सुभाष बावनी ३७ | कदम कदम बढाये जा –
“नेताजींच्या गाडीला हिरवा रंग द्यायचा राहून गेलाय रे! नेताजींना कधीही मायम्योकडे निघावे लागेल. लवकर कामाला लागा!”
नेताजींच्या रंगून येथील मुख्यालयात कुणीतरी ओरडत होतं.
“मनसुख तुझी शिध्याची पिशवी घेऊन जा; की एकदम भारताच्या भूमीत पाय ठेवल्यावरच आपल्या मातीतलं अन्न खायचा विचार आहे?” आझाद हिंद सेनेच्या छावणीत उत्साहाने भरलेले संवाद झडत होते.
या सगळ्या धावपळीला कारणही तसंच होतं. आझाद हिंद सेनेची पहिली डिव्हिजन आज इम्फाळ-कोहिमा आघाडीकडे कूच करणार होती.
जानेवारी महिन्यातच जपानच्या आक्रमणाला प्रारंभ झाला. आराकानच्या अरण्यात जनरल कवाबेंनी तीन डिव्हिजन सैन्य उतरवलं होतं- केवळ ब्रिटिशांना हूल देण्यासाठी! जपानी सैनिक आझाद हिंद सैनिकांना सोबत घेऊन आराकानच्या जंगलातून चितगावकडे मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात आहेत, असा देखावा निर्माण करण्यासाठी! याकरता जपानी सैन्याच्या आघाडीवर एक आझाद हिंदची बटालियन लढत होती. एकदा का ब्रिटिशांनी आपल्या फौजा आराकानमध्ये उतरवल्या, की जनरल सातोची एकतिसावी डिव्हिजन, यामायुचीची पंधरावी डिव्हिजन, यानागिडाची तेहेत्तीसावी डिव्हिजन आणि आझाद हिंद फौजेची आघाडीची डिव्हिजन मिळून इंफाळ-कोहिमावर तुटून पडणार होते. याशिवाय दोन राखीव डिव्हिजन चीन-अमेरिका संपर्क तोडण्यासाठी ब्रह्मदेशात तैनात करण्यात आल्या होत्या.
सगळे श्वास रोखून आराकानमध्ये मासा गळाला लागायची वाट पाहत बसलेले. आणि झालंही तसंच!
ब्रिटिशांनी दोन डिव्हिजन्स आराकानमध्ये उतरवल्या मात्र; चिंदविन नदीच्या पूर्वेकडच्या काठावर इंफाळ-कोहिमावर चालून जाण्यासाठी जपानी सैन्य उभं ठाकलं.
तिकडे ब्रिटिश सैन्य थोडं बेफिकीरीतच होतं. “छाती दडपून टाकणारे जीवघेणे कडे चढून, साक्षात मृत्यूची सावली असणारी काबवा दरी ओलांडून यायला जपानी मूर्ख थोडेच आहेत?” या शहाणपणावर ब्रिटिश अधिकारी जनरल स्कून्स निर्धास्त होता.
आभाळाला हात लावणारे उंच उंच सुळके पाहून चिवट जपान्यांना जणू स्फुरण चढलं. त्या कडेकपारीच्या काखे-बगलेत हात घालून बुटके जपानी सैनिक माकडीणीच्या पिलासारखे त्या आव्हानात्मक कड्यांना झोंबू लागले. एकदाचं काबवा दरी आणि सरळसोट कडे पार करून जपानी- आझाद हिंद सैन्य वर आलं. दूर क्षितिजापर्यंत पसरलेला निबिड अरण्याचा हिरवा पडदा फाडून जपानी सैनिक कोहिमाच्या पठारावर उड्या मारू लागलं. कालपर्यंत सामसूम असणारं कोहिमाचं पठार आज अचानक जपानी सैनिकांनी गजबजून गेलं.
टेकाडांवर तोफांची जुळवाजुळव सुरू झाली.
जनरल सातोनं कोहिमाच्या पठारावर घटकाभर टेकून दुर्बिणीनं अंदाज घेतला. अजूनही ब्रिटिशांना संभाव्य जपानी आक्रमणाची चाहूल लागलेली नव्हती. गावकऱ्यांचे रोजचे व्यवहारही शांतपणे चालले होते. हाच बेसावध क्षण पकडून सातोनं आपल्या सैनिकांना आक्रमणाची आज्ञा दिली-
‘धाड.. धाड.. धडाड.. धूम.. धूम..शट ट ट ट……’
सातोच्या तोफा कोहिमाच्या अंधार्या आकाशात दिवाळीची रोषणाई करू लागल्या.
‘आले! आले! जपानी आले!’ असा गदारोळ कोहिमा गावात सुरू झाला. कसे आले? विमानानं की पंख लावून उडून आले? ज्याला त्याला आश्चर्य वाटू लागलं. चाचपडत ठेचकाळत ब्रिटिश प्रतिकार सुरू झाला.
इंफाळचीही तीच अवस्था होती. अमावस्येच्या रात्री भूतं निघावीत, तशी यामायुचीची ही पिवळी भुतावळ इम्फाळमध्ये दिवसा नाचू लागली. दोन्हीही गावांभोवती जपानी-हिंदी सैनिकांचा वेढा पडला. सुरुवातीला गाफील असलेलं ब्रिटिश सैन्यही लढू लागलं. सिंगापुरात गमावलेली आपली इभ्रत वाचवायचा प्रयत्न करू लागलं.
आझाद हिंद सैनिकांनी मोईनरांग घेतलं- १४ एप्रिल १९४४! भारतीय भूप्रदेशातलं जिंकलेलं पहिलं गाव!
तेवढ्यात खबर आली की ब्रिटीशांच्या आराकानमधल्या दोन्ही डिव्हिजन्सना जपानी सैन्याचा वेढा पडला आहे. त्यात भर म्हणून की काय; जनरल सातोनं इंफाळवरून कोहिमाला जाणारा रस्ताही दाबून धरला. आता इम्फाळमधल्या गोऱ्या सैनिकांना समोरही येता येईना आणि मागेही जाता येईना.
सिल्चरकडून अन्नधान्य घेऊन येणाऱ्या रस्त्यावरचा पूल उडवल्याशिवाय बिशनपुर हाती येणार नाही, हे पाहून हिंदी सैनिकांनी पोटाला स्फोटकं बांधून तो पूल उडवला.
हवाई ताकदीवर गमजा मारणाऱ्या ब्रिटीशांची खोड मोडण्यासाठी पालेलच्या विमानतळावर हल्ला केला. उखरुळ, टामू , मोरे या भागात आझाद हिंद सैन्य धावू लागलं. जिंकलेल्या मुलखात ए सी चटर्जींच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचं प्रशासन सुरू झालं.
आराकानमध्ये दोन डिव्हिजन तळमळत आहेत; इम्फाळ आणि कोहिमाचा श्वास कोंडलेला; कुठूनही रसद मिळण्याची शक्यता नाही, यामुळे दबकत दबकत शरणागतीची भाषा स्टीलविल- स्लिम-स्कून्स या ब्रिटिश गोटात बोलली जाऊ लागली. मायम्योमध्ये उभा असलेला रेने मुतागुचि कमरेवर हात ठेवून विकट हास्य करू लागला.
साऊथ ईस्ट एशिया कमांडचा सूत्रधार डीकी माउंटबॅटन सिलोन येथे आपल्या मुख्यालयाच्या अंगणात आकाशातल्या देवाची करूणा भाकू लागला. कधीही अस्ताला न जाणाऱ्या माझ्या साम्राज्यावरचा आढ्यतेखोर सूर्य आपल्याच हातांनी चिंदविनच्या पात्रात बुडतो की काय? या विचाराने त्याची मुद्रा काळवंडली. तोच त्याच्या चेहर्यावर पावसाचा एक टपोरा थेंब पडला. पाऊस?
पाऊस? आकाशात डवरून आलेल्या काळ्याशार ढगांकडे खंदकात संगिनी हातात धरून बसलेले हिंदी- जपानी सैनिक धास्तावून पाहत होते. सुर्यास्ताच्या आधी जयद्रथ वध करण्याची शपथ घेतलेल्या अर्जुनाने एकाएकी अस्ताला गेलेल्या सूर्याकडे पाहावं, तसंच! पाऊस पडला तर अग्नीकाष्ठं नाही; पण झाडांची ओली काष्ठं, झाडपाला, गवत भक्षण करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर नक्कीच येणार होती. या ठिकाणी कुणीही योगेश्वर ऐनवेळी आपले सुदर्शन चक्र आवरून लख्ख सूर्यप्रकाश पाडणार नव्हता; अधर्माच्या नाशाची वाट मोकळी करून देणार नव्हता; उलट नियतीच इथं प्रच्छन्नपणे हसत प्रतिकूलतेशी झगडत शक्यताशक्यतांचे अगणित दरवाजे ठोठावत जगभर हिंडणाऱ्या एका स्थीतधीच्या मनात चलबिचल उडवून देण्याचा क्रूर खेळ खेळत होती.
आपल्या मातृभूमीचा सोनेरी कडांचा नकाशा आपल्या छातीवर मोठ्या गौरवाने मिरवणारा ‘तो’ मात्र छातीवर हात बांधून कधी कोसळू पाहणाऱ्या आकाशाकडे तर कधी मोडून पडणाऱ्या आपल्या स्वप्नांच्या मनोऱ्याकडे शांतपणे पहात होता. आकाशातून मुसळधार पाऊस सुरू झाला होता.
क्रमशः सुभाष बावनी ३७ | कदम कदम बढाये जा.
लेखक- अंबरीश पुंडलिक
ग्रंथ सूची:
१) Bose- an Indian Samurai- जनरल जी. डी. बक्षी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील