सुभाष बावनी ४२ | लाल किल्ल्याकडे –
“नेताजी मॅकटीलावरून निघाल्यापासून तुमची धावपळच सुरू आहे; थोडावेळ आराम करा आता!” प्रीतम सिंग म्हणाला.
“अरे पण सध्याच्या परिस्थितीत केव्हाही काहीही…” नेताजींनी बोलण्याचा प्रयत्न केला.
“तशीच काही बातमी आली तर आम्ही उठवू तुम्हाला…” नेताजींना वाक्यही पूर्ण करू न देता हट्टाने आडवं व्हायला लावून प्रीतमसिंग बाहेर आला.
नेताजी नुकतेच सेरेम्बनवरून सिंगापूरला आले होते.
पडल्यापडल्या नेताजींच्या डोळ्यासमोर गेल्या चार वर्षांचा काळ चित्रासारखा उभा राहिला. घरातून निघून जर्मनीपर्यंत मारलेली दौड; सुरुवातीला हिटलरने पोलंडवर विद्युतगतीने मारलेल्या धाडी; काँम्पेनच्या अरण्यात फ्रान्सचे घडवून आणलेले आत्मसमर्पण; जपानने प्रशांत महासागरात घातलेले थैमान; त्याने सिंगापूरपर्यंत मारलेली मुसंडी; हिटलरची रशियावर केलेली आतताई चढाई! कोणीतरी खरंच म्हटलं आहे- “हिटलरला समोर कसं जावं हे आहे माहित आहे पण कुठे थांबावं हे माहीत नाही!”
नेताजींना आठवले माँ- बाबा! दोघांनीही श्रावण बाळाच्या आई-वडिलांप्रमाणे पुत्र विरहाने प्राण सोडला. आपण त्यांना साधं पुत्रसुखही नाही देऊ शकलो.
नेताजींना आठवले आपली सगळी वकिली गुंडाळून ठेऊन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मेजदा-विभाभाभी!
त्यांना आठवले उत्तमचंद-रामोदेवी! आपल्या राहण्याची सोय व्हावी म्हणून आपल्या बायकापोरांची सुरक्षितता, व्यवसाय हे सगळं पणाला लावणारे!
दशकानुदशके परदेशात राहूनही आपल्या मनातील जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा जागृत ठेवणारे रासबिहारी!
नेताजींना आठवला जनरल तोजो! देशादेशांतील संबंधांना शुष्क करारांपुरते मर्यादित न ठेवता त्यापुढे जाऊन मैत्री निभावणारा माणूस!
तशाच आठवल्या अंधारात उभ्या राहून मूकपणे निरोप घेणाऱ्या त्या दोघी!
एमिली-अनिता, माँ-बाबा, मेजदा- विभा भाभी यांचे काहीच देणे लागत नाही का आपण? काय अधिकार आहे आपल्याला हे आयुष्य मृत्यूच्या खाईत बेफिकीरपणे फेकून द्यायचा?
पण मग कुणाला तरी हे करावेच लागेल! ब्रिटिश शासनरूपी वृत्रासुराचा वध करायला कुठल्यातरी दधिचीला आपल्या अस्थी द्याव्याच लागतील! मग कुणीतरी का? आपण का नाही? त्याग करायला कोणीतरी आणि सुख उपभोगायला आपण? हा कसला मतलबी विचार? सुभाष बोसाच्या कुटुंबानेच हा त्याग केला पाहिजे. सुभाष बोसाच्या बायकापोरांनीच स्वातंत्र्यदेवतेच्या आराधनेच्या बदल्यात नाझींच्या भाल्याच्या टोकाचे वार सहन केले पाहिजे! विवंचना सहन केली पाहिजे! हे मलाच करावं लागेल! हरणारं युद्धही शेवटच्या श्वासापर्यंत गर्जत ठेवावंच लागेल.
सुभाषबाबूंचा डोळा लागतो न लागतो, तोच नेगेशी धावत आले-
“नेताजींना उठवा! नेताजींना उठवा!”
“आताच डोळा लागला आहे त्यांचा!”
“वाईट बातमी आहे उठवावंच लागेल!”
“काय झालंय ते तरी सांगाल की नाही?”
“जपानने शरणागती पत्करली आहे. मित्र राष्ट्रांचं सैन्य केव्हाही टोकियोमध्ये उतरेल; त्याआधी घाई करावी लागेल.”
सर्वांचे चेहरे पांढरेफटक पडले. ह्याचा परिणाम काय होऊ शकतो, याची जाणीव सगळ्यांनाच होती. नेताजींना झोपेतून जागं केलं गेलं. जपानच्या शरणागतीची बातमी सांगितली. जणू आधीच याचा अंदाज आल्यासारखे भाव नेताजींच्या चेहऱ्यावर दिसले.
“नेताजी आता आझाद हिंद सेनेने काय करायचं? युद्ध चालू ठेवायचं की जपान सोबत शरणागती पत्करायची?”
“जपान सोबत नाही; स्वतंत्रपणे शरणागती! आझाद हिंद सरकार म्हणून शरणागती!” नेताजींचे डोळे चमकले.
“आणि तुम्ही?”
“मला वेगळे पर्याय चाचपून पहावे लागतील” दूरवर नजर लावून नेताजी म्हणाले. यापुढे कोणीच काही बोललं नाही.
बँकॉकला पोचता पोचता फील्ड मार्शल तेराउचींचा निरोप आला,
“आमचं एक विमान मांचुरियाकडे निघण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला मांचूरियापर्यंत यायचं असेल तर लवकर सांगा. जपानमार्फत उडणारं कदाचित हे शेवटचं विमान असेल. बोला!”
“मी माझ्या काही साथीदारांसमवेत मांचुरियापर्यंत यायला तयार आहे!”-नेताजी
“विमानात फक्त एकच जागा आहे!”
“नेताजी आम्ही तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, तुम्ही जपानला वेगळ्या विमानाची सोय करायला सांगा!” इतरांनी गलका केला.
“आम्ही आधीच सांगितलंय; हे शेवटचं विमान आहे. त्यानंतर मित्र राष्ट्रांच्या परवानगीनेच विमानं उडतील. मग आमच्या हाती काहीही राहणार नाही.”
“निदान एक जागा तरी वाढवा.” नेताजी म्हणाले
“आधीच वजन जास्त होतंय, म्हणून विमानातल्या सीट्स काढून घेतल्या आहेत. आणखी एकाची व्यवस्था फारतर होऊ शकेल.”
आता निवड करायची होती. नेताजी हबिबूर रहमान यांच्याकडे पाहात म्हणाले- “आप चलेंगे!”
बाकी सर्वांचा हिरमोड झाला. पण नेताजी सुरक्षित ठिकाणी पोहोचणं जास्त महत्त्वाचं होतं. सर्वांनी जड अंतःकरणानं नेताजींना निरोप दिला. नेताजींनी आपल्याबरोबर आझाद हिंद सरकारचा खजिनाही घेतला होता. विमान सायगाव विमानतळावरून निघणार होते.
१७ ऑगस्ट १९४५! सायगाव धावपट्टीवरून कर्कश्श आवाज करीत विमान हवेत झेपावले आणि काही वेळातच दिसेनासे झाले. दीड-दोन तासात विमान तुरेनला पोहोचले. अंधार पडला. त्या रात्री तिथेच मुक्काम करायचे ठरले.
आता काय होणार? सर्वसाक्षी काळाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या सेनापतीची अटक पाहिली होती; आता या सेनापतीच्या नशिबातही तेच? पराभव? अटक? फाशी? असं किती दिवस? किती पिढ्या? किती आहुत्या? यज्ञदेवता प्रसन्न होणार केव्हा?
नेताजींच्या हालचालींवर काळ बारीक नजर ठेवून होता. जणू त्यांना डोळ्यासमोरून हळू द्यायला तो तयार नव्हता. अर्थात त्याला पाहता येणार नाही, असे या सृष्टीत काय आहे म्हणा! वाईट घटनांपासून सामान्य माणूस डोळे फिरवून तरी घेऊ शकतो, काळाला हे सर्व पहावंच लागतं- इच्छा नसली तरी!
१८ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २० गेली, २१ गेली! काहीच हालचाल नाही! धावपट्टीवर तर १७ तारखेपासून सामसूम आहे. नेताजी गेले कुठे? घाई केली पाहिजे नं? मित्र राष्ट्रांच्या फौजा केव्हाही उतरतील!
२२ ऑगस्टला बातमी आली- “दिनांक १८ ऑगस्ट रोजी झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तायवान येथे मृत्यू!”
‘अरेच्च्या! केव्हा झाला हा अपघात? दिवसा कि रात्री? मला कसा दिसला नाही?’
काळ नेताजींच्या मृत्यूची छाननी करतोच आहे, तोच त्याला लाल किल्ल्याची साद ऐकू आली,
“तुला बघायचं होतं ना बहादुरशहा चे शब्द कवीकल्पना ठरतात की भविष्यवाणी ते? ये इकडे!”
लाल किल्ल्यावर येऊन पाहतो तो आझाद हिंद सेनेने शरणागती पत्करली होती. या सैनिकांवरील देशद्रोहाचा खटला लाल किल्ल्यावर सुरू होणार होता.
क्रमशः सुभाष बावनी ४२ | लाल किल्ल्याकडे –
ग्रंथ सूची:
१) नेताजी- वि. स. वाळिंबे
२) महानायक- विश्वास पाटील
३) Bose- an Indian Samurai- मेजर जनरल जी. डी. बक्षी
© अंबरीश पुंडलिक