सुभाष बावनी ३२ | एमिली –
“सध्याच्या परिस्थितीत यापेक्षा अधिक तुमच्यासाठी जर्मनीला काही करता येईल, असं मला वाटत नाही…”
यापुढे हिटलर काय म्हणतो याची नेताजींना उत्सुकता लागली. हिटलर आपल्या खुर्चीवरून उठून भिंतीवर टांगलेल्या नकाशाजवळ जात म्हणाला,
“त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? जपान तुमच्या देशाच्या अगदी समीप पोहोचला आहे. जर्मनीचं मित्रराष्ट्र आहे. तुम्ही जपानला जा! तिथून तुम्हाला तुमच्या हालचाली जास्त वेगानं करता येतील. तुम्हाला जपानपर्यंत पोचवायची व्यवस्था आम्ही करू!”
हेच तर नेताजींना हवं होतं. ठरलं! जपानला जायचं हे नक्की ठरलं! निरोपानिरोपी सुरू झाली. फ्रांकेनबर्ग येथील आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची भेट घेऊन झाली. आजाद हिंद रेडिओची व्यवस्था लावली गेली. संपूर्ण आझाद हिंद संघाची जबाबदारी ए सी एन नंबियार यांच्यावर सोपवली गेली. त्यांच्या मदतीला व्यास आणि गणपुले हे होतेच. आता फक्त निरोप घ्यायचा होता तो एमिलीचा!
बाळंतपणासाठी एमिली माहेरी व्हिएन्ना येथे गेली होती. तिचा निरोप घ्यायला नेताजी व्हिएन्नाला पोहोचले.
एमिली, तिचे आई-वडील यांच्यासमोर जपानकडे जाण्याचा निर्णय नेताजींनी सांगितला. सर्वांचे चेहरे काळवंडले. नेताजी सर्वांची नजर चुकवत आपल्या मांडीवरच्या अनिताकडे पाहू लागले- ‘ही मोठी होऊन कुणासारखी दिसेल? माझ्यासारखी? हीचं भव्य कपाळ तर आतापासूनच आमच्या बोस कुटुंबाचीच ओळख सांगतेय.’
अनिताने नेताजींची तर्जनी आपल्या इवल्याशा हातात घट्ट धरून ठेवली होती. जणूकाही ती सात समुद्रापार जाऊ पाहणाऱ्या आपल्या पित्याला ‘जाऊ नका’ अशी गळ घालत होती. ‘कदाचित आपण हिला बोट धरून चालवू शकणार नाही; पण आयुष्यात केव्हा तरी आपलं बोट आपल्या बाळाने धरलं होतं’ ही भावना नेताजींना त्यातल्या त्यात समाधान देत होती. निघायची वेळ झाली. अनिताच्या मुठीतून बोट सोडवणं नेताजींच्या जीवावर आलं होतं. मातृभूमीच्या पायातल्या जडशीळ बेड्या एका ठोकरेसरशी खिळखिळ्या करून टाकणारा हा योद्धा, आपल्या छकुलीच्या नाजूक बोटांची बेडी मात्र सोडवू शकत नव्हता.
अनिताला कडेवर घेऊन एमिली नेताजींना निरोप द्यायला बाहेर आली.
“मी येऊ का सोबत?”
“अगं वेडी की काय तू? हे एवढं काम झालं की बाकी सगळं गांधीजींच्या पायावर ठेवून मी तुमच्यासाठी मोकळा आहे. मग बघ कसा मी तुम्हा दोघींना कलकत्त्याच्या रस्त्यातुन, कालीघाटावर, गंगेच्या काठावर फिरवतो ते! फक्त भारतात जाताना बंगाली पद्धतीची साडी नेसून जावं लागेल आणि गेल्या-गेल्या आमच्या माँला वाकून नमस्कार करावा लागेल बरं का!” नेताजी स्वतःच खळखळून हसत राहिले, एमिली मात्र गंभीर होती.
“का गं? काय झालं?”
“काही दिवसांपासून आपल्याबद्दल चर्चा ऐकू येत आहेत!”
“कसल्या चर्चा?”
“मिस्टर बोस सध्या एमिली शेंकेल नावाच्या तरुण रखेलीसोबत राहत आहेत अशा!” एमिलीने मान खाली घालत सांगितलं. नेताजींना क्षणभर काय बोलावं हेच सुचेना! युद्धाच्या धबडग्यात त्यांना या नात्याकडे कायदेशीरदृष्ट्या बघणे सुचलेच नव्हते. त्यांनी खिसे चाचपले. घाईघाईने कागद-पेन काढून त्यावर लिहिले,
“प्रिय मेजदा,
मी पुन्हा एकदा संकटांनी भरलेल्या अज्ञाताच्या प्रवासाला निघालो आहे. न जाणो मी परत येईल किंवा नाही? जर नाहीच; तर आपल्याला माहीत असावे म्हणून हे पत्र! मी युरोपात एमिली शेंकेल या तरुणीशी विवाह केला आहे. मला एक मुलगीही आहे. माझ्या पश्चात या दोघींना आपले बोस कुटुंब प्रेम, आपुलकी, आधार देईल याची मला खात्री आहे.
-आपला सुभाष!”
ते पत्र एमिलीच्या हाती सोपवून तिच्या हातातल्या झोळीतील लहानग्या अनिताच्या कपाळाचा पापा घेऊन नेताजी दूर काळोखात वाट पाहणाऱ्या गाडीकडे घाईघाईने निघाले. एमिली समारांगणाच्या यज्ञवेदीवर आपले आयुष्य अर्पण करण्यासाठी अधीरतेने जाणाऱ्या आपल्या पतीच्या पाठमोर्या मूर्तीकडे बघत होती. ‘त्याच्याइतकं खंबीर आपल्याला व्हावं लागेल’ असं स्वतःच्या मनाला बजावत होती. तिची नजर चुकवून अश्रूचा एक चोरटा थेंब मात्र गालावर ओघळला आणि थेट अनिताच्या कपाळावर जाऊन विसावला. त्या तेवढ्या ओल्या स्पर्शानंही अनिताची झोप चाळवली. तिला शांत करण्यासाठी एमिली हाताला झोके देऊ लागली. नेताजींची मोटार धुरळा उडवत निघून गेली होती.
क्रमशः सुभाष बावनी ३२ | एमिली.
लेखक- अंबरीश पुंडलिक
ग्रंथ सूची:
१) नेताजी- वि. स. वाळिंबे
२) महानायक- विश्वास पाटील