सुभाष बावनी ४७ | शौलमारी बाबा –
“मी छातीवर हात ठेवून सांगतो, की शौलमारी आश्रमातले बाबा दुसरे तिसरे कोणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोसच आहेत.”
दिल्लीत भरगच्च पत्रकार परिषद सुरू होती. दावा करणारी व्यक्ती ही साधीसुधी नव्हती; भारतातून निसटल्यावर नेताजींना ज्यांनी बेचाळीस दिवस आपल्या काबुल येथील घरात आश्रय दिला होता, ते उत्तमचंद मल्होत्रा बोलत होते. गेल्या आठवड्यातच ते स्वतः शौलमारी बाबांना भेटून आले होते.
उत्तमचंदांच्या मनावर बाबांच्या संमोहित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडली होती. साम्य वाटत होते. म्हणूनच दिल्लीला आल्यावर त्यांनी शौलमारी बाबा हेच नेताजी आहेत, अशी भूमिका घेतली. तेच उत्तमचंद जाहीर पत्रकार परिषदेत सांगत होते.
सुभाषवादी जनता परिषदेसारखे छोटेमोठे गट वगळता देशात इतर कुणी शौलमारी बाबांची आणि त्यांच्या विषयीच्या चर्चांची फारशी दखल घेतली नाही पण सरकारचे धाबे मात्र दणाणले. हा खरंच सुभाष असेल तर?
आश्रमाच्या हालचालींवर गुप्त पाळत ठेवली जाऊ लागली. इंटेलिजन्स ब्युरो, राज्य सरकार यांचे रोजचे रिपोर्ट केंद्राला जाऊ लागले.
मध्यंतरी बाबांची तब्येत बिघडली. आश्रमातून प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कविराज कमलाकांत घोष यांना बोलावणे पाठवले गेले. कमलाकांत घोष हे बोस कुटुंबाच्या जवळचे. जाण्याआधी द्विजेंद्र बोसने त्यांना नेताजींच्या अंगावरील काही खाणाखुणा सांगून त्या शौलमारी बाबांच्या अंगावर आहेत का, हे तपासायला सांगितले. घोष आश्रमात जाऊन उपचार करून आलेत. द्विजेंद्रने सांगितलेल्या खुणा त्यांना बाबांच्या शरीरावर कुठेही आढळल्या नाहीत. बोस कुटुंबाकरता हा प्रश्न सुटला होता; पण सरकारसाठी नाही. शौलमारी बाबांचा उगम शोधण्याच्या खटपटीत सरकार जोमाने लागले.
पूर्व बंगालमध्ये राहणारा अनुशीलन समितीचा एक जुना कार्यकर्ता भटकत भटकत कलकत्त्याला आला. त्याने शौलमारी आश्रमाबद्दल ऐकले. नेताजींना भेटायच्या ओढीने तो आश्रमात पोहोचला. बाबा प्रत्येकाला भेटतीलच याची शाश्वती नसे; पण सुदैवाने भेटीची परवानगी मिळाली.
गूढ-गंभीर अशा वातावरणात त्यानं कुटीत प्रवेश केला. खोलीच्या मधोमध डोळ्यावर ताण आणणारा, अधिक प्रकाश देणारा झगझगीत दिवा लावला होता. चार आसने होती. बाबांच्या आसनाच्या मागे विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांची चित्रं होती.
एका आसनावर तो कार्यकर्ता आणि उरलेल्या दोन आसनांवर व्यवस्थापक रमणी रंजन दास आणि भौमिक जाऊन बसले. दोघांच्याही हातातील पात्रांमध्ये निखारे पेटलेले होते. त्याचं लक्ष कुटीच्या मागच्या दाराकडे लागलं. पुढच्या क्षणाला ते दार उघडलं गेलं. घाईघाईनं बाबांनी आत प्रवेश केला. लगोलग दास आणि भौमिक यांनी आपापल्या हातातील पात्रांमध्ये धूप टाकायला सुरुवात केली. धूर अधिकाधिक बाबांच्या चेहऱ्यावर जाईल, असा प्रयत्न करू लागले.
“आता तर लक्षात आले ना, मी नेताजी नाही ते….” बाबांनी आल्या आल्या नेहमीचा प्रश्न विचारला. बाबांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत हा कार्यकर्ताच आनंदाने ओरडला,
“जतीनदा! जतीनदाच ना? सिगरेट ओठात धरण्याची लकबही तीच!”
बाबांच्या चेहर्यावरचे भाव झरझर पालटले. आले त्यापेक्षा अधिक घाईने ते आत निघून गेले. त्या कार्यकर्त्याला लगोलग आश्रमातून घालवून दिले गेले. तो गेल्याबरोबर आश्रमात आवराआवर सुरू झाली. आठवड्याभरात बाबा रमणीरंजन दास आणि इतर काही विश्वासू भक्तांच्या सोबत उत्तराखंडातील उखीमठ येथे निघून गेले- साल होतं- १९६८!
कोण जतिनदा? काही दिवसांनी या जतिनदांचा उगम समजला. जतिन चक्रवर्ती हे पूर्व बंगालातील कोमिल्ला येथे राहणारे. कधीकाळी कोमिल्ला- व्हिक्टोरिया कॉलेजचे प्राचार्यपद भूषविलेले. अनुशीलन समितीचे भूतपूर्व सदस्य! त्यांनी कोमिल्ला येथील डेव्हीस नावाच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा वध केला. पोलीस या वधासाठी त्यांच्या मागावर होती आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते.
आश्रमातून निघून गेल्यावरही काही दिवस पोलिसांची व्यवस्थित पाळत शौलमारी बाबांवर होती. महाराष्ट्रातील अमरावती जवळील एका मंदिरात काही दिवस त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर मात्र पोलिसांच्या नजरेतून ते निसटले, ते कायमचेच! काही वर्षांनंतर १९७७ मध्ये बाबांच्या मृत्यूची खात्रीलायक बातमीही सरकारदरबारी येऊन पोहोचली.
हुश्श! एक दडपण संपले. सत्तेला आव्हान देणारा, काळाच्या पडद्याआड गेलेला रणझुंजार सुभाष परत क्षितिजावर उगवतो की काय? या दडपणातून अनेक जण बाहेर आले. आश्रमात शुकशुकाट पसरला. आश्रमात राहिलेल्या सामानाची छानबीन केल्यावरही फार काही हाती आले नाही. नाही म्हणायला कुणा गुमनामी बाबाची काही पत्रे मात्र सापडली.
‘आता हा कोण गुमनामी बाबा? कुठलीही अध्यात्मिक साधना न करणाऱ्या शौलमारी बाबाशी या गुमनामी बाबाचा काय पत्रव्यवहार होत असावा? की मग हा बाबाही…?
‘कंसाच्या कोठडीत नंदाघरची वीज सोडून कृष्णाला गोकुळात सुखरूप वाढू देण्यासारखा तर प्रकार नसावा? सरकारच्या नजरेतून खऱ्या माणसाला दडवून ठेवण्यासाठी तर हा शौलमारीचा घाट घातला गेला नसेल ना?’
आशिष विचार करत करत घरी निघाला. ‘हरी अनंत हरी कथा अनंता’ तशीच ही सुभाषकथाही अनंत होत चालली आहे. कितीही जाणलं तरी आणखी दशांगुळे उरतेच आहे. कोण असेल हा गुमनामी बाबा? कूचबिहार जिल्ह्यातील फालकाटा गावाबाहेरील शौलमारी आश्रमात पन्नास एक वर्षांपूर्वी सापडलेली कुणा गुमनामी बाबाची पत्रं आशिष नावाच्या तरुणाला आज झोपू देणार नव्हती. आशिष आतुरतेनं उद्याचा दिवस उगवण्याची वाट पाहू लागला.
क्रमशः सुभाष बावनी ४७ | शौलमारी बाबा.
(सोबतची छायाचित्रे ‘शौलमारी बाबा हेच नेताजी आहेत’ असे आजही मानणाऱ्या अभ्यासकांच्या website वरून घेतलेली आहेत. ज्यात त्यांनी शौलमारी बाबा आणि नेताजी यांच्यातील साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे)
ग्रंथ सूची:
१) सुभाषकथा- प्र. के. अत्रे
२) Back from Dead- Anuj Dha
© अंबरीश पुंडलिक