सुभाष बावनी ४० | रंगूनवरून सिंगापूरकडे

सुभाष बावनी ४० | रंगूनवरून सिंगापूरकडे
सुभाष बावनी ४० | रंगूनवरून सिंगापूरकडे

सुभाष बावनी ४० | रंगूनवरून सिंगापूरकडे –

“मला आत्ताच्या आत्ता पोपा पर्वतावर जायचं आहे” नेताजींनी हाताची घडी घालत आपला निश्चय सांगितला. शाहनवाज खान त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करू लागले,

“नेताजी, आता परिस्थिती अशी राहिलेली नाही की…”

“आता विजयाची आशा उरली नसेल, तरी प्रत्येक वीरासाठी हौतात्म्याचा मार्ग कुणीही बंद करू शकत नाही. मी सुद्धा या शेवटच्या युद्धात एक सैनिक म्हणून उतरणार आहे!”-नेताजी

शहनवाजला कुठल्या शब्दात नेताजींची समजूत घालावी हेच उमजेना. त्यानं बाजूला उभ्या असलेल्या एका ब्रम्ही तरुणाचं बखोट धरलं आणि नेताजींकडे त्याला ओढत आणलं-

“हा पहा आपल्या दुसऱ्या डिव्हिजनमधला सैनिक! आपल्या उभ्या आयुष्यात त्यानं कधीही भारत पाहिलेला नाही. त्याच्या अंगावर घालायला गणवेशही नाही. रायफल चालवायचं ट्रेनिंगही याने व्यवस्थित घेतलेलं नाही, तरी फक्त आणि फक्त तुमच्या आवाहनाने भारावून जाऊन तो या असमान संगरात उतरलाय!

“नेताजी, तुमच्या हौतात्म्यानं तुमचं समाधान होईल हो! पण अद्याप पारतंत्र्यात असणारी भारतमाता जेव्हा हातापायातल्या बेडयांचा खुळखुळाट करत आमच्याकडे पाहिल; तेव्हा आम्ही तिला काय उत्तर द्यायचं नेताजी?

”अजून युद्ध संपायचं आहे नेताजी! तुम्ही जगला-वाचलात तर ब्रिटिशांशी संघर्षाचे आणखी काही मार्ग शोधायचा प्रयत्न करू शकाल. पण आत्ता इथून निघा. शत्रु मॅकटीलामध्ये तासाभरात पोहोचेल, एवढा नजीक येऊन ठेपला आहे.”

 

नाईलाजाने नेताजी जीपमध्ये बसले. बाजूला डॉक्टर राजू; फूट रेस्टवर जपानी सैनिक टॉमीगन घेऊन पावित्र्यात उभा. नेताजींच्या मांडीवरही टॉमीगन होती. शत्रूला सामोरे जाण्यासाठीच जणू ते आतूर झाले होते. मृत्यूशी पाठशिवणीचा नेताजींचा आवडता खेळ मॅकटीलाच्या रानातून पुन्हा एकदा सुरू झाला.

पण रंगूनकडे जायचं कसं? मंडाले ते रंगून या महामार्गाला मॅकटीलाचा रस्ता ज्या ठिकाणी मिळतो, तिथे एव्हाना ब्रिटिश सैनिक उतरले होते. त्यामुळे ब्रिटीशांच्या चौक्या-पहारे मागे पडेपर्यंत जंगलातूनच प्रवास करावा लागणार होता. यिंदावला पोहोचेपर्यंत वरून विमानाची घरघर ऐकू येऊ लागली. पाठोपाठ बंदुकांच्या फैरी! ट् ट् ट् ट्! सर्वांनी पटापट उड्या मारत झुडपात धाव घेतली. विमानं निघून गेल्याची खात्री पटल्यावर पुन्हा प्रवास सुरू झाला.

पेगू मागे पडले. हळूहळू रंगूनचे रंग दिसू लागले. यावेळी रंगूनला यायचे ते निरोप घेण्यासाठीच. आझाद हिंदच्या कचेरीत प्रशिक्षण घेणारे सैनिक आणि लीगचे कार्यकर्ते जमलेले. या सर्वांचा निरोप नेताजींना घ्यायचा होता. आता बहुदा शेवटचीच भेट!

भावनाविवश झालेले नेताजी बोलायला उभे राहिले-

“मित्रांनो परिस्थितीच्या रेट्यामुळे आपल्याला माघार घ्यावी लागत आहे. ‘माघार’ हा शब्दच किती अवमानकारक आहे! त्यातही ती जर मातृभूमीच्या कुशीत शिरण्याच्या मार्गावरून असेल, तर अधिकच वेदनादायी! त्यामुळे तुमचा सर्वांचा निरोप घेताना मला काय वेदना होत आहेत, हे कसं सांगू?

“ही माघार आहे; पण तात्पुरती! कायमची नाही. पोपा पर्वताच्या उंच उंच कड्यांना झोंबायला, काबवा दरीची खोली मोजायला आणि आराकानचे रान तुडवायला मी पुन्हा भारताच्या ईशान्य कोपऱ्यावर झेप घेईन!”

 

मागे राहिलेले जपानी सैनिक, आझाद हिंदचे तरुण आणि राणी झाशी रेजिमेंटच्या मुली यासह बारा लॉऱ्या आणि चार मोटारी असा काफिला परतीच्या मार्गाला लागला. राजदूत हाचीयाही नेताजींच्या गाडीत बसले. पुन्हा पेगूवरूनच जायचे होते. ऐन मोक्यावरचे हे शहर केव्हाही ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याची शक्यता होती.

पेगू आले! गेले! वॉ नदीचे अरुंद पात्र दिसू लागले. मोटारी- लॉऱ्यांचा एवढा मोठा पसारा तराफ्यावरून पलीकडच्या तीरावर न्यायला वेळ लागणार होता. एकावेळी तराफ्यावरून एकच लॉरी पलीकडे जाई. एवढा वेळ नव्हता. घाई करणं भाग होतं. शेवटी काही लॉऱ्या सोडून दिल्या. मोटारीं पलीकडे नेल्या. सोडून दिलेल्या वाहनांना आग लावून देण्यात आली. मुलींनी एकमेकींच्या आधारानं नदी पार केली. अपीआ आलं. अपीआ मागे पडल्यावर सीतांग नदीचं विस्तीर्ण पात्र दिसू लागलं. ब्रिटिशांच्या बंबारीमध्ये नदीवरचा पूल उखडून गेला होता. नावाडीही कुठे दिसत नव्हता. पात्र जवळ येता येता पाऊस सुरू झाला. भुसभुशीत जमीन निसरडी होत चालली होती. चिखलात मोटारी रूतू लागल्या. शेवटी नेताजी आणि हाचिया खाली उतरले. दोघांनीही कोसळत्या पावसात चिंब भिजलेल्या गणवेषासह गाडीला धक्का मारायला सुरुवात केली. पुन्हा काही गाड्या पेटवून दिल्या. काही मोटारी सोडून दिल्या. नेताजींची मोटार तेवढी पलीकडे नेली. पुन्हा प्रवास!

 

मौलमेन आले. इथून पुढचा प्रवास मालगाडीने! सोबतचे सर्व सैनिक, मुली मालगाडीत बसल्या. नेताजींची मोटार त्या मालगाडीला समांतर रस्त्यावर धावत होती.

एकदाचे बँकॉक आले १५ मे १९४५! सुटकेचा नि:श्वास सोडायला वेळच नव्हता. परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली होती. एका मागोमाग एक वाईट बातम्या कानावर पडत होत्या. त्यातली सगळ्यात मोठी बातमी होती- जर्मनीची शरणागती! ‘हिटलरचा रशियावर आक्रमण करण्याचा आततायीपणा जर्मनीला नडला तर! हे अपेक्षितच होते. आता जपान एकटा किती काळ तग धरेल? चिवट जपान शरण जाणार नाही; पण आता भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात कितपत मदत करू शकेल? काहीतरी पर्याय शोधावाच लागेल! तेराउचिंना भेटून रशियाशी बोलणी करता येतील का ते पहावे!’ असा विचार करत नेताजी सिंगापूरकडे निघाले. राणी झाशी रेजिमेंटच्या मुली आपापल्या घरी पोहोचल्या होत्या.

 

याच वेळी भारतात मात्र वेगळेच नाट्य उभे राहत होते. वेव्हेल योजनेची साखरपेरणी सुरू झाली होती. पाकिस्तानच्या कल्पनेचा जंबिया जिना नावाचा कायदेपंडित हळूहळू भारतमातेच्या छातीत उतरवत होता. सिंगापूरच्या बेचिराख बुरुजावरचा मुरारबाजी बेभानपणे दांडपट्टा फिरवण्याच्या कैफात असताना भारतातले बडे बडे सरदार, मनसबदार मात्र थकल्याभागल्या पावलांनी चर्चेच्या मेजावर येऊन टेकले होते.

 

क्रमशः सुभाष बावनी ४० | रंगूनवरून सिंगापूरकडे

लेखक- अंबरीश पुंडलिक

ग्रंथ सूची:

१) Bose- an Indian Samurai- जनरल जी. डी. बक्षी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील
४) आझाद हिंद सेनेसमवेत ब्रम्हदेश ते जपान (थरारक युद्ध स्मृती)- एअर कमोडर रमेश बेनेगल
५) सत्तावन्न ते सत्तेचाळीस- वि. स. वाळिंबे

Leave a comment