सुभाष बावनी ४६ | मातृभूमीच्या दिशेने –
“निदान मला कुठल्या जागी आणून टाकले आहे, ते तरी सांगा!” नुकत्याच शुद्धीवर आलेल्या भिक्खूने आपली सर्व शक्ती लावून ओरडण्याचा प्रयत्न केला. व्याधीजर्जर झालेल्या त्या देहातून क्षीण आवाज बाहेर पडत होता.
‘आता याचं काही खरं नाही’ असं पहाऱ्यावरच्या सैनिकांना वाटत असतानाच पुन्हा आतील चैतन्याने उसळी मारली होती. तसं हे त्या देहाला नवीन नव्हतं. याआधीही अनेकदा त्या देहाच्या अश्वत्थ वृक्षावर चैतन्याने मृत्यूसोबत सूरपारंब्या खेळल्या होत्या. मंडालेच्या पिंजऱ्यांपासून ते शिवणीच्या कोठड्यांपर्यंत आणि पाणबुडीपासून ते विमानापर्यंत अनेकदा नियतीनं त्याची जीवननौका खवळलेल्या दर्यामध्ये उलटून दिली होती; पण तरीही या चिवट चैतन्याने परत आपल्या आयुष्याची होडी सुलटी करून चिवटपणे तिच्या पोटात प्रवेश केला होता. कुणासाठी? देहाची आसक्ती? अरे हट! तसं असतं तर या फंदात हा देह पडलाच कशाला असता! मग रक्ताची ओढ? त्यांच्यासाठी तर तो केव्हाच इतिहास बनला होता. मग? पस्तीस कोटी पुत्रांची अभागी माता- भरतभूमी! तिच्याचसाठी हा डाव पुन्हा पुन्हा मांडायचा. दैव उफराट्या चाली खेळायचं. पट उधळला जायचा आणि हा एखाद्या स्थितप्रज्ञासारखा सोंगट्या जमवून आधीपासून सुरुवात करायचा. नुकत्याच मृत्यूशी झालेल्या झटापटीतून त्यानं पुन्हा एकदा प्राण सोडवून आणले होते. कुडी शाबूत होती. क्लांत देहाने डोळे उघडून ‘आपण आहोत’ हे जाणल्यानंतर नेमके कुठे आहोत, हे माहीत करून घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. बाहेरच्या शिपायाकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही. येणारही नव्हता. याआधीही आला नव्हता. जागा बदलल्या; माणसं बदलली; पण ‘मी कुठे आहे?’, ‘या जागेचं नाव काय?’ यासारख्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर गेल्या चार-पाच वर्षात कोणीच दिलं नव्हतं.
पहिली जागा तर भयावह होती. जेवण, पाणी आणि औषधं यांची देवाण-घेवाण करण्यापुरताच त्याचा माणसांशी संपर्क होई. बाकी निर्मनुष्य! ना कुठली खिडकी, ना झरोका. बाहेर दिवस आहे की रात्र; ऊन आहे की पाऊस; हेही माहित होत नसे. आपल्याला इथे येऊन नेमके किती दिवस, किती महिने, किती वर्षं होऊन गेले हेही त्याला आता आठवत नव्हते. कुणाला विचारलं तर ते सांगत नसत.
कानाला ध्वनी नाही. डोळ्यांना दृश्य नाही आणि वाणीला शब्द नाही. आपण जिवंत आहोत याचा तरी काय पुरावा आहे?
पण एक दिवस मात्र याला अपवाद ठरला. अधिकारी दयाळू झाले. त्यांनी मोठ्या उदारपणे आपल्या मातृभूमीच्या दुर्भाग्याची वार्ता तत्परतेनं आपल्यापर्यंत पोचवली-
“आज १५ ऑगस्ट १९४७! तुमचा देश स्वतंत्र झाला.”
“काय सांगतोस? अरे आता मला फिकीर नाही. ज्याच्यासाठी हा सगळा खेळ मांडला होता, ते काम झालं.”
“पूर्ण ऐकून घ्या. तुमच्या देशाची फाळणी झाली- पूर्व बंगाल आणि पश्चिम पंजाब मिळून पाकिस्तान नावाचा देश निर्माण झाला.” एवढं बोलून अधिकारी निघून गेले.
“फाळणी? आमार बांगला! शोनार बांगला!” एवढेच अस्पष्ट शब्द उच्चारून भिक्खू जमिनीवर कोसळला.
पुन्हा काही दिवस तोच भयाण एकांत.
एक दिवस दार किलकिलं झालं. सैतानाला काळीज नसते असं थोडीच आहे? शेवटी आपण सुटलो तर! आनंद झाला; पण हा आनंद क्षणभंगूर ठरला.
नवीन ठिकाण! नवीन माणसं! त्रासाची नवीन तऱ्हा!
मान वाकवून राबणारे कैदी; चाबकाच्या फटकाऱ्यासरशी काम करून घेणारे अधिकारी आणि सोबतीला हाडं गोठवणारी थंडी!
पाय ओढत काम करणं सुरू झालं. खंगलेलं शरीर आणखी खंगू लागलं. मृत्यूच्या दिशेनं चाललेल्या प्रवासाचा वेग वाढला.
“सर आणखी काही दिवस जर तो भिक्खू तिथे राहिला, तर जिवंत राहणार नाही.” एका अधिकाऱ्यानं माहिती दिली.
“तो मरता कामा नये. त्याला सुरक्षित ठिकाणी हलवा. औषधोपचार करा. मोकळी हवा द्या. तो जगला पाहिजे. तो जगला पाहिजे.”
वरतून आदेश आला. तो आवाज म्हणजे आदेश! आदेश म्हणजे तोच आवाज! इतर कुठल्या आवाजाला आदेश द्यायचा अधिकारच नाही आणि त्या आवाजाला आदेशाशिवाय बोलण्याचे इतर प्रकार माहीत नाहीत. खालच्या लोकांचं काम फक्त अंमलबजावणी करणं.
बेशुद्धावस्थेतच त्याला त्या अनोळखी वास्तूत आणून टाकण्यात आलं. नुकतीच त्याला शुद्ध येत होती. कसे तरी शब्द जुळवून त्याने तो प्रश्न विचारला होता.
इथली व्यवस्था चांगली आहे मात्र. खोलीही सर्व सुखसोयींनी सुसज्ज आहे. दिलं जाणारं जेवणही चांगलं आहे. प्रकृती सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. उद्यापासून फिरायला बागेतही घेऊन जाणार आहेत म्हणे. पण शेवटी सोन्याचा झाला म्हणून काय झालं; पिंजरा तो पिंजराच!
‘हा पिंजरा केव्हा उघडणार? उघडणार की नाही?’
एक दिवस हे दार उघडलं! सताड उघडलं! चहलपहल वाढली. कोरडे, निर्विकार चेहरे बोलके झाले. मौन ओढलेली तोंडं खूप खूप बोलू लागली. अगत्याने येऊन भेटू लागली. आस्थेने विचारपूस करू लागली. आज्ञेनं घेतली जाणारी काळजी आपुलकीने घेतली जाऊ लागली. हे कसं घडलं? कृष्णाचा कोठडीतून बाहेर पडायचा रस्ता कसा काय मोकळा झाला? पहारेकरी तर जागे आहेत, मग काय कंसालाच डाराडूर झोप लागली?
‘स्टॅलिनचा मृत्यू! स्टॅलिनचा मृत्यू!’ किमान चार लोकांनी हा निरोप येऊन सांगितला. ‘अरे यांना दुःख झालं की आनंद?’
रशियातील सर्व बंदिगृहांची दारे उघडली गेली. बंदिवानांची सुटका झाली.
आता वर्तुळ पूर्ण होण्याची वेळ आली होती. बारा वर्षे पुत्रवियोग सहन केलेल्या मातेनंही आपल्या पराक्रमी पुत्राचं स्वागत करायला हात पसरले. मौलवीची झोळी घेऊन बाहेर पडलेला पुत्र भिक्खूची काषाय झोळी खांद्यावर घेऊन परत त्याच मातृभूमीच्या कुशीत जायला अधीरतेने निघाला.
क्रमशः सुभाष बावनी ४६ | मातृभूमीच्या दिशेने.
ग्रंथ सूची:
१) Netaji Living Dangerously- किंगशुक नाग
२) अज्ञातवास का हमसफर- डॉ. राजेंद्र मोहन भटनागर
© अंबरीश पुंडलिक