सुभाष बावनी ३३ | जर्मन पाणबुडीत

सुभाष बावनी ३३ | जर्मन पाणबुडीत

सुभाष बावनी ३३ | जर्मन पाणबुडीत –

बर्लिन स्टेशनवरून निघालेली आगगाडी धाड धाड आवाज करत अंधाराच्या पोटात धावत होती. व्हीआयपी कोचमध्ये नेताजी, नंबियार, जर्मन अधिकारी केप्लर यांच्यासमवेत बसलेल्या अबीद हसनला आपण नेमके कुठे निघालो आहोत, हे उमगत नव्हते. विचार करता करता केव्हा डोळा लागला, हे अबीदला कळले नाही. शेवटी गाडीच्या करकचून लागलेल्या ब्रेक मुळे जाग आली; तेव्हा बाहेरच्या अंधुक प्रकाशात ‘किएल स्टेशन’ ची पाटी दिसली. उतरण्याची लगबग सुरू झाली. सोबत आणलेल्या बॅगा घेऊन नंबियार पाठोपाठ अबीद खाली उतरला. ‘कुठेतरी’ जाण्यासाठी गाड्या तयार होत्या. अबीद निमूटपणे एका गाडीत जाऊन बसला. मोटारींच्या त्या ताफ्यांनी सर्वांना बंदरावर आणून सोडले. समोरच फेसाळत्या समुद्रात एक अजस्त्र पाणबुडी पाण्यावर हेलकावे खात उभी होती. शेवटी न राहवून अबीदने प्रश्न विचारलाच,

“न.. नेताजी तुम्ही कुठे निघाला आहात?”

“तुम्ही नाही. आपण! आपण जपानला जात आहोत” नेताजींनी समोरच्या अफाट समुद्राकडे पाहत उत्तर दिले. अबीद काहीही न बोलता त्या भल्या-थोरल्या पाणबुडीकडे विस्फारल्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्याकडून काहीही प्रतिसाद नाही, हे पाहून नेताजींनी मान वळवून अबीदकडे पाहत विचारलं,

“भीती वाटतेय?”

“अजिबात नाही. पण पाणबुडीने का?”

“विमान प्रवासात घातपात होण्याचा धोका आहे.”

जर्मन पाणबुडीचा कॅप्टन वॉर्नर म्युसेनबर्ग याने समोर होऊन हस्तांदोलन करत नेताजींचे स्वागत केले. नेताजी आणि अबीद हसन पाणबुडीत शिरले. केपलर आणि नंबियार यांच्याकडे पाहून निरोपाचे हात हलले. शेवटी एकदाची ती U-१८० पाणबुडी लाटांना हिसडे देत समुद्राच्या पोटात अदृश्य झाली. त्याबरोबरच अजून काही पाणबुड्यांनी आणि माईन स्वीपर फ्रिगेट्सनी पाण्यात सूर मारला. या आखूड फ्रिगेट्स मुख्य पाणबुडीच्या समोर धावून शत्रूने पाण्यात पेरलेले सुरुंग निकामी करण्याचे काम करणार होत्या.

बाहेरून अजस्त्र वाटणारी ही पाणबुडी आतून मात्र अगदीच छोटी होती. आतल्या खोलीत धड उभंही राहता येईना. वाकूनच हालचाल करावी लागे. त्यात पुन्हा यंत्रे, झोपण्याच्या फळ्या, जेवणाचे टेबल हा पसारा. हे कमी झाले म्हणून की काय, आत सर्वत्र डिझेलचा वास भरून राहिलेला. चादरींना तोच वास, खाल्लेल्या ब्रेडच्या तुकड्यांनाही तोच आणि पाण्यालाही तोच!

“आपला प्रवास किती दिवसांचा आहे नेताजी?” अबीदनं विचारून घेतलं.

“निदान अडीच-तीन महिन्यांचा तरी!” नेताजींनी उत्तर दिलं. ‘अडीच-तीन महिने आता लोळत काढायचे!’ या विचारासरशी आळोखेपिळोखे देत बिछान्यावर झोकून देण्याच्या तयारीत असलेल्या अबीदला नेताजींनी विचारले,

“तुम्हाला मी टाईप रायटर बरोबर घ्यायला सांगितले होते अबीद! आणला आहे ना?”

“अं..हो.. नेताजी. आणला आहे”

“मग काढा बाहेर. आपल्याला इंडियन स्ट्रगलचं उरलेलं लेखन पूर्ण करायचं आहे.”

जेवणासाठी नेमून दिलेल्या टेबलवर इतर वेळी टाईपराईटर ठेवून पुस्तक लेखन सुरू झालं. टाईपराईटरची ती शुष्क खडखड समुद्राच्या पोटातही घुमु लागली. पाणबुडीवरील जर्मन कर्मचाऱ्यांच्या लगबगीने नेताजींच्या विचारांची साखळी भंग होत नाही, याचं अबीदला राहून राहून आश्चर्य वाटे. क्षणाचीही उसंत न घेता नेताजी दिवसभर कामात गर्क राहू लागले आणि अबीदलाही वेळ मिळेनासा झाला.

वरवर पाहता निर्धास्तपणे चाललेल्या प्रवासात एके दिवशी सर्वांच्याच धैर्याची परीक्षा पाहणारा प्रसंग येऊन उभा ठाकला.

रात्रीच्या वेळी पाण्याच्या वरून वेगाने अंतर कापत निघालेल्या पाणबुडीसमोर अचानक एका अजस्त्र ब्रिटिश कार्गो दिसू लागली. कार्गोचा आकार पाहता हिच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही, हे सर्वांनाच कळून चुकलं होतं. कुठलाही हल्ला न करता जर्मन पाणबुडीवर ही कार्गो आदळली, तरी पाणबुडीतील सर्वांना स्वर्गाचे दार दिसणार होते. कार्गोची धडक चुकवण्यासाठी जर्मन कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली. जो-तो समोर दिसणार्‍या मृत्यूच्या भीतीने हादरून गेला होता. ब्रिटिश कार्गो बोट अतिशय वेगाने जर्मन पाणबुडीच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी अंगावर चालून येत होती.

“सूर मारा!”

“पाण्याखाली चला!”

“Fast!”

“मेलो!”

“देवा!” च्या आरोळ्या घुमू लागल्या.

नेताजींनी डिक्टेट केलेला शब्द टाईप करायचं सोडून अबीद थीजल्यासारखा या सगळ्या प्रकाराकडे पाहत होता. पाण्याखाली झालेल्या या मृत्यूत कफन नाही की माती नाही, हा विचार त्याच्या मनात चमकून गेला.

“लक्ष कुठे आहे अबीद?”

नेताजी खेकसले.

“अं? काय?” अबीद अजूनही जवळ जवळ येणाऱ्या कार्गोकडेच पाहत होता.

“आपल्या कामावर लक्ष द्या” नेताजींच्या आवाजात जरब होती. अविर्भावात भीतीचा लवलेशही नव्हता.

वॉर्नर म्युसेनबर्गच्या चपळ हालचालींनी पाणबुडीने पाण्याखाली झेप घेतली. ब्रिटिश कार्गो डोक्याला चाटून निघून गेली. मृत्यूला यशस्वी हुलकावणी दिली गेली होती. जो तो परमेश्वराचे आभार मानू लागला. नेताजी शांतपणे टाईप होऊन पडलेले कागद तपासत राहिले.

२६ एप्रिल १९४३! मोझांबीकच्या खाडीत मादागास्करजवळ जपानची I-२१ ही पाणबुडी कानोसा घेऊ लागली. लवकरच तिला दूरून येणारी जर्मन पाणबुडी दिसली. सुरुवातीला काही वेळ दोघांनीही एकमेकींचा अंदाज घेतला. ‘शत्रु नाही’ याची खात्री झाल्यावर दोन्ही पाणबुड्या एकमेकांच्या जवळ येऊ लागल्या. नेमका नको त्या वेळी समुद्र कोपला. लाटा फणा काढून वर झेपावू लागल्या. पाणबुड्यांना हादरे बसू लागले. एकमेकांवर आपटू नये, यासाठी पाणबुड्या दूर जाऊ लागल्या. समुद्र शांत होण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

वाट पाहण्यात रात्र सरली. सकाळ झाली. समुद्राचा जोर कमी व्हायचे चिन्ह दिसेना! शेवटी कॅप्टन म्हणाला,

“I recommend that you go back to Germany!”

यावर नेताजी कोलंबसाच्या अविर्भावात गरजले,

“Captain! I have not come all the way just to go back!”

जणू त्यांना म्हणायचे होते –

‘काय सागरी तारु लोटले परताया मागे? असे का हा आपुला बाणा। त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे; कशासाठी जपावे पराभूत प्राणा।‘

यानंतर अवघ्या जगाला नेताजींच्या अनंत ध्येयासक्तीचा नव्याने परिचय होणार होता. संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात एकमेव अशा साहसाला सामोरे जाण्यासाठी नेताजी सज्ज झाले होते.

क्रमशः सुभाष बावनी ३३ | जर्मन पाणबुडीत.

लेखक- अंबरीश पुंडलिक.

ग्रंथ सूची:

१) Netaji in Germany ( A little known chapter)- N. G. Ganpuley
२) कहाणी नेताजींची- य. दि. फडके
३) Bose- an Indian Samurai- जनरल जी. डी. बक्षी
४) नेताजी- वि. स. वाळिंबे
५) महानायक- विश्वास पाटील
६) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी

Leave a comment