सुभाष बावनी ३६ | आझाद हिंद सरकार –
“फौज वगैरे ठीक आहे नेताजी; पण सरकार स्थापन करणं एवढं गरजेचं आहे का?” बॅरिस्टर राघवन नेताजींना विचारत होते.
“नि क डी चं आहे!” एका एका अक्षरावर जोर देत नेताजी म्हणाले. प्रश्नार्थक चेहरा करून राघवन नेताजींकडे पाहू लागले. नेताजी म्हणाले,
“आपल्या फौजेच्या पाठीशी जर आपले स्वतःचे सरकार नसेल तर ती जपानच्या तालावर नाचणारी, बेईमान भाडोत्री गुंडांची गर्दी ठरेल. सरकार स्थापन झाल्याबरोबर जपान आपल्याला दोस्त राष्ट्रांची जागा देईल. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपण अक्ष गटाच्या निर्णयावर अधिकारानं बोलू शकू. आपली पसंती अगर नापसंती दर्शवू शकू!”
“हे खरंच असं होईल?” विश्वास न बसल्यासारखं राघवन यांनी विचारलं.
“आझाद हिंद सरकारचे अस्तित्व मान्य केल्यावर जपानला हे करावंच लागेल.” नेताजी हसत हसत म्हणाले.
“यासाठीच एकवीस ऑक्टोबरला ठरलेला आपल्या आझाद हिंद सरकारचा शपथविधी थाटामाटात व्हायला पाहिजे. आज रात्री मी आणि अय्यर आपल्या सरकारचा जाहीरनामा लिहून काढणार आहोत. तुम्ही कॅथे थिएटर मधील व्यवस्थेकडे लक्ष द्या.”
रात्री भोजनाच्या वेळी एस ए अय्यर हे नेताजींचे टंकलेखक आले. दोघांनी एकत्र जेवण करून जाहीरनाम्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करेपर्यंत मध्यरात्र झाली होती. टिपणे काढण्यासाठी हाती जमवलेल्या आखूड कागदांवर नेताजी भराभर लिहू लागले-
“अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात पराभूत झाल्यावरही भारतीय जनतेने शंभर वर्षांच्या अवधीत कठीण आणि निश्चयी संघर्षाची अविरत मालिका सुरू ठेवली. त्या काळाचा इतिहास अनेक अजोड वीरत्वाच्या आणि स्वार्थत्यागाच्या उदाहरणांनी ओसंडून वाहत आहे. त्या इतिहासाच्या पानापानावर मंगल पांडे, सिराजउद्दौला, हैदरअली, पेशवा बाजीराव, अयोध्येच्या बेगमा, राणी लक्ष्मीबाई, महाराज कुँवरसिंग, नानासाहेब, तात्या टोपे यांची नावे सुवर्णाक्षरात झळकलेली आहेत…”
संदर्भासाठी हातात कुठलाही चीठोरा नाही. टेबलावर ऐतिहासिक पुस्तकांचा पसारा नाही. नेताजींच्या मन-मस्तिष्कात स्वातंत्र्यासाठी तळमळणारा भारतच जणू शब्द प्रसवित होता. पहिला कागद लिहून होताच घाईघाईने अय्यर तो टाईप करायला धावले. तो पूर्ण होत नाही, तोच दुसरा कागद घेऊन अबीद हसन हजर! अबीद नेताजींच्या खोलीत परतेपर्यंत पुढचा कागद घेऊन स्वामी निघालेले. रात्रभर हसन आणि स्वामी यांच्या चकरा चाललेल्या. नेताजी सहा-सात तास अखंड लिहीत होते आणि अय्यर टाईप करत होते. शेवटी सकाळी सहा वाजता लेखनाचे काम संपले. नंतर एका स्वल्पविरामाचाही बदल करावा लागला नाही.
टाईप होऊन पडलेले ते कागद पाहून अय्यरांचे शब्द बाहेर पडले, “काल रात्री मला एका थोर पुरुषाचे दर्शन झाले. हा बहुमूल्य कागद टाईप करण्यासाठी नेताजींनी माझी निवड केली, याचा मला मी जिवंत असेपर्यंत अभिमान वाटत राहील.”
नेताजींनी टाईप केलेले कागद पुन्हा एकवार वाचले आणि ते समाधानाने घटकाभर विश्राम करण्यासाठी खोलीत जायला निघाले.
२१ ऑक्टोबर १९४३! सिंगापुरातील कॅथे थिएटरकडे सकाळपासूनच हिंदी लोकांच्या झुंडी निघाल्या होत्या. पूर्व आशियातील हिंदी स्वातंत्र्य संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब्रम्हदेश, मलेशिया, थायलंड मधून भारतीय वंशाचे अनेक लोक दाटीवाटीने बसले होते. संपूर्ण सभागृह पताका, फलक आणि तिरंगी झेंडे यांनी सजले होते. मंचावर ध्वनिक्षेपकांची रांग ठेवली होती. नेताजींचे आगमन होताच सैनिकांच्या बुटांचे खाडखाड आवाज होऊ लागले. सलामी दिली जाऊ लागली. लष्करी गणवेश, गुडघ्यापर्यंत उंच चामडी बूट, खादीच्या शर्टच्या छातीवर भारताचा नकाशा आणि तिरंगी ध्वज. टोपीवर दोन झगझगीत पितळेची बटणे, असा पेहराव केलेली नेताजींची लोभसवाणी मूर्ती गाडीतून उतरली. आणि सरळ मंचाच्या दिशेने चालू लागली.
बॅरिस्टर राघवन यांच्या प्रस्ताविकानंतर नेताजी शपथ घ्यायला उभे राहिले. गंभीर आवाजातल्या त्या शपथेचे ध्वनि कॅथे थिएटरमध्ये उमटू लागले-
“मी सुभाषचंद्र बोस; अशी गंभीर शपथ घेतो की हिंदुस्थानला आणि माझ्या अडतीस कोटी देशबांधवांना…”
नेताजी अडखळले.. थांबले… का थांबले बरं? काही चुकीचं लिहिलं गेलंय का कागदावर? नेताजींनी चष्मा काढला. रुमालाने आपले डोळे कोरडे करण्याचा, अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला; पण छे अडतीस कोटी बांधवांची दैन्यावस्था आठवून फुटलेला हुंदका काही आवरेना! भारताच्या स्वातंत्र्याबद्दल आस्था असणारे, नसणारे सर्वच सभागृहात उपस्थित असलेले नागरिक नेताजींचे हे अकृत्रिम देशप्रेम पाहून थक्क झाले. कशीबशी नेताजींनी शपथ पूर्ण केली. आता ते या सरकारचे राष्ट्रप्रमुख- पंतप्रधान- परराष्ट्रमंत्री- युद्धमंत्री आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते! यानंतर ते जिथे जिथे जातील, तिथे तिथे ललकार्या घुमणार होत्या- “होशियाsssर.. हीज एक्सलन्सी! नेताजी सुभाषचंद्र बोस! पंतप्रधान अर्जी हुकूमत ए आजाद हिंद! सुप्रीम कमांडर आझाद हिंद फौज! आ रहे है… निगा रखो मेहरबान…!”
२३ ऑक्टोबर १९४३ या दिवशी आझाद हिंद सरकारने इंग्लंड आणि अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि अक्ष राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
पंतप्रधान? सरकार? टीचभरही जमीन ज्याच्या अधिपत्याखाली नाही असा पंतप्रधान? वा रे सरकार! अ किंग विदाऊट किंग्डम! अशी थट्टा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात सुरू झाली. लगोलग पंतप्रधान टोजो यांनी जपानी संसदेत ‘अंदमान-निकोबार बेटं आम्ही आझाद हिंद सरकारच्या ताब्यात देत आहोत’ अशी घोषणा केली. जन्म जन्म मरणप्राय यातना भोगलेल्या क्रांतिकारकांच्या स्मरणभूमीत जाऊन नेताजींनी झेंडा वंदन केलं- तेही जपानने भेट दिलेल्या तिरंगी झेंडा आणि भरतभूमीचा नकाशा डौलाने मिरवणाऱ्या विमानात बसून! नेताजींनी ह्या बेटांचे नाव ‘शहीद बेट’ आणि ‘स्वराज बेट’ असे ठेवले.
पाहता-पाहता १९४४ साल उजाडलं. आता घाई केली पाहिजे. पाऊस सुरू व्हायच्या आत भारताचा ईशान्य किनारा गाठला पाहिजे. आरकानच्या निबीड अरण्यात, काबवा दरीच्या खोल खोल गर्तेत, माऊंट पोपाच्या जीवघेण्या कड्यांवर मृत्यूचं थैमान घालण्यासाठी कृष्णमेघ समुद्रावरून घाईघाईने निघाले होते. चिंद्विन, सालविन, इरावती या नद्या आपल्या अजस्त्र प्रवाहानं सैनिकांना वाकुल्या दाखवत होत्या. चेरापुंजी आणि मौसिनराम पावसाचा नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाले होते. आणि या सगळ्या प्रतिकूलतेवर कडी करत आझाद हिंद सेनेची पहिली डिव्हिजन जपानी सैनिकांच्या हातात हात घालून भारताच्या सीमेकडे सरकण्यासाठी सज्ज झाली होती.
क्रमशः सुभाष बावनी ३६ | आझाद हिंद सरकार.
लेखक- अंबरीश पुंडलिक
ग्रंथ सूची:
१) जय हिंद आझाद हिंद- वि. स. वाळिंबे
२) नेताजींचे सहवासात- पु. ना. ओक
३) नेताजी- वि. स. वाळिंबे
४) महानायक- विश्वास पाटील
५) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी