सुभाष बावनी ५१ | चौकशी समित्यांचा फार्स

सुभाष बावनी ५१ | चौकशी समित्यांचा फार्स

सुभाष बावनी ५१ | चौकशी समित्यांचा फार्स –

“इतक्या जर विमान अपघातात विसंगती होत्या; डेथ सर्टिफिकेटमध्ये घोटाळा होता; स्मशानातल्या रजिस्टरमध्ये वेगळं नाव होतं; गुमनामी बाबांच्या हस्ताक्षरातली इतकी पत्रं सापडली म्हणतोस, मग चौकशी समितीला याच्यावरून काहीच धागादोरा लागला नाही?” आशिषनं चेतनला विचारलं

“धागादोरा लागायला त्या उद्देशाने चौकशी तर केली जायला हवी ना?” चेतन उद्वेगानं हसत म्हणाला.

“म्हणजे?”

“म्हणजे असं बघ; सगळ्यात पहिली चौकशी समिती १९५६ मध्ये स्थापन झाली- शहनवाज समिती! शहनवाज म्हणजे तेच ‘लाल किले से आई आवाज, प्रेम धिल्लन और शहनवाज’ या घोषणेतले आझाद हिंद फौजेतले अधिकारी शाहनवाज खान! त्यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय समिती स्थापन केली गेली. त्यांच्याबरोबर होते एस एन मित्रा आणि नेताजींचे वडील बंधू सुरेशचंद्र बोस. शाहनवाज खान हे त्यावेळी नेहरू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.” डोळे मिचकावत चेतन म्हणाला.

“शहनवाजांनी खूप स्पष्ट शब्दात चौकशी समितीची लक्ष्मणरेषा आखून दिली होती- ‘नेताजींचा मृत्यू विमान अपघातात ज्या परिस्थितीत झाला, त्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या पुराव्यांचा आणि साक्षीदारांचा शोध घेणे!’”

“अरे म्हणजे विमान अपघातातच मृत्यू झाला हे गृहीत धरूनच की?” आशिष

“हो अरे! ही समिती तायवानला प्रत्यक्ष घटनास्थळी गेलीच नाही. त्यांच्या निष्कर्षापेक्षा वेगळं मत एखाद्या साक्षीदारांनं मांडलं, तर ‘तुम्हाला नक्की आठवत आहे का?’, ‘आता या घटनेला बरीच वर्ष होऊन गेलीत’, ‘पुन्हा एकदा आठवून पहा’ अशा सूचना करायचे; आणि विमान अपघातावर शिक्कामोर्तब करणाऱ्या साक्षीदारांच्या परस्पर विरोधी विधानांकडेही दुर्लक्ष करायचे.”

“पण मग सुरेशबाबूही?”

“विमान अपघातातील मृत्यूवर शिक्कामोर्तब करणाऱ्या शहानवाज समितीच्या रिपोर्टवर स्वाक्षरी न करणारे सुरेशबाबू एकमेव होते. त्यांनी स्वतःचा वेगळा रिपोर्ट सादर केला, पण शहानवाज यांच्या निष्कर्षावर स्वाक्षरी करायला ठाम नकार दिला.

“त्यांना, त्यांच्या कुटुंबाला स्वाक्षरी करावी म्हणून वेगवेगळी आमिषं दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या पुतण्याला-द्विजेंद्रला बिझनेसमध्ये सेटल करून द्यायचं आश्वासन दिलं होतं बंगालचे मुख्यमंत्री डॉक्टर बी सी रॉय यांनी. फक्त त्या बदल्यात सुरेशबाबूंची स्वाक्षरी आणायची. द्विजेंद्र बधला नाही. हा डाव वाया गेला. मग दुसरा डाव टाकला गेला. सुरेशबाबूंना राज्यपाल करू म्हणे बंगालचा.”

“मग?”

“प्रत्येक माणूस थोडीच पैशाने विकत घेता येतो? सुरेश बाबूंनी स्वाक्षरी नाही केली म्हणजे नाही केली.

“मग सत्तरच्या दशकात आणखी एक समिती आणली- खोसला समिती. पंजाब हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती जस्टीस जी डी खोसला यांच्या नेतृत्वाखालील एकसदस्यीय समिती! म्हणजे बाकीच्या सदस्यांची खुशामत करायची गरजच नाही.

“या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात २६ खासदारांनी स्वाक्षरी करून ‘या समितीला तायवानला घटनास्थळी जाण्याची परवानगी देण्यात यावी’ अशी लेखी विनंती सरकारकडे केली. खोसला साहेबांचं विमान तायवानला उतरलं. पण सरकारने चौकशी करण्यासंदर्भात योग्य ती परवानगी तायवान सरकारकडून घेतलीच नव्हती. शेवटी खोसला यांच्या मागोमाग तेथे पोहोचलेल्या समर गुहा यांनी अर्ज विनंत्या करून ती परवानगी मिळवली. आनंदात समर गुहा परत आले, तर इकडे खोसला महाशय हॉटेलमधून बाहेर पडायलाच तयार नाहीत. कसेबसे बाहेर येऊन गाडीत बसले, तर ताईहोकू विमानतळावर पोहोचल्यावर स्वारी गाडीतून बाहेरच येईना. समर गुहा सांगताहेत- ‘बघा अपघाताचे फोटो आणि घटनास्थळाची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे’ तेव्हा रागारागाने ‘मला त्या फोटोशी काहीही देणं घेणं नाही. आपल्याला उद्याच्या उद्या इथून परत गेले पाहिजे!’ असं म्हणून उरलेल्या दिवसभरात इंदिराजींसाठी शॉपिंग करून खोसला भारतात परतले. मग आता मला सांग या चौकशी समितीचा निष्कर्ष काय असेल?”

“नेताजींचा विमान अपघातात मृत्यू!” आशिष म्हणाला.

“बरोब्बर! पुढे आणीबाणी आली. त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं. त्या सरकारचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी खोसला समितीचा हा रिपोर्ट सपशेल नाकारला.

“या सगळ्या पूर्वग्रहदूषित संशोधनाला ढळढळीत अपवाद म्हणजे अटलजींच्या काळात स्थापन झालेली मुखर्जी समिती. जस्टीस मनोज कुमार मुखर्जी, मुंबई आणि अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टिस आणि सुप्रीम कोर्टाचे जज राहिल्यावर निवृत्त झाले होते.

“मनोज कुमार मुखर्जी यांनी तायवान, रशिया, जपान वगैरे देशात दौरे केले. विमान अपघातातली विसंगती लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या निष्कर्षात निःसंदिग्धपणे ‘नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालेला नाही. जपानने त्यांना भूमिगत व्हायला मदत केली’ असेच नमूद केले.

“मधल्या काळात आलोकेश बागची, अशोक टंडन, शक्ती सिंग हे लोक ‘गुमनामी बाबा’ हा विषय घेऊन मुखर्जींपर्यंत पोहोचले, तेव्हा मुखर्जींनी फैजाबादच्या रामभवनालाही भेट दिली. बाबांचे हस्ताक्षर नेताजींच्या हस्ताक्षराची जुळते किंवा कसे, हे तपासण्यासाठी दोघांच्याही हस्ताक्षराचे इंग्रजी आणि बंगाली तजुर्मे शासकीय तसेच खाजगी हस्ताक्षरतज्ञाला दिले गेले. शासकीय हस्ताक्षरतज्ञांचा अहवाल ‘जुळत नाहीत’ असा आला; तर ख्यातनाम हस्ताक्षर तज्ञ बी लाल यांनी अहवाल नोंदवला- ‘या व्यक्तीने म्हणजे गुमनामी बाबाने आपली ओळख लपवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आहेत. ठरवून वेगळं हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न केला आहे; पण माणसाच्या काही लकबी-सवयी अशा असतात, की प्रयत्न करूनही तो त्या बदलू शकत नाही. ही सर्व पत्रं लिहिणारी व्यक्ती एकच आहे!’”

“अरे वा!”

“पण त्याचा उपयोग झाला नाही.”

“का?”

“वाजपेयींचे सरकार पडल्यानंतर आलेल्या नवीन सरकारने मुखर्जी समितीचा संपूर्ण रिपोर्ट नाकारला.”

“अरे पण याला काय अर्थ आहे?”

“सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ना!”

“पण मग सत्य कधीच बाहेर येणार नाही?”

“येईल! तुकारामांची गाथा मंबाजींनी पाण्यात बुडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती बुडते थोडीच?”

“पण केव्हा? आपण मेल्यावर?”

“ज्याच्यासाठी हा सगळं खटाटोप करायचा, तो तर केव्हाच निघून गेलाय. तुझ्या माझ्या असण्या नसण्यानं काय फरक पडतो?

जो नेताजींच्या पराक्रमाचा साक्षीदार होता; ज्याने विमान अपघाताची नाटिका पहिली; ज्याने जिवंतपणी मृत्यू भोगणारे गुमनामी बाबा पाहिले तो काळ मात्र हे सत्य समोर आलेलं एक ना एक दिवस नक्की पाहील, याची मला खात्री आहे.

चेतन निश्चिंत होता. आशिषला मात्र या सगळ्या चौकशीच्या नाटकाचा भयंकर संताप येत होता. खरंच अशी एखादी निष्पक्ष चौकशी समिती स्थापन होऊन सत्य बाहेर काढेल, की हे रहस्य असंच जुन्या पिढीतील नेताजीप्रेमी पुढच्या पिढीला हस्तांतरित करत राहतील, या विचारानं आशिषला मात्र नैराश्य आलं होतं.

(फोटो- गुमनामी बाबांच्या ट्रंकेत सापडलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे पत्र)

क्रमशः सुभाष बावनी ५१ | चौकशी समित्यांचा फार्स.

ग्रंथ सूची –
१)      Conundrum: Subhash Bose’s life after death- Anuj Dhar
२)      Back from Dead- अनुज धर
३)      नेताजी रहस्य गाथा- अनुज धर

© अंबरीश पुंडलिक

Leave a comment