सुभाष बावनी ४८ | मातृभूमीत प्रवेश

सुभाष बावनी ४८ | मातृभूमीत प्रवेश

सुभाष बावनी ४८ | मातृभूमीत प्रवेश –

“घे बाबा! दोन घास खाऊन घे!”

“नको माई”

“का रे बाबा? आवडलं नाही? पण दुसरं काय करू? धान्याचा कण नाही. चार झाडांवरून हा पाला तेवढा ओरपून आणला आणि शिजवला. सोबत थोडा गूळ आणला आहे चार घरी मागून. आम्ही मायलेक सुद्धा तेच खातोय.”

“माई तुम्ही आपलं सुखाचं आयुष्य का दुःखात लोटायला निघाला आहात माझ्यासाठी? तुझ्या मुलाला चांगला शिकव. मोठा कर. त्याला चांगला तालेवार झालेला पहा. का माझ्या मागोमाग ठिकठिकाणच्या ठोकरा खात नैमिषारण्यातल्या या पडक्या शिवमंदिरात येऊन पडली आहेस?”

“कारण माझ्या बापाला- महादेव प्रसाद मिश्राला मी वचन दिलंय- ‘तुम्ही नेपाळमधून हाताला धरून भारतात आणलेल्या भारतमातेच्या या थोर सुपुत्राची मी सावलीसारखी सोबत करीन म्हणून!”

झाडपाल्याचा घाटा आणि गूळ खाताखाता बाबांच्या मनःचक्षूंसमोर रशियातून निघाल्यानन्तरची ठिकाणं एक एक करून हजेरी लावू लागली. सैबेरियाच्या बर्फाच्छादित टेकड्यांमधून चीनपर्यंत केलेली जीवघेणी पायपीट, तिथून तिबेट, मानस सरोवराचं ते अद्भूत दर्शन, दोनदोनशे- तीनतीनशे वर्षे वय सांगणारे ते साधक, तिथून नेपाळ! नेपाळमध्ये महादेव प्रसाद मिश्रा या सच्छील संस्कृत शिक्षकाची झालेली भेट. त्यांच्याबरोबर भारताच्या पवित्र भूमीवर ठेवलेलं पहिलं पाऊल! किती रोमांचित करणारा होता तो अनुभव! जितकं दुःख पेशावर सोडून अफगाणिस्तानात पाय ठेवताना झालं होतं; तितकाच किंवा त्यापेक्षा अधिकच आनंद जिवंतपणी या देवभूमिच्या कुशीत शिरताना वाटला. स्वामी विवेकानंद अमेरिकेहून आल्यानंतर या भूमीच्या मातीत गडबडा का लोळले असतील, याची जाणीव झाली त्यादिवशी. त्यानंतर इटामधला मुक्काम. रिजोरच्या राणीने आपल्याला गुरु मानून घेतलेला उपदेश. राणीच्या मृत्यूनंतर आग्र्याजवळील मणिपुरी या छोट्याशा गावी भेटलेला सुरेंद्रसिंग चौधरी. राजासाब म्हणे! केवढं मोठं संकट आलं होतं त्याच्यामुळे.

काहीतरी मिळवायची अपेक्षा करून येतात आणि मग काहीच नाही मिळालं की आदळाआपट करतात. देण्यासारखं होतं ते केव्हाच देऊन टाकलं आहे. आता देण्यासारखं असं काहीच नाही माझ्यापाशी. काहीच नाही.

बाबांना नकारात्मक मान हलवताना पाहून सरस्वतीदेवी म्हणाल्या,

“नाही आवडलं का बाबा? अरे आम्हाला सवय आहे असं काहीतरी खायची. तुझा जन्म मोठ्या घरातला. तुझ्या घशाखाली नाही उतरणार हे असलं.”

“तसं नाही माई. मी…”

“मी काय म्हणते; तुझ्याकडे एवढे सुटाबुटातले मोठे मोठे लोक येतात, त्यांना मागत का नाहीस? तुझाही काही ना काही अधिकार आहे ना या सगळ्यावर?”

सरस्वतीदेवींच्या या वाक्यावर मात्र बाबा उसळून म्हणाले,

“आपला देश ही आपली जबाबदारी असते माई; अधिकार नाही. पण प्रत्येकाला तो अधिकार वाटू लागल्यामुळे देशाचे तुकडे झालेत. ते सांधायचे आहेत म्हणून हा देह जिवंत तरी ठेवावा लागतो आहे; नाहीतर केव्हाच…”

“ते देश बिश काही समजत नाही मला. पण तुझी अवस्था पाहवत नाही. बरं नको जगाला सांगूस; घरी तरी कळवशील?” त्या पदराला गाठी मारून दोनवेळची सोय कशीबशी करू पाहणाऱ्या विधवा माऊलीला बाबाच्या उंचीवर जाऊन विचार करता येणं शक्यच नव्हतं.

“घरचे केव्हाच जाऊन बसलेत दिल्लीकरांच्या मांडीवर. कुणी आमदार. कुणी खासदार. कुणी रिसर्च ब्युरोच्या नावानं मलिदा ओढतोय. ज्याला त्याला फायदा हवाय माई. सगळा आनंदीआनंद आहे.”

“मग तुझ्या घरी असं कोणीच नाही, ज्यांना तू हवा असशील? फक्त तू?”

“आहे. घरीही आहे आणि लक्तरं लक्तरं झालेल्या माझ्या वंगभूमीतही आहे. ते माझा शोध घेत असतील. येतील लवकरच!”

बाबांचा ‘लवकरच’ हा शब्द इतक्या लवकर उगवेल, अशी कल्पना सरस्वतीदेवींनी केली नव्हती.

विख्यात स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे एकेकाळचे नेते, प्राध्यापक अतुल सेन कलकत्त्याहून फिरत फिरत नैमिषारण्यात उतरले आणि एके दिवशी कुतूहल म्हणून पडक्या मंदिरात राहणाऱ्या बाबाला भेटायला मंदिराच्या दारात येऊन थांबले,

“मी इथे राहणाऱ्या गुमनामी बाबांविषयी चक्रतिर्थावर ऐकलंय. मी त्यांना भेटू शकतो का?”

सरस्वतीदेवी अतुल सेन यांना सामोरे येत म्हणाल्या,

“ते तुम्हाला दिसणार नाहीत. पडद्याच्या आडून बोलतील.”

“चालेल. चालेल. बाबाजींचे उपदेशाचे दोन शब्दही कानावर पडले तरी धन्य समजेन मी स्वतःला. खूप उच्चकोटीचे साधक आहेत म्हणे!”

अतुल सेनांना प्रवेश मिळाला. समोर दिसणाऱ्या पडद्याच्या आत बसलेल्या, कधीही न पाहिलेल्या- न देखलेल्या अनोळखी बाबाला उद्देशून अतुल एक शब्द जुळवत बोलू लागले-

“बाबाजी, मी अतुल सेन! कलकत्त्यावरून आलोय. मी आपल्याला…”

“अतुल…” आतून आवाज आला. शिवमंदिराच्या उंच घुमटात घुमला. ती वाणी कानावर पडली मात्र! प्राध्यापक महाशयांची वाचाच बंद झाली. एकाच वेळी अनेक शब्द, अनेक प्रसंग डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले. स्वराज्य पक्षाच्या प्रचाराच्या वेळी देशबंधुंसोबत केलेले ते झंझावाती दौरे; हरीपुरा काँग्रेसच्या मंचावरून केलेलं ते घणाघाती भाषण; बर्लिनमधील आझाद हिंद रेडिओवरून संबोधित करणारे ते आश्वासक शब्द; रक्त आणि अश्रू याशिवाय कशाचाही मोबदला न देता पन्नास हजार सैनिकांना दिल्लीच्या रस्त्यावर आगेकूच करायला प्रेरणा देणारी ती अमोघ वाणी!

योग्य व्यक्तीच्या हातून योग्य तो निरोप धाडला गेला होता. बंगालमधून आवर्त उठून कोणत्याही क्षणी नैमिषारण्यात येऊन धडकणार होतं.

क्रमशः सुभाष बावनी ४८ | मातृभूमीत प्रवेश.

ग्रंथ सूची:
१) Conundrum: Subhash Bose’s life after death- Anuj Dhar

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment