सुभाष बावनी ४५ | अपघाताची पटकथा

सुभाष बावनी ४५ | अपघाताची पटकथा

सुभाष बावनी ४५ | अपघाताची पटकथा –

(लेख एडिट केलेला असल्याने शीर्षक कथानकाशी विसंगत वाटेल. पुस्तकातील मूळ लेख वाचल्यावर संगती लागेल)

दैरेनमधील एका अज्ञात ठिकाणी एक भिक्खू विचारमग्न अवस्थेत बसला होता. नुकताच काही दिवसांपूर्वी त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला होता. चेहरेपट्टी मंगोलियन वळणाची असल्याने त्याने परिधान केलेल्या केशरी वस्त्रांशी त्याचं व्यक्तिमत्त्व एकरूप होऊन गेलं होतं.

‘चार दिवसांपासून रेडिओला कान लावून बसलो आहे; अजून काही वार्ता नाही. काय झालं असेल? मित्र राष्ट्रांच्या फौजा लवकर आल्या असतील का? हबीब पकडले गेले असतील का?’ चेहरा बुद्धाप्रमाणे स्थिर असूनही मनात मात्र शंकेच्या लाटा उठत होत्या. तेवढ्यात रेडिओवरचा अनाऊन्सर घाईघाईने म्हणाला,

“दिनांक १८ ऑगस्ट रोजी झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तायवान येथे मृत्यू!”

भिक्खूच्या गंभीर चेहर्‍यावर पुसटशी स्मितरेषा उमटली- ‘चला आजपासून हे नाव इतिहासजमा! मृत व्यक्ती! बापू, जवाहर या सर्वांचे शोकसंदेश प्रसारित होतील. कलकत्त्याच्या घरी तारा पाठवून हळहळ व्यक्त केली जाईल. त्यातल्या त्यात एक बरं आहे की, हे सगळं पाहायला माँ-बाबा नाहीत. त्यांना हा धक्का सहन झाला नसता. पण मेजदा-विभाभाभीला तरी सहन होईल का?

‘याआधीही अशा वावड्या भारत सोडताना उठल्या होत्या. कदाचित मेजदांना या बातमीतील रहस्यही लक्षात येईल; पण एमिलीचं काय? ती भारतात येण्यासाठी अधीर झाली असेल. विजयाच्या वार्तेकडे कान लावून बसली असेल. “आता तुझे बाबा येणार बरं!” असं अनितालाही सांगतही असेल; तिला जो धक्का बसेल, तो कुठल्या परिमाणात मोजायचा? पण तरीही भारतमातेसाठी…’

“देवदार वृक्षांच्या बर्फाच्छादित सावलीत जाऊ इच्छिणाऱ्या भिक्खू महाशयांच्यासमोर मी उभा आहे का?” या प्रश्नानं भिक्खूची तंद्री भंगली.

“हो हो! काय सूचना आहे?”

“मी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायला आलो आहे.”

“तुझं नाव काय?” भिख्खूनं विचारलं.

“मी तुमचं नाव नाही विचारलं सर. कृपया तुम्हीही…”

“ठीक आहे. मी तयार आहे.”

“तुमच्यासाठी शिदेईंनी गरम कपडे पाठवले आहेत, ते कृपया ताब्यात घ्या.”

“धन्यवाद!”

काषाय वस्त्र धारण केलेला, किंचित दाढी वाढलेला साधक लष्कराच्या हिरव्यागच्च जीपमध्ये स्वार झाला. फार विलोभनीय दृश्य होते ते. भारताच्या योद्धा संन्यासी परंपरेची आठवण करून देणारे.

पाहता पाहता हवेतला गारठा वाढत गेला. भुरभुर करत बर्फही कपड्यांवर अलगद उतरू लागला.

“आपण देवदार वृक्षराजींच्या सीमेत प्रवेश केला का?”

“नाही अजून. त्या आधी एक चेकपोस्ट आहे, तिथे माझ्या ओळखीचा माणूस उद्या सकाळी असणार आहे. आज आपण चेकपोस्टच्या अलीकडे एका हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहोत. सीमेजवळील भागात अवैधरित्या ये-जा करणारे लोक कधीकधी या हॉटेलात उतरतात; त्यामुळे कधीकधी तपासणीसुद्धा होते, तरी सावध राहा.”

खोलीत पडल्यापडल्या पुन्हा विचारचक्र सुरू झालं ‘कशावरून रशिया मदत करेल? दगाफटका होणार नाही याची काय शाश्वती? पण दुसरं काय करता आलं असतं या स्थितीत? आणि हीच भीती जर्मनीत शिरतानादेखील होतीच ना? तरीही धाडस केलेच ना? आता जे होईल ते पाहिलं जाईल.’

बाहेर एकदम वर्दळ वाढली. रशियन भाषेत बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. इथपर्यंत आणणाऱ्या ड्रायव्हरलाही बाजूला घेऊन काहीतरी विचारणा सुरू होती.

“भिक्खू महाशय! दरवाजा उघडता का?” ड्रायव्हरने हाक दिली.

“बोल!”

“हे माझे मित्रच आहेत. योगायोगाने हेही तिकडेच चालले आहेत. यांची गाडी जास्त आरामदायक आहे. आपण कृपया यांच्या गाडीतून पुढचा प्रवास करावा.”

“ठीक आहे!”

“आपली बॅग मी त्यांच्या हवाली केली आहे. मी माघारी निघतोय”

“अच्छा. अलविदा.”

गाडी चांगली आरामदायक होती. काचांवर बर्फाचे पांढरे थर जमा होत होते आणि हवेत उडूनही जात होते. वातावरण काचा बंद असूनही थंडगार झालं होतं.

“महाशय तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे हवी आहे का?” गाडीतल्या एकानं विचारलं.

“मला कॉफी चालेल.”

“अजून काही हवे असल्यास सांगा. आपल्याला कुठलाही त्रास होऊ नये, असे आदेश आहेत आम्हाला.”

“कोणाचे?”

“या भागात फक्त एकच आदेश चालतो- स्टॅलिन साहेबांचा!”

“म्हणजे…? तुम्ही मला…?”

तेवढ्यात चेक पोस्ट पार केलेली गाडी करकचून ब्रेक दाबून थांबली. दोन बाजूंनी दोन व्यक्ती कारमध्ये शिरून भिक्खूच्या आजूबाजूला बसल्या. गाडीचा प्रवास पुन्हा सुरू झाला. काहीही बोलण्यात, विचारण्यात अर्थ नव्हता. मघाशी चेकपोस्टवर कोणीच कसं अडवलं नाही, हे थोडं लक्षात यायला लागलं होतं. वर्तमान हळूहळू स्पष्ट होत होतं; भविष्याचा थांग मात्र लागत नव्हता.

क्रमशः सुभाष बावनी ४५ | अपघाताची पटकथा –

ग्रंथ सूची:
१) Bose- an Indian Samurai- मेजर जनरल जी. डी. बक्षी
२) Prisoner of Yakutsk- The Subhash Chandra Bose Mystery Final Chapter- श्रेयस भावे
३) अज्ञातवास का हमसफर- डॉ. राजेंद्र मोहन भटनागर

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment