सुभाष बावनी ३० | रासबिहारी बोस

सुभाष बावनी ३० | रासबिहारी बोस

सुभाष बावनी ३० | रासबिहारी बोस –

“झपाट्याने बदललेल्या युद्ध परिस्थितीत तुमची जपान सरकार कडून काय अपेक्षा आहे मिस्टर बसू?” जनरल सुगियामा जपानी युद्धकचेरीत आपल्या समोर बसलेल्या रासबिहारी बोस यांना विचारत होते. याच क्षणाची वाट पाहत रासबिहारींनी उणीपुरी पंचवीस वर्षं जपानमध्ये काढली होती.

रासबिहारींची उत्सुक नजर भिंतीवरील नकाशे न्याहाळू लागली. सगळ्यात शेवटचा नकाशा होता ब्रम्हदेशाचा. ‘तूर्त जपानला भारतात स्वारस्य नाही’ हे नकाशावरून रासबिहारींच्या ध्यानात आलं.

“आम्ही भारतीय लोक या युद्धपरिस्थितीत जपानकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहोत.” रासबाबूंनी सावध सुरुवात केली.

“कुठल्या अपेक्षेने?” सुगियामा

“इंग्लंड युद्धात गुंतलेला असताना आम्ही भारतीय लोक स्वातंत्र्यासाठी झगडण्याचा निकराचा प्रयत्न करूच; पण जपानसारखा बलदंड देश पाठीशी असेल तर हे कार्य अधिक झपाट्याने साधले जाईल!” रासबिहारी

“जपाननं तुम्हाला मदत का करावी?”

“एका आशियाई देशानं दुसऱ्या आशियाई देशाला मदत केली तर कुठे बिघडलं? आशियाई अस्मितेच्या उत्कट आविष्कारासाठी असं करणं आवश्यक आहे. हे जर झालं तर इंग्लंडला विचार करावाच लागेल!” रासबाबूंनी एका दमात बोलून घेतलं.

“बरं बरं बघू!” बघू या मोघम शब्दांनी जपानी युध्दकचेरीतील ती बैठक संपली.

जनरल सुगियामा बोलले मोघम; पण कृती मात्र तडफेची केली. त्यांनी मेजर फुजिवारा यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर थोडी नाजूक पण महत्वाची जोखीम टाकण्याआधीची प्रस्तावना सुरू केली,

“मेजर फुजिवारा! थायलंड, मलेशिया, सिंगापूर या भागात भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कार्यकर्ते- गट गुप्तपणे प्रयत्न करत आहेत. या सर्वांशी संवाद साधण्याचा, त्यांना आपलंसं करून घेण्याचा आणि त्यांच्या मनात जपानच्या युद्ध प्रयत्नाबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. आपल्याला जर भारताच्या दिशेने आघाडी उघडायची असेल तर त्या भागातल्या भारतीयांची मनं आपल्याला जिंकावी लागतील.

“ठीक आहे” फुजिवारांनी होकार भरला.

“आपल्या प्रयत्नांना यश येवो!”

“धन्यवाद!”

मेजर फुजीवारा यांच्या नेतृत्वात सक्रिय झालेली ही यंत्रणा फुजिवारा किकान म्हणून ओळखली जाऊ लागली. लष्करात असूनही भावनाप्रधान असलेल्या, माणसांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं याची मनापासून आवड असलेल्या फुजिवारा यांनी हे काम आनंदाने स्वीकारलं.

बँकॉकला येताच फुजिवारा ग्यानी प्रीतम सिंग यांना भेटले. ग्यानी प्रितमसिंग हे सच्चे देशभक्त! ते स्थानिक गुरुद्वारांमध्ये गुरुग्रंथसाहेबवर प्रवचने देत. शीख तरुणांना भेटत. थायलंड, मलेशिया सीमेवर इंग्रजांकडून लढणाऱ्या भारतीय सैनिकांचीही त्यांची गाठ पडे. त्यांना प्रितमसिंग सांगत,

“आशियाई माणसाने आशियाई माणसाची लढू नये. तुम्ही इंग्रजांच्या बाजूने युद्ध करू नका. या युद्धात इंग्लंडचा पराभव झाला तर भारताचे स्वातंत्र्य निश्चित. बोला काय हवंय तुम्हाला? तुमच्या बटालियनचा विजय की भारताचं स्वातंत्र्य?” सैनिकांच्या मनात या प्रतिपादनाचा परिणाम होई. फुजिवारा-प्रितम सिंग या जोडगोळीला येऊन मिळाले प्राध्यापक सत्यानंद पुरी!

सत्यानंद पुरी हे कलकत्ता विद्यापीठात पौर्वात्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. थायलंडच्या महाराजांनी तिथल्या विद्यापीठासाठी पौर्वात्य धर्माचा विशेष अभ्यास असलेला प्राध्यापक पाठवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांना लिहिले, तेव्हा गुरुदेवांनी सत्यानंदांच्या नावाची शिफारस केली. १९३२ मध्ये ते थायलंडला येऊन पोहोचले.

हे त्रिकुट थायलंड, मलेशियामधील परिसर पिंजून काढू लागलं. भारतीय मनाचा अंदाज घेऊ लागलं. तेवढ्यात मलेशियावर जपानचे वेगवान आक्रमण झाले. प्रतिकार असा झालाच नाही. निप्पॉनच्या रणगाड्यांनी चौदाव्या पंजाब रेजिमेंटला सळो कि पळो करून टाकलं. पळून गेलेल्या सैनिकांनी आसपासच्या जंगलात आश्रय घेतला. रणगाड्यांनी उडवलेला धुरळा खाली बसत नाही, तोच फुजिवारा प्रीतमसिंगांसोबत सैनिकांना भेटण्यासाठी- त्यांचं मन वळवण्यासाठी अलोर स्टारमध्ये उतरले. इथेच मोहनसिंग नावाचा मुसमुसता देशभक्त तरुण त्यांच्या हाती लागला. मोहनसिंग मलेशियाच्या युद्धावर निघतानाच आपल्या मित्रांना सांगून निघाला होता, “मी जातोय ब्रिटिश लष्कराचा गणवेश घालून, पण कोण जाणो; येताना माझ्या अंगावर वेगळाच गणवेश असेल?” प्रीतमसिंगांइतकाच तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी आसुसलेला होता. नवीनच उदयास येऊ घातलेल्या स्वातंत्र्य सेनेची धुरा कोणाकडे द्यायची, हा प्रश्न आपोआपच मिटला. कॅप्टन मोहनसिंग धडाडीने कामाला लागले. सिंगापूरच्या लढाईत मोठ्या संख्येने भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले. मलेशियामधले दहा हजार आणि सिंगापूरातले पंचेचाळीस हजार! अशा पंचावन्न हजार भारतीय सैनिकांच्या हस्तांतरणाचा दिमाखदार सोहळा सिंगापूरातल्या फारेर पार्कवर पार पडला.

कर्नल हंट या ब्रिटिश अधिकाऱ्याने एका वाक्यात भारतीय सैनिकांचा निरोप घेतला-

“आम्ही तुम्हाला जपानच्या ताब्यात देत आहोत. तुमचा आमचा संबंध संपला.”

सर्व युद्धकैद्यांना स्वातंत्र्य सेनेत सामील व्हायचं आवाहन फुजिवारा आणि मोहन सिंग यांनी केलं. सैनिकांना विचार करून निर्णय कळवायची मुभा दिली गेली. सैनिक दबकत दबकत आझाद हिंद फौजेत सामील होऊ लागले.

रासबिहारींनी टोकियोला आपल्या इंडियन इंडेपेंडेन्स लीगचा भव्य मेळावा घेण्याचे ठरवले. मलेशिया, सिंगापूर, थायलंड, शांघाय अशा ठिकाणी कार्यरत असणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी या मेळाव्यासाठी जमणार होते. या लीगची शाखा म्हणून ही मोहनसिंगांची आझाद हिंद सेना मोजली जाऊ लागली. सैन्यासह लीगचा पसारा मोठा! आपल्या वयाला तो झेपणार नाही आणि मोहनसिंग या शिपाईगड्याच्या कुवतीला तो पेलवणार नाही; यासाठी या मेळाव्याचा पहिला ठराव झाला तोच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपानमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा!

सिंहपूर हे मूळ नाव असलेलं सिंगापूरचं रण हे सुभाषचंद्र या पुरुषसिंहाच्याच ललाटी लिहिलं आहे, याची प्रचिती पुढील काळात घडणाऱ्या घटनांनी आली. देशभक्त झाली तरी ती हाडामासाची माणसंच असतात. मद-मत्सर या षड्रिपूंच्या तडाख्यातून त्यांचीही सुटका नाही. देशहितासाठी वैयक्तिक राग-लोभाच्या प्रसंगांना दूर ठेवता आलं पाहिजे, अन्यथा कार्यनाश अटळ आहे! हाच बोध येणाऱ्या काळात होणाऱ्या रासबिहारी-मोहनसिंग यांच्यातील संघर्षाने ठळक होणार होता.

क्रमश: सुभाष बावनी ३० | रासबिहारी बोस.

लेखक- अंबरीश पुंडलिक.

ग्रंथ सूची:

१) जय हिंद आझाद हिंद- वि. स. वाळिंबे

Leave a comment