सुभाष बावनी भाग २८ | आझाद हिंद फौज –
“ए जमेलखान! नीट बैस ना? आम्हाला जागा नाहीये बसायला.”
“अरे दस मिनिट बैठना है यार. जरा ऍडजस्ट कर लो. सुभाषबाबू का नाम लेकर ये कौन बहरूपिया आ रहा है उसे भगाना है सिर्फ!”
“आणि जर खरंच सुभाषबाबू असले तर?”
“तरी आम्ही जर्मनीसाठी लढणार नाही!”
ऍनाबर्गच्या छावणीतील बराकीत लिबियातून युद्धकैदी म्हणून पकडून आणलेले भारतीय सैनिक दाटीवाटीने बसले होते. भारतातले मोठे नेते सुभाषचंद्र बोस त्यांना भेटायला येणार असे त्यांना सांगण्यात आले होते. सुभाषबाबूंचे नाव घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या खरे खोटेपणाबद्दल घनघोर चर्चा सैनिकांमध्ये सुरू होती. आनंद, अप्रूप, संशय, अनास्था असे वेगवेगळे भाव मनात घेऊन हे सैनिक या भेटीसाठी तयार झाले होते.
एकदाची सुभाषबाबूंची मोटार छावणीत शिरली. सुभाषबाबू मोटारीचा दरवाजा उघडून बाहेर आले. बंद गळ्याचा काळा कोट आणि उंच काळी टोपी परिधान केलेली नेताजींची लोभसवाणी मूर्ती बराकीतील सैनिकांना सामोरी आली. काही उत्साही सैनिकांनी बराकीतच तयार केलेले कागदांचे हार घालून त्यांचे स्वागत केले. प्रत्येक बराकीत लाऊडस्पीकर लावून नेताजींचे भाषण ऐकण्याची सोय केली होती. काहीतरी उपदेश करतील ह्या अपेक्षेने बसलेल्या सैनिकांना आणि नेताजींच्या सुरुवातीच्या शब्दांनी सुखद धक्का बसला-
“आप सब लोग ठीक तो है ना? कोई परेशानी तो नही है? अगर है तो बताईये; हम जर्मनीसे बात करेंगे.”
सुरुवातीच्या या प्रश्नांनी सैनिक हळूहळू मोकळे व्हायला लागले. आता प्रत्येकालाच बोलायचं होतं. आपली कैफियत नेताजींसमोर मांडायची होती. कुणाची अन्नाबद्दल तक्रार होती, कुणाची छावणीतल्या राहण्याच्या सोयीबद्दल, तर कोणाला जर्मन अधिकाऱ्यांची अपमानास्पद वागणूक खटकत होती.
“ये सब परेशानिया दूर की जायेगी!” असं म्हणून नेताजी विषयाकडे वळले.
“मित्रांनो! पोटापाण्यासाठी, कच्चाबच्च्यांसाठी, घरासाठी तुम्ही सगळेजण हातात बंदूक घेऊन या परमुलखात परक्यांसाठी लढायला तयार झालात. पण देशभक्तीचं समाधान देणाऱ्या आझाद हिंद सेनेत लढायला सामील व्हायचं आव्हान करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे.”
“आम्ही तयार आहोत नेताजी!” चार-दोन आवाज उठले.
“थांबा थांबा! नीट ऐकून घ्या. हे एवढं सोपं नाही. या आझाद हिंद सेनेत सामील झाल्याबरोबर तुमच्या भारतातल्या घरी ब्रिटिश सरकारकडून पोहोचणारा पगार बंद होईल. घरच्यांची सुरक्षितता, त्यांच्या पोटात पडणारा दोन वेळचा घास याच्यावरही गदा येईल. आम्ही तुम्हाला त्याची भरपाई किती प्रमाणात देऊ शकू हे सांगता येणार नाही.
“प्रत्येकाला साधा सैनिक म्हणूनच फौजेत सामील व्हावं लागेल. त्यानंतर गुणवत्तेवर आधारित पदोन्नती होईल. तसं पाहिलं तर पगार न देणाऱ्या या सेनेत सामील होणं हा अव्यवहारीपणा आहे. वेडेपणा आहे. पण वेडे लोकच इतिहास घडवत असतात. आता बोला!
“भारतमातेच्या पायातल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी हा वेडेपणा करण्याची कुणकुणाची तयारी आहे?
“स्वातंत्र्यदेवतेला आपलं शीर अर्पण करण्याची कुणाकुणाची तयारी आहे?
“स्वातंत्र्यसूर्याच्या उदयासाठी आपल्या रक्ताचं अर्घ्य त्याला देण्यासाठी कोण कोण तयार आहे सांगा!
“ज्यांची तयारी असेल त्यांनी येथे ठेवलेल्या कागदावर स्वाक्षरी करावी.” नेताजी आपलं बोलणं संपवून खुर्चीत बसले. काही क्षण निःस्तब्धतेत आणि निरवतेत गेले.
‘बहुदा रिक्तहस्तेच परतावे लागणार!’ असा विचार करून अबीद हसन-भदेश भादुडी हालचाल करू लागले, इतक्यात तिरीमिरीसरशी उठलेला जमेलखान हातात सुरा घेऊन समोर आला. नेताजींच्या समोरच त्याने झर्रकन सुरा हाताच्या अंगठ्यावरुन फिरवला. रक्ताची धार लागली. आणि त्या समर्पणाच्या शाईने जमेलखानाने कागदावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सेनेत सामील होण्यासाठी उठलेल्या चौदा जणांनी जमेलखानाचं अनुकरण केलं. पंधरा तर पंधरा! सुरुवात तर झाली. नेताजींसहित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
उणे २० अंश तापमान, लवकर मावळणारा दिवस आणि गुडघा गुडघाभर बर्फ अशा वातावरणात फ्रांकेनबर्गच्या छावणीत आय एन ए चे पितळी बॅचेस, झेप घेणाऱ्या वाघाचं चित्र खांद्यावर गौरवाने मिरवत सैनिक कदमताल करू लागले.थंडीचा चटका देणाऱ्या जमिनीवर आडवे पडून सरपटू लागले. या सर्वांच्या उत्साहात वाढ झाली, ती आपल्या लाडक्या नेताजींना आपल्या सोबत कवायत करताना, नेम लावताना, चाप ओढताना पाहिल्यावर! कलकत्त्याच्या फोर्ट विल्यममध्ये गिरवलेले लष्करी प्रशिक्षणाचे धडे नेताजी फ्रांकेनबर्गमध्ये घटवू लागले.
प्रशिक्षित सैनिकांना ऍनाबर्गच्या छावणीत पाठवून इतर सैनिकांनाही आझाद हिंद फौजेबद्दल माहिती देण्याचे, सामील होण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे काम दिले गेले. सुरुवातीला पंधरा सैनिकांची ही सेना पाहता-पाहता साडेतीन हजारापर्यंत पोचली. या सर्व आझाद हिंद सैनिकांचा शपथ ग्रहणाचा दिमाखदार सोहळा पार पडला तोही जर्मन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत!
आझाद हिंद फौजेच्या संदर्भात नेताजींनी काही बाबी जर्मनीला पुरेशा स्पष्टपणे सांगितल्या होत्या. आझाद हिंद सेना ही एका स्वतंत्र राष्ट्राची सेना असून तिला जर्मन सैन्याच्या बरोबरीने वागणूक मिळावी. हे सैन्य भारताच्या स्वातंत्र्यखेरीज अन्य कोणत्याही उद्दिष्टासाठी युद्ध करणार नाही. तसेच या सैन्यावर तशी सक्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही.
पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनीतून कसे युद्ध करणार? त्यासाठी भारताच्या सीमेपर्यंत जावे लागेल ना? जर्मनीचे परराष्ट्रमंत्री रिब्रेनट्रॉप यांनी हा प्रश्नच सोडवून टाकला. ते नेताजींना म्हणाले,
“आम्ही रशियावर आक्रमण केले आहे, हे आपण जाणताच! सध्या आमची सेना मॉस्कोभोवती फास आवळत आहे. एकदा का आम्ही स्टालिनग्राड जिंकून व्होल्गा नदी गाठली की तुम्हाला पेशावरकडे जायची वाट मोकळी करून देऊ.”
नेताजींच्याही मनात मॉस्को- समरकंद- काबूलमार्गे भारताच्या सीमेवर पोहोचायचे होते; पण रशियावरील आक्रमणाने वाट मोकळी होईल की रोखली जाईल? रिब्रेनट्रॉपचा हा आत्मविश्वास अनाठायी तर सिद्ध होणार नाही ना? रशियावरील आक्रमणाने स्टॅलिनइतकीच नेताजींची झोपदेखील उडवून दिली होती. युरोपच्या प्रांगणात सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या अवकाशातील जर्मन दिग्विजयाचे धवल क्षितिज झाकोळले जाऊन पराभवाच्या कृष्ण मेघांची गर्दी एव्हाना व्हायला लागली होती.
क्रमशः सुभाष बावनी भाग २८ | आझाद हिंद फौज.
(प्रस्तुत लेख हे मूळ लेखाचं संक्षिप्त स्वरूप आहे. संपूर्ण लेख दैनिक तरुण भारतच्या ‘आसमंत’ पुरवणीत किंवा २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या ‘सुभाष बावनी’ या पुस्तकात वाचावेत. लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत.)
लेखक- अंबरीश पुंडलिक.
ग्रंथ सूची:
१) Netaji in Germany ( A little known chapter)- N. G. Ganpuley
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील