सुभाष बावनी २९ | बदलते रंग

सुभाष बावनी २९ | बदलते रंग

सुभाष बावनी २९ | बदलते रंग –

“रशियावर आक्रमण करायलाच हवं होतं का?” नेताजींच्या थेट प्रश्नाने परराष्ट्रमंत्री रिब्रेनट्रॉप जरा चमकले; पण नंतर आत्मविश्वासाने म्हणाले,

“अर्थातच! नाहीतर आज रशियावर जे संकट कोसळले आहे, तीच अवस्था आमची झाली असती.”

“मला वाटतं रशियासोबत केलेला अनाक्रमणाचा करार दोन्ही बाजूंनी पाळला जात असताना जर आमची पेशावरची वाट मोकळी करून दिली असती तर…” नेताजींनी आपला विचार मांडला.

“तुम्ही भारतात घुसण्याची तयारी करून ठेवा. मॉस्को पाठोपाठ स्टालिनग्राडही जर्मन सैनिकांनी काबीज केल्याची बातमी केव्हाही येऊन धडकेल!”

२२ जून १९४१ रोजी पहाटे चार वाजता जर्मनीने रशियावर केलेला हल्ला हा स्टॅलिनला अनपेक्षित होता. रुंद आघाड्या उघडून फॉन लीब, फॉन बॉख, फॉन रुंडस्टेंट हे जर्मन सेनानी तीन दिशांनी रशियात घुसले होते. विमानातून होणाऱ्या बॉम्ब वर्षावाने रशियन मालमत्तेचे अतोनात नुकसान होत होते. पँझर रणगाडे जर्मन सैन्याचा रस्ता मोकळा करत चालले होते. रशियन सैन्य मागे सरकताना नाईलाजाने आपल्याच देशाची संपत्ती शत्रूच्या हाती पडू नये म्हणून उध्वस्त करत होते. आपल्याच देशातली धरणं सुरुंग लावून उडवत होते. रशियन आघाडीवरच्या युद्धवार्ता जर्मनीत पोहोचू लागल्या-

“अत्यंत मोक्याचे असे गोमेल शहर जर्मनीच्या ताब्यात!”

“रुंडस्टेंटच्या फौजांनी किएव्ह शहरावर ताबा मिळवला!”

“खर्कोव्ह आणि रोस्टोव्हमधूनही रशियाची माघार!”

“मॉस्कोपासून पंधरा मैलांपर्यंत जर्मन सैन्य पोहोचलं!”

“मॉस्कोतल्या महिला व बालकांना अन्यत्र हलवण्यात आलं!”

“स्टॅलिनची कचेरी कुबीशेव्हला हलवली नेली!”

“जर्मन सैन्य स्टालिनग्राड शहरात शिरत आहे!”

आतापर्यंतचा जर्मन सैन्याचा धडाका पाहता स्टॅलिन आपली लाल सेना मागे घेऊन व्होल्गा नदीच्या पलीकडच्या काठावर नवा मोर्चा उघडेल, असा कयास होता; पण तसं झालं नाही. स्टालिनग्राड शहर चिवटपणे प्रतिकार करू लागलं. शहरातलं प्रत्येक घर, प्रत्येक माणूस लढू लागला. रस्त्याशेजारच्या इमारतींच्या खिडकीमधून आणि गच्चीवरून दगडधोंड्यांचा मारा जर्मन सैन्यावर होऊ लागला. पुढे सरकणे जमेना.

एके दिवशी स्टालिनग्राडमध्ये झुंजणाऱ्या पॉलस या जर्मन अधिकाऱ्याला बातमी मिळाली, की आपल्या पिछाडीवर मार्शल झुकॉव्हने रशियन सैन्याच्या तुकड्या उतरवल्या आहेत. समोर रशियन जनतेचा चिवट प्रतिकार आणि मागे शस्त्रांनी सुसज्ज अशी रशियन सेना! पॉलसच्या सैन्याची कोंडी होऊ लागली. त्यात लवकरच उपसमारीचीही भर पडली. तरीही पॉलस पराक्रमाची पराकाष्ठा करत लढत होता.

रशियन आघाडीवरून येणाऱ्या युद्धवार्तांचा सूर आता बदलला होता. डॉन नदी पार करून एक नवी आघाडी झुकॉव्हने रिकोसोवस्कीच्या नेतृत्वात उघडली. पॉलस पुरता वेढला गेला. ९६० विमाने, २४०० रणगाडे, एकविसशे तोफा, दहा हजार मालवाहू मोटारी आणि अडीच लाख जर्मन सैन्य यांचा बळी घेऊन स्टालिनग्राडची युद्धभूमी शांत झाली. पॉलसने शरणागती पत्करली. हिटलरने काळजावर दगड ठेऊन शरणागतीची परवानगी दिली.

तीन वर्षापासून अजिंक्य असलेल्या हिटलरचा अश्वमेधाचा घोडा रशियाने स्टालिनग्राडच्या सीमेवर रोखला होता. रशियाच्या निमित्ताने युद्धाचा रंग बदलायला सुरुवात झाली होती. रशियाच्या दग्धभू धोरणाची जणू चाहूल लागलेल्या नेताजींनी कपाळावर हात मारून घेतला. आता काय करायचे? काबुल- पेशावरची वाट अडवली गेली होती. मॉस्कोमार्गे पेशावरला पोहोचायचं स्वप्नही पडणं आता बंद झालं होतं. प्रशिक्षण घेत असलेलं सैन्य भारताच्या सीमेवर उतरवायचं कसं? उगाच जर्मनीत आलो असे नेताजींना वाटायला लागले.

पश्चिमेत जर्मनी-रशियाची लढाई निर्णायक वळण घेत असतानाच दुसरीकडे प्रशांत महासागराचे शांत पाणी डचमळू लागले. कीमेल आणि शॉर्ट हे पर्ल हार्बरमधील अधिकारी सकाळी सकाळी तंगड्या पसरून वाइनचा आनंद घेत असतानाच अचानक-

“धाड धाड… धडाड…!” असे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू आले. जपानच्या विमानवाहू नौका पर्ल हार्बरच्या परिसरात येऊन पोहोचल्या होत्या. त्या नौकांवरून हवेत झेप घेणारी जपानची विमाने पर्ल हार्बरची इंच-इंच भूमी भाजून काढत होती. प्रतिकारासाठी राखीव असलेली पर्ल हार्बरवरील अमेरिकन विमानं हवेत झेपावायच्या आधीच गारद केली गेली.

किमेल आणि शॉर्टना प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. ते तयारी करून बाहेर पडले ते एकदम शरणागतीसाठीच!

७ डिसेंबर १९४१ रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर या मोक्याच्या बंदरावर हल्ला करून जपानने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने उडी घेतली. अमेरिका अर्थातच मित्र राष्ट्रांच्या गोटात ओढले गेले. फक्त अमेरिकेच्या विरोधात जाऊन जपान थांबला नाही, तर लगोलग ब्रिटनच्या ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ या युद्धनौकेला आणि ‘रिपल्स’ या विनाशिकेला जपानने समुद्राचा तळ दाखवला.

यानंतर बृहतपूर्व आशियाचं स्वप्न पाहणाऱ्या जनरल हिडेकी तोजो या जपानच्या पंतप्रधानांनी फिलिपाईन्स, हॉंगकॉंग, मलेशिया हे देश वेगाने पादाक्रांत करायला सुरुवात केली. सर्वात शेवटी सिंगापूरवर जपानचा हिनोमारू ध्वज फडकू लागला. जपानने सिंगापूरचं नवीन नामकरण केलं- शोनान! १५ फेब्रुवारी १९४२!

जपानने भारताच्या ईशान्य सीमेपर्यंत मारलेली मुसंडी जर्मनीतून न्याहाळणारे नेताजी पूर्वेत झालेली ही जलद घडामोड पाहून आनंदित झाले. आता आणखी थोडं पुढे गेलं म्हणजे पोचलेच की भारतात! ‘ज्या वाटाघाटी आपण जर्मनीसोबत करत आहोत त्याच जपानशी करता आल्या तर?’

‘आझाद हिंद सेना जर्मनीच्या सहाय्याने भारताच्या वायव्य सीमेवर इंग्रजांच्या सैन्याशी दोन हात करायचे स्वप्न पाहतेय, तेच ईशान्य सीमेवर करता आले तर?’ हा विचार नेताजींच्या मनाला गुदगुल्या करु लागला. आता नेताजींचे जर्मनीत मनच लागेना. कसेही करून पूर्वेत पोहोचले पाहिजे, हा ध्यास त्यांच्या मनाने घेतला.

सुभाषबाबूंसारखी व्यक्ती या बदललेल्या परिस्थितीत जपानमध्ये असावी, यासाठी जपानमध्ये पंचवीस वर्षांपासून ठाण मांडून आपल्या परीने स्वातंत्र्यदेवतेची आराधना करणारी एक व्यक्ती प्रयत्न करत होती. आपली आजवरची सगळी प्रतिष्ठा, वजन या पूर्वेत होऊ घातलेल्या संग्रामाच्या यशासाठी तिने पणाला लावली होती. रणचंडीकेला कौल मागितला गेला होता. उजवीकडून दान पडण्याची वाट तो रासबिहारी बोस नावाचा तपस्वी पाहू लागला.

क्रमश: सुभाष बावनी २९ | बदलते रंग.

लेखक- © अंबरीश पुंडलिक

ग्रंथ सूची:
१) दुसरे महायुद्ध- वि. स. वाळिंबे

Leave a comment