सुभाष बावनी ५० | काळाच्या पडद्याआड

सुभाष बावनी ५० | काळाच्या पडद्याआड

सुभाष बावनी ५० | काळाच्या पडद्याआड –

“स्वतःची सगळी कामं अजूनही स्वतःच करायची असतात. कुणाकुणाची म्हणून मदत घ्यायची नसते. त्रास होतो; पण पडदा सांभाळायचा आहे ना! परवा बाथरूममध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला, म्हणून पाहायला गेले तर घसरून पडले होते. शेवटी मी हात धरुन उठवलं आणि कसंबसं पलंगावर आणून झोपवलं. त्या दिवशी पहिल्यांदा चेहरा पाहिला बाबांचा. खूप वेदना झाल्या असतील हो! त्यात वय! हाड जुळून यायला वेळ लागतो या वयात. मी काय तुम्हाला सांगते म्हणा; तुम्ही स्वतः डॉक्टर आहात.” सरस्वतीदेवी गुमनामी बाबांना तपासायला आलेल्या डॉक्टर बॅनर्जींना सांगत होत्या.

“पण आजकाल काहीतरी बोलत राहतात स्वतःशीच. जसं, ‘माझ्या बाहेर येण्यात कुणाचाच फायदा नाही. कुटुंबाचाही नाही. लोकांचाही नाही. राज्यकर्त्यांचा तर नाहीच आणि देशाचाही नाही. मला अज्ञातवासातच जगलं पाहिजे आणि अज्ञातवासातच मेलं पाहिजे. इथून जेवढं करता येण्यासारखं आहे, तेवढं केलं. पण स्वप्न काही अजून पूर्ण झालं नाही. होईल! एक ना एक दिवस नक्की होईल! अरविंद सांगून गेले आहेत ना? या आत्म्याला मात्र आता पुन्हा जन्म नाही. पुन्हा देह नाही. पण तरी या मातृभूमीसाठी जन्म घ्यावासा वाटतो. तिच्यासाठी झगडावसं वाटतं. शेवटी तिच्याच चरणी संपून जावसं वाटतं’ असं काहीतरी.”

इकडे पडद्याआड मातीच्या कुशीत शिरण्याची तयारी पूर्ण झाली होती. छातीचा भाता जोरात वर खाली होत होता. घरघरही वाढली होती. बाबांच्या ह्या हालचालींकडे तिथे नुकताच पोचलेला मृत्यू मोठ्या आशेनं पाहत होता. झडप घालण्याच्या संधी शोधत बाबांच्या मागोमाग भली मोठी पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानं त्यालाही धाप लागली होती. निदान आपली ही खेप तरी वाया जाणार नाही, या आशेनं तो त्या पडद्यामागे उपस्थित झाला होता. आता कशाला चुकवायचं? जे करायचं होतं ते करून झालं होतं. बाबांनी दयार्द्र दृष्टीने वाट पाहणाऱ्या मृत्यूकडे पाहिलं आणि त्याची वणवण थांबवण्यासाठी हात पसरले. ये मृत्यो! किती काळ असा उर फाटेस्तो धावत राहशील? तुलाही विश्रांतीचा अधिकार आहे. ये असा! आणि चिरविश्रांतीसाठी कृतज्ञतेने मृत्यू बाबांवर झेपावला.

पडद्याआडून खोकल्याची उबळ ऐकू आली, तसे सरस्वतीदेवी आणि डॉक्टर बॅनर्जी दोघेही धावले. खोकलता खोकलता बाबांची शुद्ध हरपली होती. बॅनर्जी गडबडीने ऑक्सीजन सिलेंडर आणायला गेले. तर सरस्वतीदेवींनी डॉक्टर रघुनाथ प्रसाद मिश्रा यांनाही बोलावून आणले. मिश्रा येईपर्यंत बॅनर्जीही हाती ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले होते. पण उशीर झाला होता. दोघाही डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहून अर्थपूर्ण संकेत केला आणि डॉक्टर मिश्रांनी बाबांचे डोळे झाकले.

सरस्वतीदेवी आलटून पालटून बाबाच्या चेहऱ्याकडे आणि त्या मधल्या पडद्याकडे पाहत होत्या. बाबाच्या प्रत्यक्ष चेहऱ्यापेक्षाही त्या पडद्यासोबत अधिक जिव्हाळा होता, अधिक आठवणी होत्या त्यांच्या. तो पडदा, त्यामागचा तो आवाज हेच त्या दोघा मायलेकांचं विश्व बनलं होतं. ‘आपल्या बापाला दिलेलं वचन आपण शेवटपर्यंत निभावलं.’ सरस्वतीदेवींच्या नकळत अश्रूंचा एक थेंब डोळ्यातून ओघळला.

सरस्वतीदेवींनी आपल्या मुलाला, राजकुमारला सांगून रवींद्रनाथ शुक्ला, डॉक्टर राय, पांडा रामकिशोर मिश्रा यांना बोलावून आणले. ‘आता काय करायचे?’

गावकऱ्यांना कसे कळले कुणास ठाऊक! पण दोन तासात रामभवनासमोर गर्दी होऊ लागली. “आम्हालाही बाबांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे!” बाहेरून आवाज येऊ लागला. गुमनामी बाबांचा निष्प्राण देह तिरंग्यात गुंडाळला गेला.

“रामकिशोरजी, तुम्ही गुप्तार घाटावर तयारी करून ठेवा. मी गर्दीला पांगवण्यासाठी गाडी जरा अयोध्येच्या रस्त्यावर फिरवून आणतो.”

“बरं!”

“पण सगळं तयार ठेवा बरं का? आम्ही तासाभरात पोहोचतो. तिथे आल्यावर थांबायचं काम पडता कामा नये.”

“हो, ठेवतो.”

“दुःख होतेच; पण त्याआधी सर्वांच्या मनावर ताण होता. कुठेही वाच्यता न होता सगळं नीट व्हायला पाहिजे. इतमामानं व्हायला पाहिजे.”

गुप्तार घाट! शरयू नदीच्या काठावरचं पवित्र ठिकाण! जिथून रामानं शरयूत आपला देह अर्पण केला, ती जागा!

गाडी पोहोचेपर्यंत चिता तयार होती. घाईघाईने त्यावर देह ठेवून अग्नि दिला गेला. अग्निच्या ज्वाला आकाशाशी सलगी करू लागल्या. ताण थोडा निवळला. आता तणावाची जागा दुःखाने घेतली. पांडा राम किशोर मिश्रानं आजूबाजूला असलेल्या लोकांवर नजर फिरवली.

मातृभूमीच्या सुखासाठी संसार, संपत्ती, सत्कार या सगळ्याला लाथाडून ज्यानं विजनवास, विपन्नता आणि वणवण याची निवड केली, त्या अलौकिक व्यक्तिमत्वाला शेवटचा निरोप देण्यासाठी किती लोक आहेत? फक्त तेरा? पांडा कळवळून म्हणाला,

“ज्या माणसाच्या अंत्यसंस्कारासाठी तेरा लाख लोक असायला हवे होते, तिथे आपण फक्त तेरा जण आहोत. ज्या माणसामुळे आपण भारतीय लोक स्वतंत्र झालो, त्याच्या मृत्यूवर रडायची संधीही देशवासियांना मिळू नये? काय दुर्दैवाची गोष्ट आहे!”

असं म्हणून पांडा ढसाढसा रडू लागला. डॉक्टर रघुनाथ प्रसाद मिश्रा आणि बॅनर्जींनाही अश्रू आवरता आले नाहीत.

परत आल्यावर सर्व जण स्तब्ध होऊन फैजबादमधील रामभवनातल्या त्या रहस्यमयी पडद्याकडे पाहात होते. सरकवावा की नाही? बाबाच आता कायमचे पडद्याआड निघून गेल्यावर काय हरकत आहे? पडदा सरकवला गेला. बाबांचं त्या छोट्याशा जागेतलं विश्व सगळ्यांच्या नजरेस पडलं. ट्रंकाच ट्रंका! किती? पन्नास एक तरी असाव्यात.

एक एक ट्रंक उघडली जाऊ लागली. कशात रुद्राक्षाच्या माळा, कशात औषधं, कुठे ट्रांसिस्टर तर कुठे कपडे!

रीडर्स डायजेस्ट, राष्ट्रधर्म, ज्योतिष मार्तंड अशा मासिकांसह इंग्रजी, हिंदी, बंगाली भाषेतली हजारो पुस्तकं! सिगारेटची पाकिटं!

बोस कुटुंबियांचे, जानकिनाथ-प्रभावतीदेवीचे फोटो, महात्मा गांधींचे फोटो!

चष्मा, रोलेक्स घड्याळ, क्रोनोमीटर, सुरेशचंद्र बोस यांना खोसला कमिशनने पाठवलेल्या समन्सची मूळ प्रत!

बाबांना आलेली असंख्य पत्रे! ज्यात लीला रॉय, पवित्र मोहन रॉय यांच्या सोबतच त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची पत्रे! याशिवाय बाबांनी स्वतः लिहिलेली परंतु न पाठवलेली काही पत्रे!

या सर्व वस्तूंची, पत्रांची, पाठवणाऱ्यांची आणि मुख्य म्हणजे बाबांच्या हस्ताक्षराची चिरफाड होणार होती. त्यातून चौकशी करणारे एक धक्कादायक सत्य शोधून काढणार होते आणि सत्तेच्या आवाजाने सत्त्याचा आवाज दडपला जाणार होता. थोडक्यात काय; तर मृत्यूनंतरही अवहेलना थांबणार नव्हती. पण ज्यानं जिवंतपणी आपल्याच लोकांनी केलेली अवहेलना सहन केली, त्याला या मृत्युनंतरच्या अवहेलनेनं फरक पडणार नव्हता. फरक पडणं किंवा न पडणं या द्वंद्वातून तो आता खराखुरा पलीकडे निघून गेला होता.

क्रमशः सुभाष बावनी ५० | काळाच्या पडद्याआड.

ग्रंथ सूची:
१) Conundrum: Subhash Bose’s life after death- Anuj Dhar

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment