सुभाष बावनी ४४ | विमान अपघात

सुभाष बावनी ४४ | विमान अपघात

सुभाष बावनी ४४ | विमान अपघात –

“‘१७ ऑगस्टच्या रात्री आम्ही तुरेनला मुक्काम केला. सकाळी उठून ताईपेईच्या दिशेनं उड्डाण केलं. दुपारी दोन वाजता आम्ही ताईपेई येथील विमानतळावर पोहोचलो. इथेच दुपारचं जेवण, विमानाची किरकोळ डागडुजी आणि इंधन भरणे ही कामं आटोपली. या पुढचा मुक्काम एकदम दैरेनला होणार होता. विमानाची तपासणी होऊन वैमानिकांनी सर्व काही ठिकठाक आहे, याची खात्री केली. सर्व प्रवासी विमानात बसले. विमानातल्या सीट्स काढून टाकल्या असल्यामुळे सर्वांनी मांडी मारलेली. मी नेताजींच्या मागेच बसलो होतो. विमान सुरू झालं. टेकऑफ केल्यावर काहीच क्षणात अचानक हादरे बसायला लागले. लेफ्टनंट कर्नल नोनोगाकी यांनी पाहिले, तर विमानाचा एक पंखा निखळून खाली पडताना दिसला. त्या मागोमाग डाव्या बाजूचे इंजिन गरगरत खाली कोसळले. डाव्या बाजूचे वजन कमी झाल्यामुळे विमान उजव्या बाजूला झुकले आणि खाली येऊन आपटले. विमानाने पेट घेतला होता.

जनरल शिदेई, वैमानिक ताकीजावा, आओयागी यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. इंधन संपल्यास उपयोगी पडावे, म्हणून ज्या पेट्रोलच्या टाक्या भरून घेतल्या होत्या, त्या फुटून पेट्रोल नेताजींच्या अंगातील जाकिटात मुरलं. टाकीचा तडाखा नेताजींच्या डोक्यावर बसल्याने नेताजींचं डोकं फुटलं. रक्तबंबाळ अवस्थेतल्या नेताजींना मी ‘बाहेर पडा’ अशी हाक देताच नेताजी मागच्या बाजूच्या दरवाज्याकडे धावले; पण वाटेतच सामान अस्ताव्यस्त पडले असल्याने लाथा मारूनही विमानाचा मागचा दरवाजा उघडला नाही. ते पाहून मी पुन्हा ओरडलो, ‘नेताजी आगे से निकलिये!’ समोर आग लागली होती. त्या आगीतून नेताजींनी उडी मारली. मी आधीच बाहेर पडलो होतो. मी तोल आणि भान सावरून पाहतो, तो विमानातून बाहेर उडी मारताना नेताजी नखशिखांत पेटलेले. मी धावत गेलो. त्यांच्या अंगातले जाकीट काढून फेकले. त्यांच्या अंगावर माती फेकली. नेताजींना जमिनीवर लोळण घ्यायला लावली आणि शेवटी त्यांच्याच बाजूला बेशुद्ध होऊन खाली कोसळलो. डोळे उघडले तेव्हा आम्ही दोघंही इस्पितळाच्या एकाच खोलीत आजूबाजूच्या पलंगावर पडलो होतो.

डॉक्टर योशिमी आणि डॉक्टर त्सुरूता यांनी उपचार सुरू केले. व्हिटा कॅम्फरचे इंजेक्शन दिले गेले. साकळलेले रक्त काढून नवीन रक्त देण्याचा प्रयत्न केला पण नस सापडेना. नेताजींचा चेहरा पूर्णपणे भाजला होता. सर्व शरीराला बॅंडेज बांधले. दुर्दैवाने या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही. रात्री नेताजींची प्राणज्योत मालवली. त्यांचं शरीर ठेवलेली शवपेटी विमानात मावत नसल्याने तिथेच नेताजींवर अंत्यसंस्कार केला गेला. चेहरा अतिशय विद्रूप झाल्याने फोटोग्राफर लोकांना फोटो काढण्याची मी मनाई केली. नेताजींच्या अस्थी टोकियो येथील रेनकोजी मंदिरात आणून ठेवल्या.’ अशी साक्ष हबीबुर रहमाननं दिली आहे.”- चेतनने विमान अपघाताची सामान्यतः माहीत असणारी कथा आशिषला सांगितली.

“चेहरा विद्रूप झाला असल्याने म्हणजे? शेवटी ती घटना देशासाठी महत्त्वाची होती. त्याचा एकतरी पुरावा हबिबूर रहमान यांनी देशासाठी आणायला पाहिजे होता.” आशिष म्हणाला.

“नेताजींच्या मृतदेहाचा एकच फोटो आहे. परंतु संपूर्णपणे पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेला; चेहऱ्यासकट!” चेतनने माहिती दिली.

“त्या फोटोचा काय उपयोग? असा तर कोणताही फोटो नेताजींच्या नावावर खपवता येतो!” -आशिष

“अरे खरी गंमत तर पुढेच आहे. नेताजींच्या अंगावरचे जाकीट काढताना आपले हात जळाले आणि विमानातून बाहेर उडी मारताना आपल्या गुडघ्याला जखम झाली’ असं हबीबुर रहमान सांगतो.”

“मग?”

“१९४६ मध्ये सुरेशचंद्र बोस यांच्या कन्या शीला सेनगुप्ता यांच्या घरी एकदा हबिबूर रहमानसहित काही निवडक आझाद हिंद सैनिक जमले. सुभाषबाबूंचे मामा सत्येन दत्त यांनी त्या प्रसंगी विमान अपघाताचा विषय काढला. उत्साहाने रहमान सांगू लागला,

‘हे बघा माझे हात! या हातांनी मी नेताजींच्या अंगातले जळते जॅकेट काढून फेकले होते.’

“सत्येन मामा लक्षपूर्वक पाहत होते, ते एकाएकी म्हणाले,

‘हबीब, तुम्ही तुमच्या हातांनी जॅकेट काढायचा व आग विझवायचा प्रयत्न केला, तरी तुमच्या तळहातावर कुठलीही इजा झालेली नाही. याउलट हाताच्या मागच्या भागावर जखमा दिसताहेत, असं कसं?’

“यात भर टाकली तेथेच उपस्थित असणाऱ्या कर्नल रातुरी यांनी-

‘एवढंच नाही मामा; हबीबभाई सध्या जो आझाद हिंद सेनेचा गणवेश घालून आहेत, तोच त्यांनी त्या वेळीही त्यांच्या अंगावर होता.’

‘अस्सं? मग हबीबभाई तुमच्या गुडघ्याला जखम झाली असतानाही पॅन्ट मात्र फाटली नाही, असं कसं?’

“तेव्हा गडबडून गेलेला रहमान तडकाफडकी तिथून निघून गेला.

“डॉक्टर योशिमी म्हणतात, ‘थर्ड डिग्री बर्न्स’ असे मृत्यूचे कारण लिहिलेले डेथ सर्टिफिकेट मी दिले आहे. तर डॉक्टर त्सुरूतांच्या मते ‘हार्ट फेल्‍युअर’ असा शेरा मारलेले सर्टिफिकेट त्यांनी स्वतः लिहिले. ज्यात पेशंटचे नाव ‘इचिरो ओकुरा’ असे लिहिले आहे. याच नावाची नोंद स्मशानभूमीतील नोंदवहीत आहे. त्या नोंदवहीत सुभाषचंद्र बोस हे नाव कुठेही नाही. बरं मी स्वतःच्या हातांनी त्यांचा अंत्यविधी केला, असं म्हणणारा रहमान त्याची तारीख १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट यापैकी कुठलीही सांगतो.

“लोकसभा सदस्य समर गुहा यांनी या प्रकरणाचा शोध लावायचा बराच प्रयत्न केला. ते ताईहोकू विमानतळावरही जाऊन आले. हातात विमान अपघाताचे फोटो घेऊन त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात फोटोतील विमानांची पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष जागेचा देखावा यात कुठेही साम्य नव्हते.

“नेताजींसोबत विमानात जायला न मिळालेले प्रितमसिंग, गुलझारा सिंग, देबनाथ दास हे लोक विमान अपघाताची बातमी ऐकून घाबरले. त्यांनी स्थानिक जपानी अधिकार्‍यांशी संपर्क केला, तेव्हा त्यांना उत्तर मिळाले ‘घाबरू नका. तुमचे नेताजींसोबत जे ठरले आहे, त्यानुसार आपापले काम करत राहा. योग्यवेळी तुम्हाला सत्य सांगितले जाईल.’

“ए एम नायर या आझाद हिंद सैनिकाचे जपानी लष्करासोबत दीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच्या माहितीनुसार विमान अपघातात मारले गेलेले जपानी अधिकारी नंतरच्या काळात जपानमध्ये जिवंत फिरताना आढळले आहेत, आता बोल!” चेतनने दम घेतला.

“या सगळ्याचा अर्थ काय आहे चेतन?”

“लॉर्ड वेव्हेलचे तेव्हाचे उद्गारच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे-

‘१५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करल्यापासून सुभाष बोसांना पकडायला आमच्या फौजा धावत होत्या. आता कोणत्याही क्षणी ते गिरफ्तार होतील, अशी शक्यता असतानाच अचानक बातमी येते- ‘बोस यांचा विमान अपघातात मृत्यू!’ जपान सरकारला काय वाटतं आम्ही मूर्ख आहोत यावर विश्वास ठेवायला?’” चेतन म्हणाला.

“म्हणजे हे सगळं त्यांना भूमिगत व्हायला मदत मिळावी म्हणून केलं गेलं?”

“अर्थात! त्याशिवाय का १८ ऑगस्टच्या अपघाताची बातमी २२ ऑगस्टला दिली जपान्यांनी?”

“मग हबिबूर रहमान जे सांगतो ते काय?” आशिषनं शंका काढली.

“ते त्याला पढवलं गेलं. एकदा नेताजींचा पुतण्या द्विजेंद्र हबिबूर रहमान यांना म्हणाला,

‘आम्हाला नेताजींनी कलकत्त्यावरून निघताना गप्प राहण्याची शपथ दिली होती. काय सांगावं हेही सांगितलं होतं. जे सांगायचं नाही ते आयुष्यभर न बोलण्याची शपथ आम्ही नेताजींसमक्ष घेतली होती.

‘तुम्हालाही तशीच शपथ दिली आहे नं? म्हणून तुम्ही खरं काय ते सांगत नाही आहात नं? खरं सांगा हबीबभाई हा विमान अपघात खोटा आहे नं? सांगा हबीब भाई आपले नेताजी जिवंत आहेत नं?’

“त्यावर हबिबूर रहमान इतकंच म्हणाले,

‘तुम्ही नेताजींचे पुतणे आहात नं? तुम्हीच त्यांचे धाडसी बेत सिद्धीस नेले आहेत नं? जर ते तुम्हीच आहात, तर हे सर्व प्रश्न मला का विचारत आहात?’

“असं म्हणून रहमान निघून गेले. फाळणीमुळे त्यांना पाकिस्तानात जावं लागलं. नंतर ते भेटलेच नाहीत. आपल्या नेत्याची आज्ञा तंतोतंत पाळणारा, दिल्या शब्दाला जागणारा सच्चा शिपाई एक रहस्य उरात दडवून कधीच न येण्यासाठी निघाला होता. द्विजेन्‍द्र त्याच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे पहात होता.”

क्रमशः सुभाष बावनी ४४ | विमान अपघात –

ग्रंथ सूची:
१) महानायक- विश्वास पाटील
२) Bose- an Indian Samurai- मेजर जनरल जी. डी. बक्षी
३) Back from Dead- अनुज धर
४) नेताजी रहस्यगाथा- अनुज धर

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment