सुभाष बावनी ३८ | तात्पुरती माघार

सुभाष बावनी ३८ | तात्पुरती माघार

सुभाष बावनी ३८ | तात्पुरती माघार –

“सर आपण दिमापुरवर चालून गेलो तर?” तो तरुण जपानी स्टाफ ऑफिसर चाचरतच जनरल सातोला विचारत होता.

“दिमापूर? कुठे आहे दिमापूर?” जनरल सातोनं टेबलावरच्या नकाशावर नजर फिरवत विचारलं.

“हे बघा सर!” नकाशावर बोट ठेवून तो स्टाफ ऑफिसर उत्तरला, “ब्रिटिशांचं शेवटचं रेल्वेस्थानक. याठिकाणी अन्नधान्याचा भरपूर साठा असण्याची शक्यता आहे असं म्हणतात.”

“शक्यता? आणि या शक्यतेसाठी मी भिरभिरत्या ब्रिटिश विमानांखालून पाठ जाळत जाऊ काय?”

“सर या ओल्या खंदकात पोट जाळत पडून राहिल्यापेक्षा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?”

“जनरल मुतागुचि साहेब जोपर्यंत विमानांचं कव्हर देत नाहीत तोपर्यंत मी हलणारही नाही इथून!”

“सर, सध्याची युद्धपरिस्थिती पाहता आपल्याला विमानाचं कव्हर मिळेल असं वाटत नाही.”

“मग मी सुद्धा दिमापूरवर हल्ला करू शकेल असं मला वाटत नाही” स्टाफ ऑफिसरला निघून जाण्याचा इशारा करणारे हातवारे करत सातो म्हणाला. स्टाफ ऑफिसर सातोच्या तंबूतून चरफडत बाहेर पडला.

ब्रिटिश सैन्याकडून आझाद हिंद सैनिकांना आमिष दिलं जात होतं. विमानातून पत्रकं पडत होती- “आमच्याकडे या! मायबाप ब्रिटिश सरकार दयाळू आहे. झालेल्या चुका क्षमा करेल. तीन महिन्यांचा आगाऊ पगार मिळेल!” उपाशी आझाद हिंद सैनिक ही पत्रकं वाचत. उपाशी पोटावरुन हात फिरवत. थांबलेल्या पगाराअभावी झालेली कुटुंबाची दैन्यावस्था डोळ्यासमोर उभी राही. पण लगेच ‘रक्त रक्ताला बोलावते आहे!’ ही नेताजींची घनगंभीर वाणी कानात घुमू लागे. पोटावरचा हात छातीवर सरके. मातृभूमीसाठी नेताजींच्या साक्षीने घेतलेली शपथ त्यांना आठवे आणि सगळं काही विसरून उपाशी पोटानं, झोक जात असलेला तो सैनिक ओल्याचिंब गणवेशात संगिनीवरची पकड आणखी मजबूत करी.

पण मेजर भुरेवालची निष्ठा मात्र या प्रलोभनांनी ढळली. रात्रीच्या वेळी कुणाचं लक्ष नाही, हे पाहून तो मोठी मोठी पावले टाकत निघाला. ब्रिटिशांच्या छावणीआधी लागणारा ओढाही त्यानं ओलांडला. पहाऱ्यावर असणाऱ्या ब्रिटिश-हिंदी सोजीराला त्यानं आपल्या बेइमानीची आण दिली. त्या सैनिकानं आणखी दोघांना बोलवलं. जनरल स्कून्सच्या झोपडीकडे तिघेही चालू लागले.

“नमकहराम भुरेवाल! गद्दारीनंतर तू कसा दिसतोस हे दाखवायला आलास काय?” भुरेवालला पाहून स्कून्स बिथरला.

“मी जी माहिती घेऊन आलोय ती पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल सर!” भुरेवाल हसत म्हणाला.

“कसली माहिती? तुम्हा गद्दारांमुळेच त्या सुभाष बोसला अवसान आलंय. ते काही नाही. आत्ता मला वेळ नाही. मला शरणागतीची औपचारिकता पूर्ण करायची आहे बस्स!”

“कुणासमोर शरणागती? त्या उपाशी जपान्यांसमोर की अन्नाच्या एका घासासाठी मोहताज असणाऱ्या भिकारी आझाद हिंद समोर?” भुरेवाल

स्कून्सला ही नविनच माहिती मिळत होती.

“अरे पण ती आझाद हिंदची दुसरी डिव्हिजन…?”

“कसली काढली आहे दुसरी डिव्हिजन! पहिल्या डिव्हीजनचेच अर्धे सैनिक तुमच्या गोळ्यांनी भाजून काढलेत. उरलेले बसलेत खंदकाच्या चिखलात रुतून! एक जोरदार धक्का द्यायची गरज आहे फक्त!”

“अरे पण धक्का कुठे द्यायचा हे माहित झाल्याशिवाय…”

“मी सांगतो ना! हे घ्या नकाशे! हे.. हे.. आझाद हिंदचे खंदक.. ही जपानी सैनिकांची छावणी…” स्कून्सची नजर भुरेवालनं आणलेल्या नकाशावरून फिरत होती. मन येशूला धन्यवाद देत होतं. ब्रिटिश साम्राज्यावर पडू पाहणारा पराभवाचा काळाकुट्ट डाग वितळत चालला होता.

विमानांनी आकाशात झेप घेतली. आता नेमक्या ठिकाणी गोळीबार होत होता. जपानी- हिंदी सैनिक खंदकातच मरून पडत होते. आश्चर्य करायलाही वेळ मिळत नव्हता. त्यातच तेहेत्तीसाव्या डिव्हिजनच्या यानागिडाचा काहीतरी गैरसमज झाला. संदेश अर्धवटच उमटला कागदावर.. आणि अर्धवट गिळलेली ब्रिटिशांची सातवी डिव्हिजन सोडून तो माघारी निघाला.

अमेरिकेकडून मिळणारी विमानांची रसद वाढू लागली. आराकानमधली वेढलेली फौज उचलून ती इंफाळकडे रवाना केली गेली. आता इंफाळ- कोहीमाच्या भोवतालच्या खंदकातील जपानी- हिंदी सैनिकांचे आयुष्य हे खाटकाच्या दारात बांधलेल्या बोकडाइतकंच उरलं होतं.

इंफाळ-कोहिमाचा वेढा आता याहून अधिक काळ चालू ठेवणं म्हणजे आत्मघात ठरणार होता. टोकियोवरून संदेश निघाला. मुतागुचिंच्या हातात कागद पडला. मुतागुचिंनी थरथरत्या हातांनी आणि विदीर्ण अंतकरणाने टोकियोवरून आलेला तो संदेश वाचला- ‘इम्फाळ-कोहिमा मोहीम रद्द! १८ जुलै १९४४!”

आकसत आणलेला वेढा सोडून जपानी सैन्य माघारी निघालं. सांगाडे झालेली शरीरं; लक्तरं झालेले गणवेश आणि चिंध्या झालेला अभिमान घेऊन सैनिक परतीची वाट धरत होते. पंचप्राण एकवटून एक एक पाऊल उचलणारे जवान त्राण जाऊन धारातीर्थी पडत होते. प्रत्येक जण जणू स्वतःच्याच प्रेतयात्रेत सामील झाल्यासारखा! जागोजागी पडलेल्या प्रेतांनी ब्रिटिश विमानांना जपानी माघारीची वाट दाखवायची आयतीच सोय केलेली. डोक्यावरून जाणारी विमानं अंदाधुंद गोळीबार करून जात. परतीच्या वाटेचा नजारा आणखीनच भेसूर होई.

अवघं जपानी लष्कर परतीच्या वाटेवर असताना एक वेडा वीर मात्र युद्धभूमीच्या भेटीसाठी आसुसला होता.

‘मी दाखवलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून पन्नास हजार सैनिक आपल्या रोटीला मातीत कालवून, पगाराला लाथाडून इंफाळच्या रणात देहभान विसरून लढत आहेत; त्यांच्यासाठी मला गेलंच पाहिजे!

‘माघार नव्हे; तात्पुरती माघार म्हणा मुतागुचि साहेब! जोपर्यंत शेवटचा आझाद हिंद सैनिक आणि त्यांचा हा म्होरक्या जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही देहलीच्या स्वप्नापासून कधीही माघार घेणार नाही.’

हातात टॉमीगन घेऊन उघड्या जीपमध्ये बसलेले नेताजी ब्रिटिश बंबारीच्या सुरांच्या संगतीने मॅकटीलाच्या रानाकडे निघाले होते.

क्रमशः सुभाष बावनी ३८ | तात्पुरती माघार.

लेखक- अंबरीश पुंडलिक.

ग्रंथ सूची:

१) Bose- an Indian Samurai- जनरल जी. डी. बक्षी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील

Leave a comment