सुभाष बावनी ३५ | आझाद हिंद फौजेचे सर्वाधिकारी –
“आपनार स्वास्थ्य केमन आछे?”
आपल्या मायभूमीपासून शेकडो मैल दूर अशा जपानमध्ये रसगुल्ल्याच्या पाकात बुडवून काढलेले हे शब्द कुणाचे; हे पाहण्यासाठी वृद्ध रासबिहारींनी मान उचलताच त्यांना नमस्कारासाठी वाकणारे नेताजी दिसले.
“खूब भालो! खूब भालो!” आवेगाने सामोरे आलेल्या नेताजींना तेवढ्याच आवेगाने रासबाबूंनी हृदयाशी कवटाळले. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. भावनावेगाने दोघांनाही काही क्षण बोलता येईना.
“किती वाट बघायला लावलीत सुभाष? लवकरात लवकर तुमच्यासाठी सांभाळलेली ही आझाद हिंद सेना तुमच्या तरुण हातात घ्या! आमि एखन बूडा हये ग्याचि!”
ज्यांच्या दिल्लीतील चांदणी चौकातल्या पराक्रमाच्या सुरसरम्य कथा ऐकत ऐकत आपण मोठे झालो, त्या रासबिहारी बोसांनी आपली वाट पहावी याचं नेताजींना भूषण वाटलं. दोघेही वंगवीर कितीतरी वेळ हातात हात घेऊन गप्पा मारत बसले.
“घाई करायला हवी सुभाष! युद्धाचे रंग पालटायला लागलेत. गेल्या वर्षीचा जपान आज राहिलेला नाही. रशियामध्ये अडलेलं हिटलरचं घोडं तर आपण पाहूनच आला असाल.” रासबाबू म्हणाले.
“हो बाबूजी! हिटलरनं रशियावर आक्रमण करायला नको होतं.” गंभीर चेहऱ्यानं नेताजी म्हणाले.
“पण युद्धाचा निकाल काहीही लागो, आपण जर भारताच्या ईशान्य सीमेवर धडक देऊ शकलो, तर काम झालंच म्हणून समजा.” नेताजींनी वाक्य पूर्ण केलं.
“पंतप्रधान तोजोंचा मानस जाणून घ्यायचा प्रयत्न करा.”-रासबाबू
“हो” जनरल आरसूंकडे वळून नेताजी म्हणाले,
“तोजोंची भेट मिळण्याबद्दल मी तुमच्याशी बोललो होतो, त्याचं काय झालं जनरल?”
“आझाद हिंद फौजेशी डील करण्यासाठी जपाननं स्वतंत्र समिती स्थापन केली आहे हे आपण जाणताच. त्याचं नेतृत्व सुरुवातीला मेजर फुजीवारा करायचे, नन्तर इवाकुरो यांच्याकडे ते काम होतं, सध्या यामामोटो करतात. त्यामुळे आपल्याला जे बोलायचं आहे ते यामामोटोंशी बोलता येईल; फारच झालं तर फिल्डमार्शल तेराउची! पंतप्रधानांशी बोलायची गरजच काय?” आरसूंनी बेफिकीरीनं उत्तर दिलं. त्यांना वाटलं अजून आपण मोहनसिंगांच्याच पातळीच्या माणसाशी बोलतोय.
“कारण मी माझ्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो म्हणून. राष्ट्रप्रमुखाच्या नात्यानं मी इथे आलोय म्हणून. तुमच्या राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्या माणसांशीच मला बोलावे लागेल. मग ते अधिकार जर यामामोटोंकडे असतील तर माझी काही हरकत नाही.” नेताजींच्या आवाजात धार होती. हॉटेल इम्पेरियलच्या त्या वातानुकूलित कक्षातही जनरल आरसूंना घाम फुटला.
“मी पंतप्रधानांशी आपली भेट लवकरात होईल याची व्यवस्था करतो” आरसू गडबडीने म्हणाले.
यानंतर रासबाबू नेताजींना घेऊन सिंगापूर येथे भरणाऱ्या आझाद हिंद संघाच्या परिषदेला निघाले. परिषदेच्या मंचावर रासबाबूंच्या समवेत विराजमान झालेल्या नेताजींना पाहून जमलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता.
‘सुभाषजी सुभाषजी वो जाने हिंद आ गये’ या गीतानंतर रासबिहारी बोलायला उभे राहिले-
“मागच्या वेळी मी तुम्हाला एक अमूल्य भेट देण्याचं कबूल केलं होतं. हीच आहे ती अमूल्य भेट!” असं म्हणून रासबाबूंनी नेताजींकडे बोट दाखवलं. हजारो हजारो कंठांतून ‘नेताजी जिंदाबाद’, ‘रासबाबू जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’ चे नाद उठले. रासबिहारी बोसांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,
“आता मी म्हातारा झालो आहे. त्यामुळे आझाद हिंद सेनेसहित हा सगळा डोलारा आता नेताजी तुम्ही आपल्या हातात घेऊन मला मोकळं करा. पराक्रम करा. देशाला स्वतंत्र करा.” लगोलग माईकचा ताबा घेत नेताजी म्हणाले,
“बाबूजी आम्हाला आपल्या पंखाखाली राहूनच पराक्रम करायचा आहे. आम्ही तुम्हाला तसं सोडणार नाही.”
नेताजी हसत होते. रासबिहारी डोळे टिपत होते. जनता आलटून पालटून देशप्रेमाचे दोन उत्कट आविष्कार मंचावर पाहत होती. टाळ्यांच्या गजरात आझाद हिंद सेनेच्या अधिकारपदाची माळ नेताजींच्या गळ्यात पडली.
यानंतरचं काम थोडं कठीण होतं. रासबिहारी- मोहनसिंग या द्वंद्वामुळे गोंधळलेल्या सैनिकांना सामोरं जायचं होतं.
नेताजींनी साध्याच पण मनाला जाऊन भिडणाऱ्या शब्दात सुरुवात केली,
“माझ्यापाशी तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. या रात्रीच्या गर्भात विजयच लपला असेल याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही. दुःख-वेदना-अश्रू-विरह-उपासमार-मृत्यू याशिवाय मला तरी काहीच दिसत नाही. आपल्यापैकी किती जण जिवंत राहतील, हेही माहीत नाही; पण एकच वचन देतो- हे सगळं सहन करताना मी तुम्हा सर्वांच्या समोर असेल. आपल्या बलिदानातूनच स्वतंत्र भारताचा उदय होईल. उद्याच्या स्वातंत्र्यासाठी आज आपल्याला बलिदान करावेच लागेल. रणभूमी स्वातंत्र्याच्या बदल्यात रक्त मागते आहे. बोला! आहे तयारी? तुम मुझे खून दो! मैं तुम्हे आजादी दूंगा!”
मृत सैनिकांमध्येही प्राण फुंकणाऱ्या शालिवाहनाची कथा रासबाबूंनी ऐकली होती; पण देशाभिमान गमावलेल्या सैनिकांमध्ये आपल्या साध्याच प्रतिपादनाने देशभक्तीचा अंगार चेतवणाऱ्या नेताजींच्या संवादाने त्याचा प्रत्यय आज येत होता. फौजेची संख्या झपाट्याने वाढू लागली.
मलेशिया, सिंगापूर, ब्रह्मदेशात नेताजींच्या सभा होऊ लागल्या. हात उंचावून नेताजी लोकांना आवाहन करू लागले,
“मला तीन कोटी रुपये आणि तीन लाख माणसे हवी आहेत. बोला आहे का तयारी?” या आवाहनासरशी मोठमोठे धनाढ्य व्यापारी आपली सगळी स्थावर-जंगम मालमत्ता नेताजींच्या पायाशी अर्पण करू लागले. स्त्रिया आपले सौभाग्यालंकार काढून देऊ लागल्या. बालगोपाल आपले खाऊचे डबे रिकामे करू लागले. त्यातूनच आझाद हिंद बँक जन्माला आली. या बँकेची मुद्रा छापण्याची व्यवस्था टोकियोमध्ये आकारास येऊ लागली. सैन्य, पैसा, सहकार्य यांची जमवाजमव झाली. पण कशाची तरी कमतरता होती.
सिंगापूरच्या कार्तोग भागातील समुद्रालगतच्या प्रशस्त बंगल्यातील आपल्या दालनात नेताजी अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांची मुद्रा गंभीर दिसत होती. समुद्राची गाज प्रसंगाचं गांभीर्य आणखी वाढवत होती. काहीतरी वेगळं, पूर्वी न झालेलं साकार होण्याच्या मार्गावर होतं. पहाऱ्यावरचा सैनिक ‘जागते रहो’ ची आरोळी देत होता. नेताजी आणि त्यांचा पेंगणारा ऑर्डरली वगळता सगळं सिंगापूर मात्र गाढ झोपलं होतं.
क्रमशः सुभाष बावनी ३५ | आझाद हिंद फौजेचे सर्वाधिकारी.
लेखक- अंबरीश पुंडलिक.
ग्रंथ सूची:
१) जय हिंद आझाद हिंद- वि. स. वाळिंबे.
२) नेताजींचे सहवासात- पु. ना. ओक
३) नेताजी- वि. स. वाळिंबे
४) महानायक- विश्वास पाटील
५) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी