सुभाष बावनी भाग ३ | ओटन प्रकरण

सुभाष बावनी भाग ३ | ओटन प्रकरण

सुभाष बावनी भाग ३ | ओटन प्रकरण –

सुभाष बावनी भाग ३ –

“कृपया पाय बाजूला करता का? मला या सीटवर बसायचे आहे.” ट्राममध्ये एक गोरा गृहस्थ उद्दामपणे समोरच्या सीटवर पाय पसरून बसला होता, त्याला उद्देशून सुभाष म्हणाला.

तो मनुष्य ढिम्म हलत नाही, हे पाहिल्यावर सुभाषने त्याची कॉलर धरुन त्याला उभे केले आणि संपूर्ण डब्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, “बऱ्या बोलाने पाय खाली घे नाहीतर बाहेर फेकून देईन.”

हिंदी मनुष्याच्या ह्या अनपेक्षीत पावित्र्याने तो इसम गोंधळला आणि त्यानंतर सावरुन बसला.

ब्रिटिश माणूस प्रतिकार केला की दबतो, हे सुभाषच्या लक्षात आलं.

गुरूच्या शोधात बरेच दिवस गेल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं. पहिल्या दोन वर्षात फर्स्टक्लास जरी मिळाला, तरी मार्क्स कमी झाले होते. आता तिसऱ्या वर्षात त्याची कसर काढायची होती. सुभाषनं पदवीसाठी तत्त्वज्ञान हा विषय घेतला. तासनतास तो कॉलेजच्या लायब्ररीत बसून अभ्यास करू लागला. असाच एक दिवस बसला असताना,

“सुभाष! आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला मारलं! चल लवकर!!” लायब्ररीत बसलेल्या सुभाषला कुणीतरी येऊन सांगितलं.

“कुणी रे?”

“ओटन सरांनी!”

“असं? चल बघू!” सुभाष वर्ग प्रतिनिधी- क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होता. त्याने त्या विद्यार्थ्याची भेट घेतली.

“काय झालं रे?”

“अरे आपलं लेक्चर नव्हतं, त्यामुळे आम्ही दोघे तिघे व्हरांड्यात बोलत होतो; तर एकदम ओटन सर त्यांच्या वर्गातून रागावून बाहेर आले आणि ढकलून दिलं मला. एवढ्या मोठ्याने नव्हतो रे बोलत आम्ही.”

“त्यांचा राग तुमच्या बोलण्यावर नसून तुम्ही भारतीय आहात यावर आहे”- सुभाष

“हो हो. त्यांना भारतीयांचा खूप राग येतो, परवा आमच्या वर्गात झाशीची राणी, तात्या टोपे यांच्याबद्दलही खूप अद्वातद्वा बोलत होते.” भोवतालच्या कोंडाळ्यातून कोणीतरी बोललं.

“हे वाढतच चाललंय सरांचं? मी आजच प्राचार्यांना भेटतो” सुभाष

“विद्यार्थ्यांनी कसलाही गोंगाट केला नाही. ओटन सरांना त्रास द्यायचाही त्यांचा हेतू नव्हता.” सुभाष प्राचार्य जेम्स यांना म्हणाला.

“ओटन यांनीही फक्त समज दिली” प्राचार्य जेम्स म्हणाले.

“ते विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून गेले”

“अजिबात नाही”

“मग काय विद्यार्थी खोटं बोलताहेत?”

“मग मी खोटं बोलतोय असं म्हणायचंय का तुला?”

“मला एवढेच म्हणायचे आहे की ओटन सरांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि विषय संपवावा”

“आणि असं नाही केलं तर?” जेम्सनी निर्णायक सवाल टाकला.

दुसऱ्या दिवशी हरताळ पाळण्यात आला. चिडलेल्या प्राचार्यांनी गैरहजर विद्यार्थ्यांना दंड ठोठावला. त्यामुळे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये बेमुदत संप सुरू झाला.

कॉलेजच्या आवारात चिटपाखरूही फिरकेना; शेवटी ओटन यांनीच पुढाकार घेतला. विद्यार्थी प्रतिनिधींना म्हणाले, “झालं गेलं विसरून जा.” विद्यार्थ्यांना तरी ओटन सरांच्या पुढाकाराव्यतिरिक्त काय हवे होते? आनंदी वातावरणात कॉलेज पुन्हा सुरू झाले. वादळ शमल्यासारखे वाटले. अजून विद्यार्थ्यांवरील दंड मागे घेतला नव्हता. विद्यार्थी, प्राध्यापक यांनी प्राचार्यांना समजावून पाहिले; पण व्यर्थ! हे प्रकरण संपायचे होते तोच ओटन यांनी आणखी एका विद्यार्थ्यावर हात उगारला.

“आता काय करायचं?”

“जेम्स ऐकून घेणार नाही. त्यांच्याकडे जायचं नाही”

“संपही करायचा नाही. पैसे भरावे लागतात”

“मग?”

सुभाषच्या डोळ्यासमोर ट्राममधील प्रसंग उभा राहिला.

एक दिवस कॉलेजच्या नोटीस बोर्डावर काहीतरी चिटकवत असताना ओटन महाशयांना हिंदी विद्यार्थ्यांचा गराडा पडला. मागून-पुढून, आजू-बाजूने ओटनला ठसठशीत गुरुदक्षिणा मिळू लागली. ओटन खाली कोसळले.

“इंडियन एज्युकेशन सर्विस चे सदस्य प्राध्यापक ओटन यांना मारहाण!” वर्तमानपत्रांचे मथळे ओरडू लागले. सरकारच्या मानबिंदूवर एवढा मोठा प्रहार? सरकारने प्रेसिडेन्सी कॉलेज बेमुदत बंद करून टाकले. प्राचार्य जेम्सनी सुभाषला बोलावून घेतले.

“तुझ्यामुळे हे सगळं घडतंय सुभाष! तू सर्वाधिक त्रासदायक विद्यार्थी आहेस या कॉलेजमधला. मी तुला आत्ताच्या आत्ता कॉलेजमधून काढून टाकत आहे.”

“मी आपला आभारी आहे” प्राचार्यांच्या कक्षातून सुभाष तावातावाने बाहेर पडला.

“हे चौकशी समितीचे अध्यक्ष सर आशुतोष मुखर्जी तुझे मित्र आहेत नं रे शरद? त्यांच्याशी एकदा बोलून पहा ना. पोराचं सोन्यासारखं आयुष्य वाया जाईल रे!” जानकीबाबू कळवळून शरदला म्हणाले. आपल्या ओळखीचा असा उपयोग करून घेणं शरदना जीवावर आलं होतं, पण तरी धाकट्या भावाच्या भविष्यासाठी त्यांनी आशुबाबूंना आडून आडून विचारून पाहिलं.

“दिलगिरी व्यक्त करावी. प्रश्न सुटेल.” आशुतोषबाबूंनी सुचवले.

सुभाष समितीसमोर हजर झाला. आशुतोषबाबूंच्या व्यतिरिक्त आणखी दोघेजण समितीत होते.

आशुतोषबाबूंनी पहिला प्रश्न टाकला,

“ओटन यांच्यावरील हल्ला तुला समर्थनीय वाटतो का?”

विद्यार्थ्यांना ओटन सरांनी केलेली मारहाण आणि ओटन यांच्यावरील हल्ला हे दोन्हीही समर्थनीय नाहीत”- सुभाष

“मग या हल्ल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करशील का?”

“विद्यार्थ्यांवरील मारहाणीबद्दल ओटन यांनी दिलगिरी व्यक्त केली असती, तर हा प्रसंगच उद्भवला नसता”

“हो की नाही?”

“नाही”

“मग आमचाही नाईलाज आहे. तुला रस्टीकेट करण्याचा निर्णय आम्हाला कायम ठेवावा लागेल.”

“जे मला माहित आहे तेच तुम्ही सांगत आहात. मी माफी मागणार नाही!”

शेवटच्या वाक्याने सुभाषसाठी प्रेसिडेन्सी कॉलेजचे दरवाजे कायमचे बंद केले. आता कलकत्त्यात थांबून काय करायचे म्हणून तो माँ-बाबांसोबत रात्रीच्या गाडीने कटकला निघाला. सोबतीला होते अर्ध्यात थांबलेले शिक्षण आणि ‘प्रेसिडेन्सी मधून काढून टाकलेला विद्यार्थी’ हा शिक्का! सुभाष घाबरला नव्हता, पण गोंधळला मात्र होता. आता शिक्षण नाही तर आपण प्रगल्भ कसं व्हायचं, आणि देशाची सेवा तरी कशी करायची, या प्रश्नाने त्याला ग्रासले होते. बाहेरचा अंधार आणि आगगाडीच्या शिट्ट्यांचा भेसूर आवाज सुभाषला आणखी गंभीर करत होता.

क्रमशः सुभाष बावनी भाग ३ | ओटन प्रकरण.

ग्रंथ सूची:
१) नेताजी- वि. स. वाळिंबे.
२) महानायक- विश्वास पाटील.
३) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

स्केच- Devanand Joshi

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०

Leave a comment