सुभाष बावनी ३९ | माउंट पोपाची लढाई

सुभाष बावनी ३९ | माउंट पोपाची लढाई

सुभाष बावनी ३९ | माउंट पोपाची लढाई –

“कसं करायचं रे प्रेम? शत्रूची ताकद अफाट आहे. दारुगोळाही भरपूर. शिवाय डोक्यावर भिरभिरत्या विमानांचं कवच. कसं रोखणार?” गुरुबक्ष धिल्लनने काळजीनं प्रेम सहगलला विचारलं.

“त्यासाठीच तर आपण माउंट पोपाची निवड केली आहे. फळं-कंदमुळं यांची या गर्द वनराजीमध्ये रेलचेल आहे. शिवाय पाणीही भरपूर! डोक्यावरून दिवसाढवळ्या विमान गेलं तरी गच्च झाडीमुळे खाली लपलेला सैनिक काही विमानातून दिसायचा नाही.” प्रेम उत्तरला.

“पण तरीही…”

“मला माहित आहे बक्षी; हा पाठशिवणीचा खेळ आपल्याला फार काळ नाही खेळता येणार. पण बातमी आली आहे की नेताजी स्वतः मॅकटीलामध्ये उतरले आहेत. ते सुखरूप बँकॉकला पोहोचेपर्यंत तरी माऊंट पोपाला झुंजावंच लागेल.”

पहिल्या डिव्हिजनमधील जिवंत राहिलेले सैनिक आणि स्थानिक ब्रम्ही जनतेतून केलेल्या भरतीने उभी राहिलेली दुसरी डिव्हिजन माऊंट पोपावर सरसावून बसली. कुणाच्या हाती बंदुका, कुणाजवळ तीरकमठा, कुणी दगडधोंडे घेऊन खालून जाणाऱ्या ब्रिटिश फौजेवर हल्ला करू लागला. दिवसा कायुकपडांग रस्त्यावरून जाणाऱ्या सैनिकांवर दगडांचा वर्षाव करायचा; आणि रात्रीच्या अंधारात खाली उतरून छापे मारून पुन्हा पहाडाच्या कुशीत पसार व्हायचं हा दिनक्रमच झाला. पाहता-पाहता आझाद हिंद सैनिकांच्या दहशतीचा परीघ वाढत गेला. कायुकपडांगही आझाद हिंद वाल्यांच्या हाती गेलं. सेट सेट पो-पिनबिनपर्यंत छापे पडू लागले. दिवसाढवळ्या त्या रस्त्यावरून मॅकटीलाकडे सरकायला ब्रिटिश फौजा बिचकू लागल्या.

“पोपा पहाडाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल!” ब्रिटिश अधीकारी विचार करू लागले. काय करावं? काय करावं?

शेवटी मंडालेपर्यंत पोहोचलेल्या ब्रिटिशांच्या पाचव्या ब्रिगेडला एक महाकठीण काम देण्यात आले. त्यांनी सरळ सरळ खाली रंगूनकडे न सरकता, तुंगठा ते कायुकपडांग अशी नैऋत्येकडे चाल करून वाटेतील माउंट पोपा विंचरून काढावा. गद्दार आझाद हिंद वाल्यांचा काय तो सोक्षमोक्ष लावावा.

ब्रिटिशांच्या सैन्याला माउंट पोपावर चढू न देण्याच्या इराद्यानं पायथ्याशी असलेल्या लेगी गावात प्रेम सगहल ठाण मांडून बसला. मर्यादित युद्धसामग्री, सैन्यबळ असतानाही आसपासच्या टेकड्या, गर्द वनराई, उंच-सखल जमीन, चिंचोळ्या- अरुंद वाटा प्रेमला आधार देत होत्या. मालवाहू ट्रक, रणगाडे, तोफा आणि वरून विमानांचं संरक्षण यामुळे निर्धास्तपणे पाचवी ब्रिगेड प्रेमच्या पाचशे सैनिकांना चिरडून टाकण्यासाठी लेगी गावाच्या दिशेने चालू लागली. पण पर्वताचा पायथा लागला तसे तोफा-रणगाडे अडखळू लागले. गाड्या धापा टाकू लागल्या. जड वाहनांना पुढे सरकता येईना. तेवढ्यात टेकड्यांवरून आझाद हिंदच्या सैनिकांनी मारा सुरू केला. गोऱ्या ब्रिगेडला अरुंद वाटांवरून धड पुढेही जाता येईना आणि माघारही घेता येईना. तरीही त्यातल्या त्यात पवित्रा घेऊन तोफांनी काही गोळे पहाडाच्या दिशेने डागले, पण व्यर्थ! टेकड्यांच्या अडसराने हवं त्या ठिकाणी गोळे पडत नव्हते. स्टेनगन शत्रूला आपल्या माऱ्याने भिजवून टाकत नव्हती. रणगाडे थांबले. माघारले. विमानांनी युद्धभूमीचा ताबा घेतला. शेलिंग, स्ट्रॉफिंग आणि बॉम्ब टाकणं सुरू झालं. पण हा सगळा विमानातून पडणारा दारुगोळा रिकामी भुई धोपटत होता. ब्रिटिशांची फसगत पाहून आझाद हिंदच्या वीरांना आणखीच चेव चढत होता. शेवटी लेगीचा नाद सोडून पाचव्या दिवशी ब्रिटिश फौजांनी माघार घेतली. आझाद हिंदच्या गोटात जल्लोष सुरू झाला. प्रेम सहगल आपल्या सैनिकांना कौतुकाने म्हणाला,

“तुम्हाला कल्पना नाही गड्यांनो, तुम्ही किती मोठा पराक्रम करून दाखवला आहे ते! फक्त ब्रिटिश सैन्याला नाही, तर थेट थेम्सच्या तीरावरून उचलून आणलेल्या गोऱ्या ब्रिगेडला परास्त केलंय आपण. आज नाही; पण स्वतंत्र भारतात लष्करातल्या सर्वोच्च पदकांची रास तुमच्या छातीवर लावली जाईल. लष्करातले भत्ते, प्रमोशन्स आणि काय काय मिळतं ते बघाच!”

पण तेवढ्यात एक दुर्दैवी बातमी आली- ‘आणखी काही आझाद हिंद सैनिकांनी रात्रीतून ब्रिटीशांच्या छावणीत प्रवेश करून माफी मागितली!’

ब्रिटिशांच्या छावणीच्या दिशेने हातवारे करत, कराकरा दात खात प्रेम ओरडू लागला,

“बेईमान कुत्र्यांनो! एवढाही धीर धरवला नाही का रे? पोटात भुकेनं आग लागली असताना नेताजींचा शिपाई म्हणून मरण्यात जी मजा आहे, ती तुम्हा ब्रिटिशांच्या दारात बसून फेकलेली तूप-रोटी खाणाऱ्यांना काय कळणार?”

आता परिस्थिती माऊंट पोपा वरूनही लढू देणार नव्हती. तरीही आझाद हिंद सैनिक या गावातून त्या गावात लपत-छपत युद्ध करतच होते. ब्रिटिश सैन्याच्या डोक्यावर टपली मारून जातच होते. स्लिमला निर्धास्तपणे रंगूनकडे सरकता येईना! अजून काही दिवस तरी आपण आरामात स्थानिक जनतेच्या साहाय्याने लढू शकतो, असा विश्वास सैनिकांना वाटत होता, तोच एक ब्रम्ही म्हातारा येऊन प्रेमला म्हणाला,

“आझाद हिंदच्या सैनिकांना शरण यायला सांगा. नाहीतर तुमची घरं बेचिराख करू!” असा निरोप घेऊन काही गोरे अधिकारी आले होते….साहेब, सुभाष म्हणजे भला माणूस….पण आम्ही बायका-पोरं असलेली गरीब माणसं….” यापुढे त्या मिचमिच्या डोळ्यातून आसवं गाळणाऱ्या वृद्धाला बोलवेना. प्रेमने एक मोठा नि:श्वास सोडून हातातली बंदुक खाली टाकली आणि तो आलनमायो येथे असलेल्या ब्रिटिशांच्या छावणीकडे चालू लागला.

दरम्यान माउंट पोपावर मोर्चेबांधणी चालू असतानाच मॅकटीलाच्या झाडीत मात्र शाहनवाजला एका वेगळ्याच संकटाला सामोरं जावं लागलं. त्यांचा सर्वोच्च नेता पोपा पर्वतावर जाऊन तिथे होऊ घातलेल्या अखेरच्या युद्धात हौतात्म्य पत्करणासाठी हट्ट धरून बसला होता. त्यांची मनधरणी करताना शाहनवाजची दमछाक होत होती. शत्रूच्या फौजा तासाभराच्या अंतरावरील महलँगपर्यंत येऊन ठेपल्या होत्या. सर्वात मोठा मासा याच ठिकाणी सापडणार, याचा वास त्यांना लागला होता. परतीचा मंडाले-रंगून रस्ता ब्रिटिशांच्या फौजेने गजबजला. नेताजी मॅकटीलाच्या आडवाटेवर अडकले होते.

क्रमशः सुभाष बावनी ३९ | माउंट पोपाची लढाई.

लेखक- अंबरीश पुंडलिक

ग्रंथ सूची:

१) Bose- an Indian Samurai- जनरल जी. डी. बक्षी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील

Leave a comment