सुभाष बावनी ३४ | जपानी पाणबुडीत –
जपानी पाणबुडीचा कॅप्टन मासाओ तेरोका चिंतातूर नजरेने समुद्राकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला जर्मन पाणबुडीवरील दोघेजण पाण्यात सूर मारताना दिसले. झपाझप अंतर कापत सैनिक जपानी पाणबुडीकडे सरकत होते. तेरोका किंचाळला-
“हा वेडेपणा आहे. परत जा! परत जा!”
नेटाने पोहत दोरखंड खांद्यावर घेतलेले सैनिक जपानी पाणबुडीजवळ पोहोचले. तेरोकाने लगोलग त्यांना वरती ओढून घेतलं. गणवेषातून निथळत्या पाण्यासह धापा टाकत जर्मन सैनिक विजयी मुद्रेनं तेरोका समोर उभे होते. त्यांना दम घ्यायचीही उसंत न देता तेरोका म्हणाला,
“ब्रावो! पण मिस्टर बोस हे राष्ट्प्रमुखाच्या तोडीचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या बाबतीत कुठलेही धाडस अंगाशी येऊ शकतं.”
“ही जोखीम पत्करायची आमच्या कॅप्टनचीही तयारी नाही, पण हीज एक्सलन्सी मिस्टर बोस ऐकायला तयार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूची विमानं टेहळणीसाठी बाहेर पडली आहेत, अशी बातमी आहे. जर काही करायचंच असेल तर लवकर करावं लागेल.” जर्मन सैनिक एका दमात बोलला.
“टेहळणीचा अंदाज होताच मला. ठीक आहे.”
लगोलग सोबत आणलेली दोरखंडं त्यांनी पाणबुडीच्या कठड्याला करकचून बांधली आणि म्युसेनबर्गच्या दिशेने सांकेतिक खूण केली. दुसरे टोक आधीच जर्मन पाणबुडीला बांधले असल्याने नेताजींना आता दोराच्या आधाराने जपानी पाणबुडी कडे सरकता येणार होतं. विशालकाय आकाराचे दोन तराफे पाणबुड्यांच्या मधल्या जागेत सोडले गेले. त्यावर नेताजी आणि अबीद हसन अलगद उतरले. वीस-वीस फूट उसळणाऱ्या लाटांसोबत द्वंद्व सुरू झालं. एका बाजूने म्युसेनबर्ग तर दुसऱ्या बाजूने तेरोका आपल्या डोळ्यांदेखत हिटलर आणि तोजोच्या तोलामोलाच्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याला खेळणं समजून मांडलेला हा थरार विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहू लागले.
दोरीला घट्ट धरून तराफ्याला आपल्या स्वतःच्या अंगबळाने समोर ओढायचे. मग दोरीवरचा एक एक हात समोर सरकवायचा. पुन्हा तेच! पुन्हा पुन्हा तेच! तेवढ्यात एखादी अवाढव्य लाट येई; तराफे मागे लोटले जात; पाण्याच्या त्या पडद्याआड दोघेही काही मिनिटे दिसेनासे होत. म्युसेनबर्ग- तेरोकांच्या तोंडचे पाणी पळे. तोच पुन्हा ओसरत्या लाटेसरशी नेताजी आणि अबीद हसन दृष्टीस पडत. अद्याप जिवंत असलेले दोघे पाहून दोन्ही कॅप्टन्सचा जीव भांड्यात पडे. काही अंतर कापलेले, त्यापेक्षा अधिक अंतर मागे गेलेले, कुणी श्वास घेण्याचा प्रयत्न करतंय तर कुणी हातातून सुटलेली दोरी जिवाच्या आकांताने पुन्हा पकडायचा प्रयत्न करतंय.
पाण्याच्या तडाख्यात एकमेकांवर आदळू नये, म्हणून पाणबुड्याही एका जागी स्थीर न ठेवता मागे पुढे कराव्या लागत.
नेताजी जिवाच्या आकांताने दोरी ओढत होते. मनात अखंड जप सुरू होता-
या देवी सर्वभूतेषु शक्तीरुपेण संस्थिता।
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः।।
रणचंडिकेच्या शक्ती स्वरूपाचा अखंड धावा करत नेताजी इंचाइंचाने पुढे सरकत होते. मध्येच अबीद कुठे आहे, हेही वळून वळून पाहत होते. अबीद मुद्दाम नेताजींच्या मागे चालत होता. हळूहळू अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापले गेले. जर्मन पाणबुडी मागे पडली. जपानी पाणबुडी नजरेच्या टप्प्यात आली. समोर कठड्याला चिकटून उभे असलेले जपानी सैनिक दिसत होते. तेरोका स्वतः हात देण्यासाठी वाकला होता. बस्स! आता एक रेटा आणि पोहोचलेच! थकलेल्या नेताजींनी होती नव्हती ती सगळी ताकद लावून दोर ओढला. चार-पाच सैनिकांनी नेताजींना धरून वर ओढून घेतलं. पाठोपाठ अबीदही पोहोचला. दिड-दोन तासांच्या झटापटीनंतर दोघांनी तांबरलेल्या डोळ्यांनी जपानी पाणबुडी गाठली. दोन्हीही कॅप्टन्सनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आनंदानं वेडा होत तेरोका म्हणाला,
“मिस्टर बोस मला अजूनही आश्चर्य वाटत आहे. कुठलाही अनुभव नसताना आपण हे अपूर्व धाडसाचं काम यशस्वीरित्या कसे काय पूर्ण करू शकलात?”
“मनातली जिद्दच माणसाकडून अचाट कामं करून घेते.” हसत-हसत, चिंब भिजलेल्या शर्टची बटणे काढत नेताजी बोलले.
दुरून दिसणाऱ्या नेताजींच्या मूर्तीला सॅल्युट करून म्युसेनबर्ग परत निघाला. जपानी पाणबुडी आपल्या रस्त्याला लागली.
पाण्याखालून साबांगचा रस्ता कापत असताना नेताजींनी तेरोकाला हटकले,
“भारताच्या दक्षिण किनाऱ्यासमोरून जेव्हा पाणबुडी जाईल तेव्हा सांगाल का?”
“सध्या आपण अगदी त्याच जागेवर आहोत सर!”
“मग कृपा करून पाणबुडी घटकाभरासाठी वरती घ्या”
“भलतंच काय! रात्रीच्या वेळी नाईलाज म्हणून पाणबुडी पाण्यावर घ्यावी लागते. सध्या तर दिवस आहे. शिवाय आपण शत्रूच्या टप्प्यात आहोत.” तेरोकानं वास्तविकता सांगितली.
“मला त्याची कल्पना आहे. तरीसुद्धा माझी विनंती आहे, की पाणबुडी थोड्या वेळासाठी वर घ्या. मला माझ्या मातृभूमीचे ओझरते दर्शन घेऊ द्या!”
नेताजींची विनंती तेरोकाला अव्हेरता आली नाही. त्याने घाबरत घाबरत पाणबुडी पाण्यावर घेतली. उत्तरेकडे पाहत नेताजींनी हात जोडले. मनोमन ‘आमार जन्मभूमी’ ची प्रार्थना केली. ‘यश येऊ दे!’ अशी पुनश्च एकदा आळवणी केली. पाणबुडी पुन्हा एकदा पाण्याखाली अदृश्य झाली.
बरोबर अठठयांशी दिवसांनंतर -दिनांक ६ मे १९४३ ला नेताजींनी जमीन पहिली. सांबांगच्या किनार्यावर पाणबुडी शांतपणे डोलू लागली. या प्रवासात नेताजींनी ‘मत्सुदा’ हे नाव धारण केलं होतं. जपानी जमिनीवर पाय ठेवताच ते ‘चंद्रा बोस’ होणार होते.
तेरोकाच्या डोक्यावरचं मोठ्ठं ओझं उतरलं. सगळा आनंदी आनंद झाला. नेताजींच्या चेहऱ्यावर कुठेही प्रवासाचा थकवा दिसत नव्हता. आता बोटीवरच्या प्रत्येकाला नेताजींसोबत फोटो काढून घ्यायचा होता. नेताजींनी आनंदाने फोटो काढले. प्रत्येकाच्या फोटोमागे न कंटाळता स्वाक्षरी केली. तेरोकाच्या प्रतीवरील स्वाक्षरीखाली संदेश लिहिला-
“या जलप्रवासाच्या सुखद आठवणी माझ्या मनात आयुष्यभर दरवळत राहतील. आपल्या विजयासाठी चाललेल्या लढ्यात ही घटना एक महत्त्वाचा टप्पा ठरेल!”
एका धाडसाच्या यशस्वी सांगतेनं पुढच्या निर्णायक धाडसांचं दार सताड उघडून दिलं होतं. त्याचं यशापयश मात्र बदलणार्या युद्ध परिस्थितीच्या लाटांवर हेलकावे खात होतं.
क्रमशः सुभाष बावनी ३४ | जपानी पाणबुडीत.
लेखक- अंबरीश पुंडलिक
ग्रंथ सूची:
१) कहाणी नेताजींची- य. दि. फडके
२) Bose- an Indian Samurai- जनरल जी. डी. बक्षी
३) नेताजी- वि. स. वाळिंबे
४) महानायक- विश्वास पाटील
५) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी