सुभाष बावनी ३१ | मोहनसिंग

सुभाष बावनी ३१ | मोहनसिंग

सुभाष बावनी ३१ | मोहनसिंग –

“हे रासबिहारी खरोखर भारतीयच आहेत का? त्यांना हिंदी बोलताना त्रास होतोय; पण जपानी भाषा मात्र अस्खलित बोलतात!”

इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या मंचावरून भाषण देणाऱ्या रासबिहारींना न्याहळत मोहनसिंग बाजूला बसलेल्या निरंजनसिंग गील यांना म्हणाले. सर्वत्र रासबिहारींनाच मिळणारं महत्व मोहनसिंगांना सहन होत नव्हतं.

आझाद हिंद फौजेची संख्या चाळीस हजारापर्यंत पोहोचली, यामागे मोहनसिंगांचे अथक प्रयत्न होते, ही गोष्ट खोटी नव्हती. दिवसा-रात्री केव्हाही मोहनसिंग युद्धकैद्यांच्या बराकीतून फिरत. सैनिकांशी बोलत. त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन करत.

“आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आझाद हिंद फौजेत सामील झालं पाहिजे” मोहनसिंग सैनिकांना आवाहन करत.

“पण आम्ही ब्रिटिश सैन्यात सामील होण्यापूर्वी राणीशी इमान राखण्याची शपथ घेतली आहे, त्याचं काय?” सैनिक नैतिक अडचण पुढे करत.

“तुमच्या शपथेचा संबंध तुमच्या लष्करातल्या नोकरीशी होता. आता तुम्ही ती नोकरीच सोडताय तर शपथेला जागण्याचा प्रश्न येतो कुठे?” मोहनसिंगांच्या बिनतोड युक्तिवादामुळे सैनिक निरुत्तर होत.

“अरे ज्या मातीच्या कुशीत जन्माला आलात, तिच्याशी इमान राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. ते पार पाडण्याची आझाद हिंद फौजेसारखी संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. आपल्याला मिळतेय यासाठी स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे आपण!” मोहनसिंगांच्या अमोघ वक्तृत्वाने बराकीतले सैनिक भारावून जायचे. आझाद हिंद सेनेत नोंदणी करण्यासाठी गर्दी व्हायची. मोहनसिंग पुढच्या बराकीकडे सरकायचे.

हळूहळू सैनिकांनी घेण्याच्या शपथेच्या शब्दात बदल होऊ लागला. ‘मातृभूमीशी इमान’ ऐवजी ‘कमांडर इन चीफ मोहन सिंग यांच्याशी इमान’ अशा शपथा नव्याने आझाद हिंद फौजेत सामील होणाऱ्या सैनिकांना दिल्या जाऊ लागल्या. आझाद हिंद सेना म्हणजे मोहनसिंग; आणि मोहन सिंग म्हणजे आझाद हिंद सेना! असं समीकरण मोहनसिंगांनी मनोमन ठरवून टाकलं. इंडियन इंडिपेंडन्स लीग वेगळी आणि आझाद हिंद सेना वेगळी! लीगचा सेनेवर अधिकार नाही! अशी भाषा मोहनसिंग बोलू लागले. सेनेठोपाठ आता इंडियन इंडिपेंडन्स लीगचेही सर्वेसर्वा आपल्यालाच केलं जावं, अशी इच्छा ते ज्याच्या त्याच्यापाशी बोलून दाखवू लागले आणि रासबाबूंचा द्वेष करू लागले. त्यातच महावीर सिंग ढिल्लनांचा प्रसंग घडला.

पेनांगमध्ये गुप्तचर होण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय सैनिकांना प्रशिक्षणानंतर जपान पाणबुडीच्या साह्याने भारताच्या वेगवेगळ्या भागात ब्रिटिश लष्कराची माहिती मिळवण्यासाठी पाठवीत असे. त्यातील एक प्रशिक्षणार्थी गुप्तचर म्हणजे महावीर सिंग ढिल्लन! ‘तात्पुरतं आझाद हिंद सेनेत सामील व्हायचं; त्यानिमित्ताने मिळणाऱ्या सवलती मिळवायच्या आणि संधी मिळेल तेव्हा परत ब्रिटिशांच्या गोटात जाऊन जुन्या सेवेत रुजू व्हायचं. ब्रिटिशांशी इमान राखायचं’ असा विचार करणारे महावीरसिंग माहिती काढण्याच्या निमित्ताने ब्रह्मदेशात शिरले आणि थेट तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्यासमोर हजर होऊन माफी मागितली. पेनांग मध्ये मिळालेले नकाशे, योजनांची टिपणं, संख्येच्या नोंदी महावीरनी ब्रिटिशांच्या टेबलावर ठेवल्या. त्या आधारावर ब्रिटिशांचे काही छत्रीधारी सैनिक वॉ नदीच्या तीरावर घातपातासाठी उतरले. चकमक उडाली. जपानी सैनिकांच्या सावधगिरीने ब्रिटिश सैनिक पकडले गेले. अनर्थ टळला; पण त्यामुळे महावीर सिंग यांची गद्दारी उघड झाली. महावीर एकटे नाहीत, त्यांना कोण्या वरिष्ठाची फूस आहे, याची कुणकुण लागली. या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कर्नल निरंजन सिंग यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. सिंगापुरातील ‘माउंट प्लेझंट’ या मोहनसिंगांच्या बंगल्याला पिवळ्या जपानी सैनिकांचा गराडा पडला. निरंजनसिंग येथेच मुक्कामी आहेत, अशी खबर त्यांना लागली होती.

आझाद हिंद सेनेच्या कमांडर इन चीफच्या बंगल्याला जपानी सैनिकांचा वेढा? रागाने फुसफूसणारे मोहनसिंग ओरडले,

“हा काय प्रकार आहे?”

“महाविर ढिल्लनच्या गद्दारीत निरंजनसिंगांचा हात आहे. त्यांना अटक करायच्या ऑर्डर्स आहेत इवाकुरोंच्या!”

“माझ्या सैन्यातल्या माणसाला माझ्या परवानगीशिवाय अटक करायचा अधिकार इवाकुरोंना नाही!” मोहनसिंग

“सर आम्हाला ऑर्डर्स आहेत. तुम्ही कृपया यात पडू नका” जपानी सैनिक शक्यतो सामोपचाराने घ्यायचा प्रयत्न करत होते.

“जपान आता उघडउघड आझाद हिंद सेनेवर अधिकार गाजवायचा प्रयत्न करतोय. तसं असेल तर मी आझाद हिंद सेना आत्ताच्या आत्ता बरखास्त करत आहे!”

शेवटी कर्नल इवाकुरो यांना पाचारण केले गेले. त्यांनी रासबाबूंसमोर अडचण मांडली. शेवटचा प्रयत्न करण्यासाठी इवाकुरो आणि रासबिहारी एकत्र बसून मोहनसिंगांना समजावू लागले,

“फौज बरखास्त करण्याचा वेडेपणा करू नका मोहनसिंग! असा लढा उभारण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नाही, हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही” रासबिहारी कळकळीने म्हणाले.

“जपानी एजंटांकडून देशभक्ती शिकायची मला गरज नाही.”- मोहनसिंग

“तुमचा ताठा असाच कायम राहिला तर मला तुम्हालाही अटक करावी लागेल, हे लक्षात ठेवा!” कर्नल इवाकुरोंनी निर्वाणीचा इशारा दिला.

“जे व्हायचं असेल ते होऊ दे; सेना बरखास्तीच्या निर्णयावरून मी इंचभरही मागे येणार नाही!” मोहनसिंग उभे राहत म्हणाले.

सर्वांचाच नाईलाज झाला मोहनसिंग यांना अटक करून दूर जावा-सुमात्रा बेटांवर नेलं गेलं. या सगळ्याचा सेनेच्या संख्येवर परिणाम झाला. चाळीस हजारापर्यंत वाढलेली आझाद हिंद सेना आठ हजारावर येऊन थांबली. आता मोहनसिंग नव्हते; फुजिवाराही नव्हते. सत्यानंद पुरी आणि प्रीतम सिंगांनीही विमान अपघातात जगाचा निरोप घेतला होता. राहता राहिले वृद्धत्वाकडे झुकलेले रासबिहारी! सेना आणि लीग मिळून सर्व अधिकार पुन्हा रासबिहारींकडे गेले. जपानी भूमीवर उभा राहिलेला दोन भारतीयांमधला हा तंटा पाहून जपानची आझाद हिंद सेनेबद्दलची अनास्था वाढू लागली.

आझाद हिंद सेनेला आता चांगल्या नेतृत्वाची गरज होती. लष्करी, प्रशासकीय, आंतरराष्ट्रीय डावपेचांचे ज्ञान असलेल्या नेतृत्वाची! ही गरज पूर्ण करू शकणारी व्यक्ती फ्युररच्या गुहेतून बाहेर पडण्यासाठी अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. जमिनीवरून, हवेतून अथवा पाण्यातून जपानकडे निसटण्यासाठी सर्व शक्यतांचा क्रमाक्रमाने विचार करत होती. पुन्हा पुन्हा फिरून त्यातल्या त्यात कमी धोकादायक अशा जलप्रवासावर मनोमन शिक्कामोर्तब करत होती.

रासबिहारी थकलेल्या डोळ्यांनी किएल बंदराकडे, अटलांटिक समुद्रात उठणाऱ्या लाटांकडे, आणि त्याबरोबर संथपणे डोलणाऱ्या पाणबुडीकडे आशेने पाहत होते.

क्रमश: सुभाष बावनी ३१ | मोहनसिंग.

लेखक- अंबरीश पुंडलिक

ग्रंथ सूची:

१) जय हिंद आझाद हिंद- वि. स. वाळिंबे

Leave a comment