सुभाष बावनी भाग २७ | आझाद हिंद संघ –
“तुम्ही त्या ब्रिटिशांना चांगलाच गुंगारा दिला सुभाषबाबू!” हॉटेल ‘एस्प्लनेड’ मधील सुभाषबाबूंच्या त्या आलिशान खोलीत प्रवेश करत न. ग. गणपुले म्हणाले. सुभाषबाबूंच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून गणपुले यांनी हातातले वर्तमानपत्र समोर केले आणि सुभाषबाबूंच्या चेहऱ्यावरील चिरपरिचित हास्याची वाट पाहू लागले. सुभाषबाबूंनी वर्तमानपत्रातली बातमी वाचली- ‘बँकॉकवरून टोकिओला जात असताना झालेल्या विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन!’ सुभाषबाबूंची मुद्रा गंभीर झाली. गणपुलेंना काही कळेना!
“काय झालं सुभाषबाबू?”
“माझ्या मृत्यूची बातमी!”
“पण ती खरी कुठे आहे? आपण तर जिवंत आहात ना?”
“पण हे देशवासियांना कुठे माहीत आहे? माझ्या आईला कुठे माहित आहे?”
“म्हणजे?”
“ही खालची बातमी वाचली का गणपुले?- ‘गांधीजींनी तार पाठवून नेताजींच्या मातु:श्री प्रभावतीदेवींचे सांत्वन केले. ‘तुमच्या शूर पुत्राच्या निधनामुळे साऱ्या देशाला दुःख झाले आहे. तुमच्या शोकात मी मनोभावे सहभागी आहे. हा आघात सहन करण्याचे बळ परमेश्वर तुम्हाला देवो!’’ हे सगळं ऐकून माझ्या आईच्या मनाची काय अवस्था झाली असेल? मी घरातून एकाएकी नाहीसं होण्याच्या घटनेने जो थरार देशवासीयांच्या मनात निर्माण झाला होता, त्याची जागा आज निराशेने घेतली असेल.” सुभाषबाबूंनी वर्तमानपत्राचं भेंडोळं समोरच्या टेबलावर आपटत म्हटलं.
“हे माझ्या लक्षातच नाही आलं!” गणपुले थोडे ओशाळले.
“बरं, इतके महिने झाले जर्मनीत येऊन, अजून ‘भारताचा संपूर्ण स्वातंत्र्याचा अधिकार जर्मनी मान्य करीत आहे’ अशी साधी घोषणा करायला हिटलर तयार नाही. जोपर्यंत ही घोषणा अक्ष गट करत नाही, तोपर्यंत हे आलीशान हॉटेल, चकाकणाऱ्या मोटारगाड्या, अधिकाऱ्यांची आज्ञाधारक लगबग, जर्मन मार्क्सचा अमर्याद ओघ हे सगळं निरर्थक आहे गणपुले!”
थोडा वेळ कुणीच काहीच बोललं नाही. त्यानंतर अचानक काहीतरी सुचून गणपुले म्हणाले,
“आपण जर्मन नभोवाणीवरून भारतीयांशी संवाद का नाही साधत? म्हणजे आपल्याला हवा असलेला उत्साह भारतीयांच्या मनात तयार होईल आणि सध्या आलेलं नैराश्याचं मळभ दूर होईल!” हे ऐकून सुभाषबाबूंचे डोळे चमकले ते अधीरतेने म्हणाले,
“हो रे हो! हे नक्कीच करता येईल. फक्त जर्मन नभोवाणी वरून नाही तर ‘स्वतंत्र भारताच्या नभोवाणी’ वरून!”
सुभाषबाबू लगबगीने टेबलाजवळ गेले आणि त्यांनी काहीतरी लिहायला सुरुवात केली. पहिले आवेदन होते- ‘स्वतंत्र हिंदुस्थानचे नभोवाणी केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी!’ आणि दुसरे होते ‘स्वतंत्र हिंदुस्थान केंद्राच्या स्थापनेला परवानगी देऊन त्याला इतर स्वतंत्र देशांच्या वकिलातीचा दर्जा मिळावा’ यासाठी सुभाषबाबूंनी त्याचे स्वतंत्र ड्राफ्ट तयार करून जर्मन परराष्ट्रमंत्री वॉन रिब्रेनट्रॉप यांच्याकडे पोहोचवायची व्यवस्था केली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही मागण्या तात्काळ मान्य केल्या गेल्या. दोन्ही मागण्यांसाठी स्वतंत्र निधी मंजूर केला गेला. बर्लिनमधली टीएगार्टन भागातली स्पॅनिश वकिलातीसमोरची इमारत स्वतंत्र हिंदुस्तान केंद्रासाठी देण्यात आली.
६ नोव्हेंबर १९४१ या दिवशी स्वतंत्र हिंदुस्थान केंद्राची पहिली बैठक सुरू झाली. जर्मनीतील भारतीय वंशाचे कुटुंब तसेच विद्यार्थी या बैठकीला जमले. त्या सर्वांसमोर सुभाषबाबूंनी छोटेखानी प्रस्तावना केली,
“मित्रहो! हे नभोवाणी केंद्र किंवा स्वतंत्र हिंदुस्थान केंद्र आपल्या कुणालाही आर्थिक सुबत्ता, भरभराट मिळवून देणार नाही. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यानेच या सगळ्याचं यशापयश मोजलं जाणार आहे. कदाचित हा सगळा सारीपाट उधळला जाईल. सोंगट्या काळाच्या काळोखात लुप्त होतील. हाती काहीच लागणार नाही. मिळेल ते फक्त समाधान; आपल्या देशासाठी काहीतरी केल्याचं! आणि ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. बोला आहे तयारी?”
“हो हो आहे!” आवाज उठला. कुणीतरी घोषणा दिली- ‘इन्कलाब जिंदाबाद!’ सुभाषबाबू म्हणाले,
“सध्या आपण परक्या देशात आहोत. घोषणेत आपल्या देशाचा उल्लेख पाहिजे.”
“हिंदुस्तान जिंदाबाद?” आणखी कुणीतरी म्हणालं.
“आणखी सुटसुटीत करता येईल?” सुभाषबाबू
“जय हिंदुस्तान!” कुणीतरी शक्कल लढवली.
“जय हिंद कसं वाटतं?” सुभाषबाबू हसून सर्वांकडे पाहत म्हणाले.
“बेहेतरीन!”
“सुंदर!”
“सर्वोत्तम!” एकाच वेळी अनेक आवाज येऊ लागले. पुढे कितीतरी वेळ बर्लिनमधील त्या वास्तूत ‘जय हिंद’ चा घोष दुमदुमत राहिला. स्वतंत्र हिंदुस्थान केंद्राचं नावही ‘आझाद हिंद संघ’ असं ठेवलं आणि नभोवाणी केंद्राला ‘आझाद हिंद रेडिओ’ असं नाव दिलं गेलं. आणि या संघाचे नेते- सुभाषबाबू हे ‘नेताजी’ झाले.
आझाद हिंद नभोवाणीवरून ब्रिटिशांच्या खोडसाळ बातम्यांना उत्तर देण्यासाठी नेताजी उभे राहिले. सुभाषबाबूंच्या मृत्यूच्या बातमीने हळहळणाऱ्या भारतीय मनाला तब्बल तेरा महिन्यानंतर ऐकू आलेला तो चिरपरिचित धीरगंभीर आवाज रोमांचित करून गेला-
“मी सुभाषचंद्र बोस! आझाद हिंद रेडिओ वरून बोलतोय. मी जिवंत आहे. कुठल्यातरी विमान अपघातात मी मरण पावल्याची बातमी ब्रिटिशांनी जगभर पसरवली. या महायुद्धात भारताला आपल्या बाजूने उतरवण्यासाठी इंग्लंड आटापीटा करत असताना, मी मेलो तर बरं; असं त्यांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्यांच्या दुर्दैवाने तसं होणार नाही. पुण्यपुरातन लाल किल्ल्यावरील युनियन जॅक काढून टाकून त्या जागी तिरंगा ध्वज फडकवल्याशिवाय काही मी प्राण सोडणार नाही- जय हिंद!”
योगायोगाने मध्यंतरीच्या काळात हिटलरचा पराक्रमी सेनानी रोमेल याने आफ्रिकेतील लिबियाच्या अटीतटीच्या लढाईत ऑचिनलेकच्या डेझर्ट आर्मीला थेट इजिप्तच्या सीमेपर्यंत मागे रेटले होते. या युद्धात ब्रिटिशांची चाळीस हजाराची सेना त्याच्या हाती लागली. ज्यात पंधरा हजार सैनिक भारतीय होते. त्यांना कैद करून जर्मनीत आणले जात होते. या पंधरा हजार सैनिकांतूनच साकार होणार होती पहिली आझाद हिंद सेना!
रोमेलच्या विजयाबद्दल आणि पंधरा हजार भारतीय सैनिकांबद्दल ऐकल्याबरोबर नेताजींच्या आनंदाला पार उरला नाही. आकाशात वीज चमकावी, तशी आझाद हिंद फौजेची संकल्पना नेताजींच्या मनात पूर्णांशाने तयार झाली. नेताजी या भारतीय सैनिकांना भेटायला अधीर झाले.
क्रमशः सुभाष बावनी भाग २७ | आझाद हिंद संघ.
(प्रस्तुत लेख हे मूळ लेखाचं संक्षिप्त स्वरूप आहे. संपूर्ण लेख दैनिक तरुण भारतच्या ‘आसमंत’ पुरवणीत किंवा २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या ‘सुभाष बावनी’ या पुस्तकात वाचावेत. लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत.)
लेखक- अंबरीश पुंडलिक.
ग्रंथ सूची:
१) Netaji in Germany ( A little known chapter)- N. G. Ganpuley
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील