय ते माहीत असल्यामुळे शांत होते. पण प्रभावतीदेवींनी मात्र ती बातमी ऐकल्यावर आकांत मांडला. त्यांना कोणत्या शब्दात समजवावं हे शरदबाबूंना कळेनासं झालं. रेडिओवर ती बातमी ऐकल्यावर प्रथम गालातल्या गालात हसणारे सुभाषबाबू आईच्या आठवणीने मात्र कासावीस झाले. काही ना काही संदेश भारतीय जनतेला दिलाच गेला पाहिजे, हे त्यांच्या मनानं घेतलं. भारतीयांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने ‘आपण जीवंत आहोत’ हे सांगण्याच्या संधीची ते वाट पाहू लागले.
क्रमशः सुभाष बावनी भाग २६ | ऑर्लॅंडो मॅझ्यूटा.
लेखक – © अंबरीश पुंडलिक
ग्रंथ सूची:
१) When Bose was Ziauddin- उत्तमचंद मल्होत्रा
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील