सुभाष बावनी ४१ | फसलेले चले जाव

सुभाष बावनी ४१ | फसलेले चले जाव

सुभाष बावनी ४१ | फसलेले चले जाव –

१५ जून १९४५! नेताजी सिंगापूरला पोहोचले. गेल्या काही दिवसांच्या दगदगीने शरीर ठणकत होतं. दिवसातले वीस वीस तास परिधान केल्यानं अंगावरचा लष्करी गणवेश विटला होता. विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. पण आज दिवसभरात भारतातली खबर ऐकायला न मिळाल्याने नेताजींनी आधी रेडिओ लावला. लक्ष देऊन ते ऐकू लागले-

“१०४१ दिवसांच्या बंदिवासातून नेहरू, पटेल, आझाद आदी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची सुटका! वेव्हेल योजनेवर चर्चेसाठी तयार!”

नेताजींनी कपाळावर हात मारून घेतला. सत्ताप्राप्तीची इतकी घाई? की त्यासाठी आपण आपल्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन मान्य करायलाही मागेपुढे पाहत नाही? तुरुंगवासाने यांची संघर्षाची शक्तीच बोथट करून टाकली की काय?

“ह्याच संघर्षासाठी पाच वर्षांमागे जेव्हा बापूजींपुढे आपण हात पसरले होते, तेव्हा तर यांना नैतिक अनैतिकतेच्या गप्पा आठवल्या होत्या? मग युद्ध संपलं नसताना हा ‘चले जाव’ चा घाट घाईघाईने कशासाठी घातला? हे तेव्हाच केलं असतं तर आपल्याला तरी ही कसरत करून इथपर्यंत का यावं लागलं असतं?”

सुभाषबाबूंच्या नजरेसमोरून हॉलवेल स्मारकाचं आंदोलन, मग अटक, मग वेषांतर करून पेशावर, तिथून काबूल आणि काबुलवरून बर्लिनपर्यंत केलेला प्रवास तरळून गेला.

बर्लिन नभोवाणीवरची नेताजींची रोमहर्षक भाषणे जेव्हा भारतीय जनता जिवाचे कान करून ऐकू लागली; ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय “सुभाषबाबू येणार!”, “लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार!”, “आपण स्वतंत्र होणार!” तेव्हा मात्र गांधीजींची भाषा बदलली. त्यांनी हरिजनमध्ये लिहिले,

“इंग्लंडने महायुद्ध संपायची वाट न पाहता आत्ताच भारतातून निघून जावे. आपण गेल्यावर हिंदुस्तानचे कसे होईल याची काळजी करण्याचे त्यांनी सोडून द्यावे. हा देश त्यांनी हिंदूंच्या हाती सोपवावा असे मला मुळीच म्हणायचे नाही. त्यांनी हा देश परमेश्वराच्या स्वाधीन करून चालते व्हावे. कदाचित इथे अराजक उफाळून येईल. हरकत नाही; त्या अग्निदिव्यातूनच खऱ्याखुऱ्या हिंदुस्तानचा उगम होईल.”

गांधीजींनी घाईघाईने ‘चलेजाव’ ची हाक दिली! काँग्रेस ढाल तलवार न घेताच ‘चले जाव’च्या युद्धात उतरली. ठिकाण होते गोवालिया टँक मैदान मुंबई! सात ऑगस्ट १९४२!

लगोलग नऊ ऑगस्ट च्या पहाटे गांधीजी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आदी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना सरकारने अटक करून अज्ञातस्थळी नेऊन ठेवले. चलेजाव आंदोलन सुरू होण्याआधीच दिशाहीन झाले. ‘आंदोलन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?’ हे गांधीजींनी कुणालाच सांगून ठेवलं नव्हतं.

काँग्रेस नेते तुरुंगात गेल्यानंतर ‘चलेजाव’ ची सूत्रे स्वीकारण्यासाठी पुढे आले ते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव यांसारखे लोक! सामान्य जनतेमध्येही ज्याला जसे जमेल तसे आंदोलन करणे सुरू झाले. रेल्वेचे रूळ उखडणे, स्थानकांची मोडतोड करणे, टपाल कचेऱ्यांना आगी लावणे हे प्रकार सुरू झाले. काही ठिकाणी प्रतिसरकारेही स्थापन झाली. सरकारने या विध्वंसाचे खापर गांधीजींवर फोडले. त्यावर उत्तर देत गांधीजींनी लॉर्ड लिनलिथगो यास पत्र लिहिले,

“या हिंसेला ब्रिटिश सरकारच जबाबदार आहे, ज्यांच्या बळाच्या वापराने लोकांना हा वेडेपणा करण्यास भाग पाडले. छोडो भारत या आंदोलनाचे उद्दिष्ट मित्र राष्ट्रांच्या युद्ध प्रयत्नात भारताला परिणामकारकरित्या सामील होता यावे, अशी परिस्थिती निर्माण करणे हे होते. कुठलेही हिंसात्मक आंदोलन सुरू करायचा काँग्रेसचा विचार नव्हता. या आंदोलनाच्या नावाखाली जी हिंसा झाली, त्या हिंसेचा आमच्या चळवळीशी काहीही संबंध नाही.”

१९४४ साल उजाडता उजाडता चलेजाव आंदोलन संपले होते. सरकारने गांधीजींना ६ मे १९४४ ला मुक्तही केले.

हळूहळू महायुद्धाचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. जर्मनी-इटली शरण आले. जपान सर्वनाशाच्या उंबरठ्यावर होता. चलेजाव चळवळीचं ब्रिटिशांनी बळाचा वापर करून पूर्ण दमन केलं. हजारो लोक मारले गेले. आंदोलनाची सांगता अपयशाने झाली.

या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं, अशी भूमिका तुरुंगवासाने हतवीर्य झालेल्या, थकलेल्या काँग्रेस नेतृत्वाने घेतली.

याउलट बेचिराख झालेल्या सैन्याचे सेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस हे नभोवाणी वरून कळकळीने सांगत होते,

“युद्धाचा निकाल काहीही लागो, भारत स्वतंत्र होणार! निदान जोपर्यंत नियतीच्या प्रतिकूलतेचे फटकारे माझ्यातली लढण्याची ऊर्मी संपवत नाहीत, तोपर्यंत कळ काढा. हातावर हात ठेवून स्वस्थ बसलात तरी चालेल, पण कृपा करून फाळणीचा स्वीकार करू नका.”

नियती फटकारे द्यायचं थांबवणार नव्हतीच. ‘जपान लढेल!’ असं वाटत असतानाच; ६ ऑगस्ट रोजी पॉल टिवेट्सचं ‘एमोला गे’ विमान सकाळी आठ-साडे आठच्या सुमारास हिरोशिमा शहरावर घिरट्या घालू लागलं. टिवेट्सनं आपल्या सहकाऱ्यांना ‘काळे चष्मे घाला’ असे आदेश दिले. सहकाऱ्यांनी निमूटपणे आदेशाचं पालन केलं. विमानाचा मागचा दरवाजा उघडला गेला आणि फुटबॉलच्या आकाराचा एक गोळा गडगडत हिरोशिमा शहरावर जाऊन आदळला. बॉम्ब जमिनीवर आदळताच वातावरणाचं तापमान दहा हजार अंशांपर्यंत वाढलं. त्या वाढलेल्या तापमानानं विजेचे खांबही वितळून वाहू लागले. आगीच्या ज्वाळा शहरातल्या प्रत्येक अणूला वेढत वर झेपावू लागल्या. हिरोशिमा शहरातले एक लाख ऐंशी हजार नागरिक ‘काय होतंय?’ हा विचार मनात यायच्या आत मरून पडले. ९ ऑगस्टचा ‘फॅट मॅन’ नागासाकीच्या थोडा बाहेर पडल्यामुळे नव्वद फक्त हजारच लोक मारता आले.

माणुसकीला प्रशांत महासागरात उडी मारून जीव द्यायची इच्छा झाली. अमानुषता दुरूनच हिरोशिमा-नागासाकीकडे पाहत नजर चोरू लागली. विध्वंस या शब्दाची नवीन व्याख्या करण्यात भाषाप्रभू गढून गेले. जपानमध्ये हाहाकार माजला.

आता? आता लढेल का जपान? आता काय करावं? हा विचार करत नेताजी सेरेंबेनकडे निघाले. आशावादाला, सकारात्मक विचारशक्तीला साकडं घालून ‘काहीतरी सुचव’ असं विनवायची वेळ आली होती. आता काहीही करून रशिया गाठलंच पाहिजे, हा विचार नेताजींच्या मनात पक्का होत होता.

क्रमशः सुभाष बावनी ४१ | फसलेले चले जाव.

लेखक- अंबरीश पुंडलिक.

ग्रंथ सूची:

१) नेताजी- वि. स. वाळिंबे
२) महानायक- विश्वास पाटील
३) सत्तावन्न ते सत्तेचाळीस- वि. स. वाळिंबे
४) दुसरे महायुद्ध- वि. स. वाळिंबे
५) Gandhiji’s Letters to Lord Linlithgow (Gandhi Letter 85 to 89- www.mkgandhi.org)

Leave a comment