सुभाष बावनी ५२ | उपसंहार

सुभाष बावनी ५२ | उपसंहार

सुभाष बावनी ५२ | उपसंहार –

“पण एवढे कष्ट करूनही नेताजींच्या नशिबी अपयशच आलं नाही का रे?” आशिष कळवळून बोलला.

“ते कसं काय?”

“अरे असं काय करतोस? आझाद हिंद सेना पराभूत नाही का झाली?”

“आझाद हिंद सेनेच्या पराभवाचा आणि नेताजीच्या यशापयशाचा काहीही संबंध नाही.”

“म्हणजे?”

“नेताजींनी आणि सावरकरांनी योजलेलं युद्ध रणांगणातलं नव्हतंच मुळी!”

“मग?”

“सावरकरांनी केलेले आवाहन आठव- ‘सरकार देतंय त्या बंदुका आधी हातात तर घ्या; त्यांची टोकं वेळ आल्यावर कुठे वळवायची ते ठरवता येईल.’

“या आवाहनाचं इम्प्लीमेंटेशन म्हणजे आझाद हिंद सेना! युद्धकाळात ब्रिटिशांची फौज किती होती माहिती आहे?”

“किती”

“पस्तीस लाख! आणि त्यातले भारतीय किती?”

“किती?”

“पंचवीस लाख!”

“काय सांगतोस?”

“आता या पस्तीस लाखाच्या सेनेसमोर आपल्या पन्नास हजाराच्या सेनेचा टिकाव लागणार नाही, हे काय नेताजींना समजत नसेल? पंचवीस लाख भारतीय सैनिकांच्या मनाशी केलेलं युद्ध आहे हे! त्यांच्या मनातल्या ब्रिटिशांच्या मिठाला जागण्याच्या कल्पनेला दिलेले धक्के म्हणजे आझाद हिंद सेनेचं युद्ध! ऐन वेळी बंदुकांची टोकं ब्रिटिशांकडे कशी वळवली जाऊ शकतात, याची चुणूक म्हणजे आझाद हिंद सेनेचं युद्ध! लाल किल्ल्यावरच्या खटल्यानंतर मुंबई, मद्रास, जबलपुरमध्ये जे बंड उभे राहीलं, ते या युद्धातील विजयाचा पुरावा आहे.

“काही युद्ध मैदानात जिंकून टेबलावर हरली जातात, तर काही युद्ध मैदानात पराभूत होऊनसुद्धा परिणामांमध्ये जिंकली जातात. आझाद हिंद सेनेचं युद्ध हे दुसऱ्या प्रकारचं!

“या बंडानंतर सैन्यात पंचवीस लाख असलेली भारतीय सैनिकांची संख्या, ही नंतर तीन-साडे तीन लाखावर आणली गेली. म्हणजे केवढा प्रचंड धसका ब्रिटिशांनी या सैनिकांचा घेतला होता याचा विचार कर. ही फक्त कल्पना किंवा अनुमान नाही; तर तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांनी हे मान्य केलंय.”

“केव्हा? कुठे?”

“१९५६ साली. जेव्हा ऍटली भारतात आले, तेव्हा बंगालचे तत्कालीन गव्हर्नर जस्टीस पी बी चक्रवर्ती यांना दिलेल्या उत्तरात ते म्हणाले- “वी लेफ्ट जस्ट बिकॉज ऑफ इंडियन नॅशनल आर्मी!”

“माय गॉड! हे खरं आहे?”-आशिष

“अक्षरशः!”

मग तर देशाच्या पंतप्रधानपदावर खरा अधिकार नेताजींचा होता चेतन!”

“प्रश्न पंतप्रधानपदाचा नाही आशिष. प्रश्न आहे योगदान मान्य करण्याचा. पन्नास हजारांपैकी पंचवीस हजार सैनिक या युद्धात मारले गेले आणि तुम्ही म्हणता ‘आम्ही रक्ताचा थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळवलं?’ मग ब्रह्मपुत्रेच्या तीरावर सांडलेलं रक्त कुणाचं? स्वातंत्र्यप्राप्तीत सर्वांचंच योगदान आहे रे! अगदी सावरकर म्हणतात त्याप्रमाणे घरातल्या देवासमोर बसून ज्यांनी स्वातंत्र्याची हात जोडून कामना केली त्यांचाही; पण या ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर शेवटचा खेळा जर कोणी ठोकला असेल, तर तो निर्विवादपणे नेताजींनी!

“१८५७ च्या युद्धातले तात्या टोपे जर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे पहिले सेनापती असतील, तर नेताजी सुभाष हे या संग्रामाचे अखेरचे आणि विजयी सेनापती आहेत; आणि या बदल्यात त्यांना काय मिळालं? शिव्या? ‘हुकूमशहा’, ‘टोजोचा कुत्रा’ सारखी दूषणं? बायकापोरांची अन्नान्न दशा? ना कुठलं भारतरत्न, ना पद्मविभूषण!

“अरे त्या लेगीमध्ये प्रेम सेहेगलच्या नेतृत्वात पराक्रम करणाऱ्या सैनिकांसमोर पदकांची रास, प्रमोशन्स जाऊ दे- त्यांना स्वतंत्र भारताच्या लष्करात नोकरीसुद्धा मिळाली नाही रे आशिष!

“आमच्या सुखासाठी पत्नी एमिलीची, चिमुकल्या अनिताची यत्किंचितही पर्वा न करता निखाऱ्यांवरूनच सदैव चालत गेलेल्या नेताजींनी अखेरचा श्वास कुठे घेतला हेही माहीत करून घेण्याचे कष्ट स्वतंत्र भारताने घेऊ नये?” गहिवरून आलेल्या चेतनला पुढे बोलता आलं नाही.

काही क्षण शांतता पसरली आणि एकाएकी आशिष उठून उभा राहिला. नेताजींच्या अश्‍वारूढ पुतळ्यासमोर उभा राहून, हात उंचावून सावरकरांचे शब्द उसने घेत उद्गारला,

“अहो नेताजी! अहो देशगौरव! पंतप्रधान! अर्जी हुकूमत ए आजाद हिंद!

“सांगा ना? तुम्ही शेवटचा श्वास केव्हा घेतला? अठरा ऑगस्टच्या विमान अपघातानंतर तुम्ही जीवंत तर नव्हता ना? या देशाने तुमचा कसा कसा अपमान केला हे तुम्ही पाहिले तर नाही ना? का बोलत नाहीत? आपल्या देशबांधवांच्या या नीचपणामुळे रागावून तुम्ही आमच्याशी अबोला तर नाही ना धरला?

“या नतद्रष्ट, अहसान फरामोश लोकांसाठी तुम्ही का लढलात नेताजी? का? आज आम्ही तुमच्यासाठी जो विलाप करतो आहोत, तो तुमच्यापर्यंत पोहोचत तरी आहे का?

“अपराधभावाने केलेल्या या विलापासाठी आपण आपल्या सोन्यासारख्या आयुष्याची कर्पूरआरती करावी? कसला महाग हा सौदा!

“आम्हाला माफ करा नेताजी! आम्हाला माफ करा!”

चौथऱ्यावर डोकं ठेवून हुंदके देत आशिष रडु लागला. चेतनची अवस्थाही आशिषचं सांत्वन करण्यासारखी नव्हती. तो फक्त डबडबलेल्या डोळ्यांनी नेताजींच्या पुतळ्याकडे पहात निश्चल उभा होता.

नेताजींचा धुळीने माखलेला पुतळा निदान त्यांच्या जयंती दिनी तरी कुणी पाहू नये, यासाठी सूर्य घाईघाईने अस्ताला निघाला होता. नेताजींच्या सर्वसंगपरित्यागाशी नातं सांगणारा संन्यस्त रंग जाता जाता सूर्याने आकाशात पिस्कारून दिला. वारा सुटला! त्या वाऱ्याने झाडाची वाळलेली काही पानं नेताजींवर जणू अभिवादन म्हणून उधळली गेली. सर्वत्र शांतता होती. आशिषचे हुंदके त्या शांततेचा भंग करत होते.

समाप्त.

ग्रंथ सूची-
१) Bose- an Indian Samurai- Maj. Gen. G. D. Bakshi

©अंबरीश पुंडलिक

Leave a comment