सुभाष बावनी ४३ | तेग हिंदोस्तानकी

सुभाष बावनी ४३ | तेग हिंदोस्तानकी

सुभाष बावनी ४३ | तेग हिंदोस्तानकी –

“इटलीच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गॅरीबाल्डीला जर तुमचं हाऊस ऑफ कॉमन्स स्वातंत्र्यवीर म्हणणार असेल; तर सुभाषचंद्र बोस देशद्रोही कसे?

“फ्रान्सच्या मातीसाठी प्राण वेचणारे मॅक्वीज जर तुमच्यासाठी स्वातंत्र्ययोद्धे असतील; तर कुठल्या तोंडानं तुम्ही आझाद हिंद सैनिकांना गद्दार म्हणता आहात?

“हातात संगिनी घेऊन आपल्या देशाच्या मुक्तीसाठी रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांना देहांताची शिक्षा आणि हजारो निरपराध, नि:शस्त्र नागरिकांसोबत जालियनवाला बागेत रक्ताची रंगपंचमी खेळणाऱ्या जनरल डायरचं कौतुक? सत्कार? ही कुठली नीतिमत्ता आहे आपल्या जगप्रसिद्ध न्यायव्यवस्थेची माय लॉर्ड?”

इतिहास, भूगोल, राजकारण, कायदा आणि नितीमत्ता यांचा मिलाफ असलेल्या पटमंजिरीच्या सुरांनी लाल किल्ल्याच्या साक्षीनं रंगलेल्या आझाद हिंद सैनिकांवरील खटल्यातील बचावाच्या भाषणात भुलाभाई देसाई तांडवाचं आवर्तन करत होते. शब्दागणिक फुललेल्या अंगारांनी लाल किल्ल्याच्या भिंती हादरत होत्या. काळाचा हात हातात घेऊन सावरुन बसलेला लाल किल्ला खटल्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून होता. लाल किल्ल्याला हा न्यायदानाच्या देखाव्याचा जुना खेळ माहिती होता. अठठयांशी वर्षांपूर्वी त्यानं हे बहादूरशहाच्या बाबतीत अनुभवलं होतं. ब्रिटिश सरकारनेही ठरवून लाल किल्ला निवडला होता. ज्या लाल किल्ल्याच्या प्रांगणात नेताजींची आझाद हिंद सेना विजयी संचलन करणार होती; युनियन जॅक फेकून देऊन तिरंगी झेंडा डौलाने फडकवणार होती; त्याच लाल किल्ल्यात आझाद हिंद सैनिकांना गद्दार म्हणून हिणवून, तिच्यावर समस्त भारतीयांना थुंकायला लावून खदाखदा हसायचं आसुरी समाधान सरकारला मिळवायचं होतं.

पण घडलं उलटंच! त्याच आझाद हिंद सैनिकांच्या हाताने भुलाभाईंनी सदाशिवरावभाऊप्रमाणे दिल्लीच्या तख्ताला खणती लावली. हादरे बसू लागले. ठिणग्या उडू लागल्या. आणि त्यांच्या दाहकतेनं दूर इंग्लंडात व्हिक्टोरिया राणीच्या सिंहासनाला चटके बसू लागले. बहादुरशहाची कविकल्पना खरी ठरू लागली.

लाल किल्ल्याच्या आत भुलाभाईंचे शब्द आणि बाहेर लक्ष लक्ष जनतेची भीड!

‘लाल किले से आई आवाज, प्रेम धिल्लन और शहनवाज!’ सारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमू लागला. गलका वाढू लागला. धमकावून झालं. लाठी हल्ला करून झाला. शेवटी गोळीबार केला. शंभर लोक मृत्युमुखी पडले. काँग्रेसच्या सभांना पुन्हा गर्दी होऊ लागली. मुंबई, कलकत्ता, दिल्लीमध्ये दोन-दोन लाखाच्या सभा झाल्या. ५ नोव्हेंबर १९४५ रोजी सुरू झालेला खटला ३१ डिसेंबर १९४५ रोजी संपला. सर्वच्या सर्व आझाद हिंद सैनिकांना मुक्त करण्याची नामुष्की सरकारवर आली.

‘हुश्श! सुटलो!’ असं म्हणून मोकळा श्वास घेत असतानाच लॉर्ड वेव्हेलला चेन्नई, मुंबई, कराची, जबलपुरमधून ‘चलो दिल्ली’, ‘जय हिंद’ चे नाद ऐकू येऊ लागले. काय झालं? कुणाचा हा ओरडा?

मुंबई बंदरातील ‘तलवार’ आणि कराचीमधील ‘हिंदुस्तान’ या जहाजांसाहित नाविक दलातील सर्वच्या सर्व म्हणजे पंच्याहत्तर जहाजांवर बंडाचं निशाण झळकू लागलं. इंग्रज अधिकारी आणि भारतीय नौसैनिक यांच्यामध्ये चकमकी झडू लागल्या. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात कोसळू लागले. जणूकाही सत्तावनच्या समरातला ‘अब सब कुछ लाल होनेवाला है’ हा रक्तवर्ण पुष्पाचा मूक संदेशच त्यानिमित्ताने पुन्हा फिरू लागला. जबलपूरच्या बराकीमधूनही बंडाचं निशाण उभं राहिलं. वायुदलातही देशभक्तीचे वारे वाहू लागले. मद्रास, विशाखापट्टणम्, कलकत्ता, दिल्ली, कोचीन, जामनगर ते थेट अंदमानपर्यंत हा वन्ही धुमसू लागला.

हे कमी झालं म्हणून की काय; तीन लाख टेक्स्टाईल मिल कामगार संपावर गेले. मुंबईच्या भेंडी बाजारातील बुरखाधारी महिला रस्त्यावरून संचलन करत जाणाऱ्या ब्रिटिश शिपायांच्या अंगावर आपापल्या घराच्या छतावरून उकळते पाणी फेकू लागल्या. रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी दूरसंचार साधनांवर ताबा मिळवला. इंग्लंड आणि भारत सरकार यांच्यातील संवादाचं पुण्यातील खडकी येथील केंद्रही जनतेच्या ताब्यात गेलं. नेहमी इमानदार म्हणून गौरवले गेलेले गुरखे सुद्धा बंडकऱ्यांवर गोळ्या चालवण्यास नकार देऊ लागले. पोलिसांनी कामावर यायचं नाकारलं. सर्वत्र हलकल्लोळ माजला.

लॉर्ड वेव्हेल फक्त वेडा व्हायचा बाकी होता,

“कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तो आझाद हिंद सैनिकांचा खटला लाल किल्ल्यावर उभा केला.” वेव्हेल दात ओठ खात होता.

“आता गेले म्हणावं उरलेसुरले सैनिक हातून! अरे जरा आपले ब्रिटिश सैनिक किती आहेत सांगा बरं भारतात?”

“काही हजार आहेत सर!”

“फक्त? आणि नाविक?”

“नाविक दलाची स्थिती गंभीर आहे.”

“ऑस्ट्रेलिया, कॅनडाकडून नाविक दल मागवायची व्यवस्था करा आणि हे बघा; जे गोरे सैनिक हाताशी आहेत त्यांच्या मदतीने ब्रिटिश नागरिकांना सुरक्षित इंग्लंडला घेऊन जाता येईल, अशी अशी योजना तयार करा! पटापट!”

“सर…?”

“मग? नुसतं राज्य टिकलं पाहिजे; सूर्य मावळता कामा नये; असं म्हणून चालतं का? सैन्य हाताशी नाही तर मी काय करू? आपणच जिवंत राहू की नाही याची शाश्वती वाटत नाही मला, तिथे साम्राज्य, वसाहत काय घेऊन बसलात?”

“सर सर सर…” कुणीतरी धावत आला.

“बोल!”

“काँग्रेस नेते नाविक दलातल्या बंडकऱ्यांशी बोलत आहेत. म्हणत आहेत, ‘आपल्याला शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य पाहिजे; रक्ताने बरबटलेले नको. तुम्ही आंदोलन थांबवा. आपण ब्रिटिशांशी चर्चा करू.”

“अरे काय सांगतोस काय?” आनंदाने वेव्हेल ओरडला.

“आता मात्र माझ्या कपाळावर साम्राज्य बुडवल्याचा ठपका लागणार नाही. आत्तापर्यंत झालेली चर्चा विसरून जा. सप्तसमुद्रावर अधिराज्य गाजवणारा युनियन जॅक गुंडाळून आम्ही रातोरात पळून जाण्याची तयारी केली होती; हे कुणालाही कळता कामा नये.” वेव्हेल म्हणाला.

गंभीर चेहऱ्याने, उपकारकर्त्याच्या आविर्भावात लॉर्ड वेव्हेल नेहरू-गांधी यांना भेटू लागले. हंगामी सरकार, घटना परिषद यासाठी समित्या बनवू लागले. त्यात सामील होण्यासाठी काँग्रेस व लीग यांच्यात सामंजस्य कसं हवं, याचे उपदेशही देऊ लागले आणि एक दिवस बोटीत बसून इंग्लंडकडे रवानाही झाले. त्याची जागा लॉर्ड माऊंटबॅटन यांनी घेतली.

माऊंटबॅटनने फार विचार न करता भारताच्या भूगोलाशी संपूर्णतः अनोळखी असणाऱ्या रॅडक्लिफच्या हाती सुरी दिली; आणि रॅडक्लिफने ती निष्काळजीपणे भरतभूच्या शरीरावर चालवली. नकाशावर मारलेल्या दोन पुसट रेषांनी भारतमातेच्या ललाटावर मात्र दुर्दैवाची ठसठशीत अक्षरं कोरली गेली. अगदी अश्वत्थाम्याच्या कपाळावरील जखमेसारखी! सदा वाहणारी! भळभळणारी! त्रास देणारी! भारताला म्हणे स्वातंत्र्य मिळालं होतं.

यापुढे चेतनला बोलवेना. तो हळुहळु चौथर्‍यावर हात टेकवत उभा राहिला आणि गाडीच्या दिशेने चालायला लागला. एकाएकी आशिष ओरडला,

“अरे पण ते तुरेन वरून न उडालेलं विमान, तो १८ ऑगस्टचा अपघात, त्याची २२ तारखेला आलेली बातमी, त्याचं काय? नेताजींचं काय झालं पुढे?”

चेतन मागे वळून न पाहता “उद्या सांगतो” असं पुटपुटला आणि गाडी सुरू करून निघून गेला. समोरच्या टपरीच्या छतावर कुठल्यातरी १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला प्लास्टिकचा तिरंगा कोणीतरी खोचून दिला होता. ऊन-वारा-पावसानं विटलेला, तडा गेलेला तो झेंडा वाऱ्याच्या झुळूकेसरशी असहायपणे हलत होता.

क्रमशः सुभाष बावनी ४३ | तेग हिंदोस्तानकी –

ग्रंथ सूची:
१) Bose- an Indian Samurai- मेजर जनरल जी. डी. बक्षी
२) सत्तावन्न ते सत्तेचाळीस- वि. स. वाळिंबे
३) Netaji- India’s Independence and British Archives- कल्याण कुमार डे

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment