सुभाष बावनी भाग ४ | कटकमधील सेवाकार्य

सुभाष बावनी भाग ४ | कटकमधील सेवाकार्य

सुभाष बावनी भाग ४ | कटकमधील सेवाकार्य

सुभाष बावनी भाग ४ –

‘आता दिवसभर काय करायचं?’ हा मोठ्ठा प्रश्न घेऊन सुभाष कटकमधील आपल्या ओडिया बाजार परिसरातल्या घरासमोर उभा! तेवढ्यात एक जीर्ण कपड्यातला भिकारी सुभाषच्या पायाला हात लावून हात पसरत म्हणाला, “काही तरी दे रे बाबा गरिबाला!”

त्याच्याकडे पाहताच सुभाषच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सुभाषला आठवली कलकत्त्याच्या आपल्या घरासमोर बसणारी ती जीर्ण, फाटक्या कपड्यातली म्हातारी. येणार्‍या-जाणार्‍या समोर हात पसरून याचना करणारी.

“या बिचारीपाशी राहायला साधी झोपडी नाही, लाज झाकायला कपडे नाहीत, खायला अन्न नाही आणि आपण मात्र उंच उंच प्रासादांमध्ये लोळत पडलो आहे? हिच्यासाठी फार काही जरी आपण करू शकत नसलो, तरी एक मात्र नक्की करता येईल.”

सुभाष रोज पायी कॉलेजला जात असे. ट्रामचे वाचलेले पैसे तो त्या म्हातारीच्या हातावर ठेवत असे.

हे सगळं आठवल्याबरोबर सुभाषच्या चेहर्‍यावरचे भाव पालटले. गोंधळाची जागा निश्चयाने घेतली. काहीतरी गवसल्याचं हसू त्याच्या चेहर्‍यावर उमटलं. त्यानं कटकमधील मित्रांना एकत्र केलं आणि त्यांच्यापुढे आपल्या मनातली योजना सांगू लागला,

“सध्या आपल्या गावात पटकीची साथ आली आहे. सिविल हॉस्पिटलला या पटकीच्या रोग्यांची शुश्रुषा करायला नर्स तयार नसतात. ते काम तिथे सफाई कर्मचारी करतात. हे काम आपण करायचे! बोला? आहात तयार?”

मित्रांचा होकार दमदार आला, पण काम सोपे नव्हते. स्वच्छता हा शब्द घाणीशी झुंजण्यातून जे मिळते त्याकरता आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती होणारे पटकीचे रोगी म्हणजे मलविसर्जनाने लिडबिडलेले कपडे, उलट्या करून करून तोंडाला सुटलेली दुर्गंधी या सगळ्यामुळे अंगावर माशा घोंगावत आहेत या सगळ्याची अजिबात शिसारी न येता सुभाष विवेकानंदांचा ‘दरिद्रीनारायण’ हा शब्द घोकत ते काम करू लागला.

“अरे तो चार नंबर बेडवरचा पेशंट मेला. म्युनिसिपालिटीच्या लोकांना येऊन त्याची बॉडी घेऊन जा म्हणा” डॉक्टर ओरडले.

“का? त्यांचे नातेवाईक नाहीत का?” सुभाषने विचारले

“कोणीच नाही”

“पण मग काही अंत्यसंस्कार वगैरे?” सुभाष

“आम्ही जर अंत्येष्टीचे मंत्र म्हणत बसलो, तर उपचार कोणी करायचे?” डॉक्टर

“आम्ही करू मग!” सुभाष म्हणाला

एक नवीन काम मागे लावून घेतले. दिवसाचे चोवीस तास पुरेनासे झाले. एक विद्यार्थी होस्टेल या पोरांच्या कामाचा अड्डा बनला. त्या कामाला व्यायाम, व्याख्याने अशा उपक्रमांची जोड मिळाली.

हळूहळू पटकीची साथ ओसरली. आता पुन्हा ‘काय करायचे?’ हा प्रश्न समोर उभा.

“बाबा मी इंग्लंडला जाऊन तिथे पुढचे शिक्षण घेऊ का?” सुभाष बाबांना म्हणाला.

“हे बघ तुला जरी आपण निर्दोष वाटत असलो, तरी विद्यापीठाच्या दृष्टीने तू दोषीच आहेस. आणि हा कलंक पुसून काढल्याशिवाय मी तुला कुठेही पाठवणार नाही.” – बाबांनी निर्णयच देऊन टाकला.

विद्यापीठाचा राग निवळला असेल तर पहावे, असा विचार करून सुभाषने कलकत्त्याला चक्कर टाकली.

“एखादं कॉलेज जर तुला प्रवेश द्यायला तयार असेल, तर आम्ही आक्षेप घेणार नाही” आशुतोष मुखर्जी म्हणाले. प्रेसिडेन्सी कॉलेजकडे जायची इच्छा नव्हती. वंगवासी कॉलेजमध्ये ‘फिलॉसॉफी’ हा विषय नव्हता. सुभाष थेट स्कॉटिश चर्च कॉलेजच्या प्राचार्यांसमोर जाऊन उभा राहिला.

“दोन वर्षांपूर्वी मला प्राध्यापक ओटन यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून प्रेसिडेन्सी कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते. आता जर इतर कुणी प्रवेश द्यायला तयार असेल, तर विद्यापीठाची हरकत नाही. तुम्ही मला प्रवेश द्याल का?” सुभाषने प्राचार्यांना विचारले.

कौतुकाने सुभाषला आपादमस्तक न्याहाळत प्राचार्य उर्कहार्ट म्हणाले, “तुझा स्पष्टवक्तेपणा पाहून नक्कीच देईन. फक्त ज्यांनी काढून टाकलं त्यांची ‘हरकत नाही’ असा कागद घेऊन ये.

आता जेम्स नव्हते. त्यांच्या जागी विल्सन आलेले.

प्राचार्य विल्सन म्हणाले,” मागे काय झालं ते उगाळण्यात काय मतलब आहे? तुझं यानंतरचं आयुष्य वाया जाता कामा नये”

सुभाष स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये ज्युनियर बीए ला दाखल झाला.

शेवटचे वर्ष! अभ्यास सुरू केलेला. मध्ये वाया गेलेले दोन वर्ष, पुढे गेलेले सखे-सोबती, त्या काळातला मनस्ताप हे सगळं मनाच्या एका कप्प्यात ठेवून सुभाषने परीक्षा दिली. निकाल आला. सुभाष विद्यापीठात दुसरा आला होता.

माँ-बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

“ब्राव्हो!” म्हणून शरदने आपल्या भावाला कवेत घेतले. सगळा आनंदीआनंद झाला.

इकडे जानकीनाथबाबू निर्धास्तपणे कटकला परतत होते आणि तिकडे जनरल डायर जालियनवाला बागेची चिंचोळी वाट बंद करत होता.

कुणाच्या ध्यानीमनी नसताना फायरच्या आदेशासरशी हजारो निष्पाप लोक धावतांना गोळी लागून, चेंगरून, विहिरीत उडी मारून मृत्युमुखी पडले. अमृतसरच्या त्या बागेत रक्ताची रंगपंचमी खेळली गेली.

प्रतिशोध! याचा प्रतिशोध घ्यायचा!

हरताळ- आंदोलने- निदर्शने आणि काय काय याचे बेत रचले जाऊ लागले. देश जणू ज्वालामुखीच्या मुखावर बसला होता.

बाबा आता कुठे सुभाषच्या काळजीतून मुक्त होऊन कटकला परतले होते, ते धावत पळत कलकत्त्याकडे निघाले.

बोस कुटुंबाला पुन्हा एकदा सुभाषच्या चिंतेने ग्रासले होतं.

सर्वांच्याच पुढे “आता सुभाषचं काय करावं?” हा जुनाच प्रश्न नव्याने उभा राहिला.

क्रमश: सुभाष बावनी भाग ४ | कटकमधील सेवाकार्य.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि श्री जोशी
२) भारतीय यात्री (आत्मकथा)

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०

Leave a comment