सुभाष बावनी भाग ५ | इंग्लंडला प्रयाण –
सुभाष बावनी भाग ५ –
“जालियनवाला बागेतल्या घटनेमुळे सारा पंजाब संतप्त झाला आहे. अजून वर्तमानपत्रात काही आलेलं नाही, पण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार, त्या चौकशी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला, की देशातलं वातावरण प्रक्षुब्ध झाल्यावाचून राहणार नाही. कलकत्त्यातील क्रांतिकारक तर अशा गोष्टीत आघाडीवर! त्यांचीही नावे येतील, आणि त्या सर्वांच्या बरोबर सुभाष फिरतो, म्हणून त्याचंही नाव येईल. त्याला लवकरात लवकर या आगीपासून दूर न्या. इंग्लंडला पाठवा हवं तर!” सिमल्याहून आलेले सुरेशचे पत्र जानकीबाबूंनी मोठ्यानं वाचून दाखवले.
“काय करायचं रे शरद?”
“आता केव्हाही भडका उडणार आणि त्या भडक्यात सुभाष आपलं आयुष्य होरपळून घेणार!” – शरद
“मी असं होऊ देणार नाही. सुरेश म्हणतो ते ठीकच आहे; आपण सुभाषला इंग्लंडलाच पाठवू. सुभाष आला की त्याला माझ्या खोलीत पाठवून दे.”
‘आता आपण काय केलं? कटकला जाताना तर बाबा आपल्यावर खुश होते; मग का बोलावलं असेल?’ असा विचार करत सुभाष बाबांसमोर उभा राहिला.
बाबांनी फक्त एकच प्रश्न विचारला,
“इंग्लंडला जातोस आय सी एस साठी सुभाष?”
नवविवेकानंद समूहात आज गंभीर चर्चा सुरु होती. सुभाष विरुद्ध बाकी सगळे असे दोन गट पडले होते.
“अरे पण हेमंता, मुलं आपलं सगळं तारुण्य पुस्तकं उपसण्यात घालवतात तरी पास होत नाहीत, आणि सात-आठ महिन्यांच्या अभ्यासात मी ते करू शकणार आहे, होय रे?” सुभाषने आपली बाजू मांडली.
“सुभाष तू कुठली परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाला नाही असं कधी झालं आहे?” हेमंता
“बरं झालो उत्तीर्ण समज! तरी ती सनद नाकारण्याचा पर्याय आहेच नं आपल्याकडे?”
“अरे सगळे जाताना असंच म्हणतात पण एकदा का तिकडच्या सुखाची चटक लागली की मायही आठवत नाही आणि मातृभूमीही नाही!”
“मग एकदा सिद्धच होऊन जाऊ दे, माझं देशप्रेम खरं कि बेगडी ते. आय सी एस झाल्यावर मोह मला बाहुपाशात जखडून ठेवतो, की मातृभूमीची आर्त हाक साद घालते ते!” सुभाष तावातावाने तिथून निघाला.
नवीनच शिवलेल्या सुटात सुभाष छान दिसत होता. शरद-विभा सुभाषच्या त्या नवीन रुपाकडे पाहतच राहिले. आपल्या ‘रंगाकाका’ला छोट्यांनी चिडवून चिडवून हैराण करून सोडलं होतं.
१५ सप्टेंबर १९१९ ला सिटी ऑफ कॅलकटा या बोटीने भारताचा किनारा सोडला. सुभाष किनाऱ्यावरून स्वतंत्रपणे उडणाऱ्या पक्षांकडे आणि पारतंत्र्याची जडशीळ शृंखला पायात अडकलेल्या मातृभूमीकडे आलटून पालटून पाहत होता.
आयसीएसबरोबरच सुभाषने केम्ब्रिजमध्येही प्रवेश मिळवला. तिथेही तत्वज्ञान हाच विषय निवडला. या परीक्षेला भरपूर वेळ होता. पण आय सी एसची परीक्षा आठ महिन्यांवर आली होती आणि बरेचसे विषयही नवीन होते.
संस्कृत, इंग्रजी हे तर सुभाषसाठी डाव्या हाताचा मळ. कस लागणार होता तो युरोपचा इतिहास वाचताना. कारण तो वाचायला फ्रेंच भाषा यायला हवी. सुभाषने नेटाने अभ्यास सुरु केला. फ्रेंच भाषा शिकण्याचा दुहेरी फायदा असा झाला, की जर्मनीचा बिस्मार्क, ऑस्ट्रियाचा मेटरनिख, इटलीचा काव्हूर आदी राष्ट्रपुरुषांबद्दलचे काही मौलिक ग्रंथ त्याला मुळातून वाचता आले.
आय सी एसचे पेपर महिनाभर चालले. संस्कृतचा पेपर पाहून तर सुभाष हरखूनच गेला.
भाषांतराच्या प्रश्नात कुठेही चूक होऊ नये, यासाठी सुभाषने आधी रफ कागदावर उत्तरे लिहायला सुरुवात केली. आवडीचा विषय असल्याने वेळेचं भान राहीलं नाही. वेळ संपल्याची घंटा वाजली, तेव्हा अर्ध्याहून अधिक पेपर फेअर करायचा राहिला होता. स्वतःशीच चरफडत सुभाषने पेपर दिला.
‘आता काही खरं नाही. गेली आपली आयसीएसची डिग्री!’ असा विचार करून सुभाषने बाबांना पात्र लिहायला घेतले,
“या परीक्षेचा निकाल काय लागेल हे सांगता येत नाही. एकदा वाटते आपण पास होऊ, एकदा वाटते नापास होऊ. त्यामुळे तुम्हीही फारशी आशा ठेऊ नये!”
१५ सप्टेंबर १९२०! गेल्या वर्षी बरोबर याच दिवशी कलकत्ता सोडले होते. एक वर्ष होऊन गेलं बघता बघता! आणि हाती काय येणार? असा विचार करत सुभाष बसला होता, तोच त्याच्या हातात तार पडली,
“काँग्रॅजुलेशन्स! सी मॉर्निंग पोस्ट!”
दुसऱ्या दिवशी सुभाषने मॉर्निंग पोस्टचा अंक पाहिला- सुभाष केवळ आयसीएसची परीक्षा उत्तीर्णच झाला होता असं नव्हे,तर गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकाने झळकला होता. इंग्लिश कंपोझिशनमध्ये सर्वाधिक गुण घेऊन.
आश्चर्य! आनंद! प्रश्न!!
आता काय करायचं? आपल्याला वाटलं होतं नापास होऊ, प्रश्न सुटेल. आता डिग्री घ्यायला नकार द्यावा तर माँ, बाबांसकट घरात सर्वांना वाईट वाटणार. स्वीकार करावा
तर नवविवेकानंदमेळा, हेमंता रागावणार!
पण याहीपेक्षा महत्वाचं आहे आपलं मन! आयसीएसचा स्वीकार म्हणजे आत्म्याशी-मनाशी भांडण उकरण्यासारखं आहे. आणि मन? ते तर भारतमातेच्या चरणाशी वाहीलं आहे. दीन, दुबळी, लाचार भारतमाता!
सुभाषला वाटलं दूर सातासमुद्रापलीकडून भारतमाता आपल्याकडे रोखून पाहते आहे. विचारते आहे-
‘आता तू कशाची निवड करशील सुभाष?
सत्तेची कि संघर्षाची?
आनंदाची कि आंदोलनाची?
वैभवाची कि वणवणीची?
मोहाची कि मातृभूमीची?’
सुभाषने डोळे गच्च मिटून घेतले.
क्रमशः सुभाष बावनी भाग ५ | इंग्लंडला प्रयाण.
ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील.
(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)
लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०