सुभाष बावनी भाग ६ | आयसीएसचा त्याग

सुभाष बावनी भाग ६ | आयसीएसचा त्याग

सुभाष बावनी भाग ६ | आयसीएसचा त्याग –

सुभाष बावनी भाग ६ –

“हा फोटो बघ माँ! ही दत्तबाबूंची मुलगी. सुंदर आहे ना? आपल्या छोटेदादांसाठी मला अशीच मुलगी हवी होती.” विभाने एक फोटो प्रभावतीदेवींच्या समोर टाकला.

“त्यापेक्षा ही बघ माँ. बॅरिस्टर चटोपाध्याय यांची एकुलती एक मुलगी. चित्र काढते, शिवाय द्विजेंद्रलालांची भजनं तर अशी सुरेल म्हणते!” शरदने आणखी एक फोटो दाखवला. आनंदाने दोन्ही फोटो आलटून-पालटून पहात माँ म्हणाल्या,

“ते तुम्ही दोघं काय ते ठरवा. मात्र माझ्या विभापेक्षा कणभरही कमी गोरी मुलगी मी खपवून घेणार नाही हो; सांगून ठेवते”

सुभाषच्या आयसीएस उत्तीर्ण झाल्याच्या बातम्या कळल्यापासून बोस कुटुंबात आनंदाला उधाण आले होते. पुष्पगुच्छांचा, मिठाईच्या डब्यांचा, पत्रांचा नुसता ढीग पडला होता. त्यातही पुन्हा अभिनंदनाची पत्रे वेगळी आणि उपवर मुलींच्या फोटोसहित आलेली पत्रे वेगळी. प्रभावती देवी समाधानाने भरून पावल्या होत्या. आपल्या तिन्ही लोकी झेंडा गाडणाऱ्या पुत्राचा त्यांना सार्थ अभिमान वाटत होता. जानकीबाबूही आरामखुर्चीत बसत म्हणाले,

“आता मी रिटायर्ड होणार. घराचा कारभार यापुढे तुम्ही मुलांनी बघायचा!”

“मग बाबा आता तुम्ही दोघांनी इथे कलकत्त्याला राहायला यायचं, आमच्यासोबत!” शरदबाबू बोलले.

“आता घरातले कर्तेसवरते लोक तुम्ही. तुम्ही सांगाल तसे करीन बापडा!”

सगळेजण हास्यकल्लोळात बुडून गेले. तेवढ्यात पोस्टमनने एक जाडजूड पाकीट आणून दिलं.

शरदने उत्सुकतेने पाकीट उघडले आणि मोठ्याने वाचू लागला,

“प्रिय मेजदा!

“तुमची अभिनंदनपर तार पोहोचली. खूप आनंद झाला; पण खरेच सांगतो; आयसीएस होऊन आपण फार मोठे असे काही साध्य केले, अशी माझी स्वतःची मुळीच भावना नाही. तुम्हाला माहित आहे की मनात नसतानाही मला या परीक्षेला बसावे लागले. त्यात उत्तीर्ण झालो असल्यामुळे मी तुम्हा सर्वांच्या आनंदासाठी जर सरकारची चाकरी करायचे ठरवले, तर मला माझे मन सतत मारावे लागणार आहे. या नोकरीमुळे आयुष्यभर पैशांची ददात राहणार नाही, याची मला कल्पना आहे; पण या सुरक्षिततेसाठी अंतरात्म्याचा विक्रय करावा लागत नाही का?  सरकारी नोकरी करावी की नाही हे जर माझ्यावर सोपवण्यात आले तर मी आयसीएसमध्ये कधीही जाणार नाही. घरातल्या इतरांची समजूत काढणे कठीण आहे, निदान तुम्ही तरी माझी मनोभूमिका समजून घ्याल अशी आशा आहे.

-सुभाष”

माँच्या हातून फोटो गळून पडले. बाबा तावातावाने उभे राहत हातवारे करत म्हणाले,

“अरे शरद त्याला समजाव. आत्मघात ठरेल रे हा!” क्षणापूर्वी आनंद देणारा पुष्पगुच्छांचा सुवास आता त्रासदायक वाटू लागला. मिठाईची चवच गेली. पत्रांच्या गठ्ठ्यांची अडचण वाटू लागली.

शरदने घाईघाईने सुभाषला लिहिले,

“तुझे आता काय होणार, या चिंतेने बाबा अगदी बेचैन होऊन गेले आहेत. त्यांना निद्रानाशाचा विकार जडला आहे. या जगात माझे फार दिवस राहिले नाहीत, असे येणाऱ्या जाणाऱ्यांना ते सांगतात. आपल्या निर्णयामुळे आपल्या वडिलांचे आयुष्यच तू कमी करतो आहेस.

-शरद”

पाठोपाठ जानकीनाथांचेही पत्र येऊन थडकले.

“त्यागाच्या गोष्टी बोलणे फार सोपे असते, पण लक्षात ठेव आपल्यासारख्या बेताचे उत्पन्न असलेल्या कुटुंबाला भलता त्याग परवडणार नाही. आपले कुटुंब मोठे आहे. तुझ्या काही भावंडांचे शिक्षण अजून पूर्ण व्हायचे आहे. धाकट्या बहिणींची लग्न व्हायची आहेत. घराची जबाबदारी काही प्रमाणात तुझ्यावरही आहे, हे विसरू नकोस.”

या दोन्हीही पत्रांनी सुभाषच्या मनात खळबळ उडवून दिली. ‘माय कि मातृभूमी’ हा चिरपुरातन झगडा पुन्हा नव्यानं सुरू झाला.

‘बाबांचं म्हणणं खरं आहे, पण मी काही त्यांचा एकुलता एक मुलगा नाही. सतीश दादा आहेत, शरद दादा आहेत, सुरेशदा, सुधीरदा, सुनीलदा आहेत. सगळेजण घरासाठी तर मग देशासाठी कोण?’

झटक्यात डोळे पुसून सुभाष निर्धाराने म्हणाला ‘ते काही नाही. मी आयसीएसचा राजीनामा देणार!’

सुभाषने उपभारत मंत्री लॉर्ड लिटन यांनाच पत्र लिहून कळवले,

“I cannot work under an alien bureaucracy & so am resigning from the ICS.”

एकच गडबड उडाली. धावपळ सुरू झाली. इंडिया ऑफिसमधले फोन घणाणू लागले.

स्वतः लॉर्ड लिटननी सुभाषला बोलावून घेतलं,

“मिस्टर बोस तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? पुन्हा एकदा विचार करा.”

“मी पूर्ण विचार केला आहे. मला नाही वाटत मी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहून माझ्या मातृभूमीची सेवा करू शकेल”

त्याच दिवशी आणखी एक पत्र सुभाषने देशबंधू चित्तरंजन दास यांना लिहिलं-

“मी सुभाष बोस! मी नुकतीच आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. पण मला परक्या राजवटीची चाकरी करायची नाही.  थोडसं शिक्षण, मर्यादित बुद्धी, किरकोळ शरीरप्रकृती आणि अमाप उत्साह याव्यतिरिक्त मातृभूमीच्या चरणी समर्पित करायला माझ्याजवळ अन्य काहीही नाही. देशबंधू, मी सिद्ध आहे. आपली आज्ञा यायचाच काय तो अवकाश आहे”

सुभाष आपला राजीनामा परत घेईल, याची अजूनही कुटुंबियांना आशा वाटत होती; पण या सगळ्या वाद-प्रतिवादावर निर्णायकपणे पडदा टाकणारे चित्तरंजन दास यांचे पत्र आले आणि बोस कुटुंबाची शेवटची आशाही मावळली-

“इथे कामाचे अक्षरश: डोंगर पडले आहेत सुभाष. तुझ्या तरुण हातांची आणि उत्साहाची इथे खूप निकड आहे. लवकर ये.”

सुभाषला दासबाबूंच्या पत्राने स्वर्ग दोन बोटे उरला. परतीच्या प्रवासासाठी सुभाष बोटीवर चढला. आपल्याकडे रागवून पाहणाऱ्या मातृभूमीला तो ओरडून सांगत होता-

आई मी निवड केली आहे-

मला आनंद नको आंदोलन हवे!

सत्ता नको संघर्ष हवा!

वैभव नको वणवण हवी!

मोह नको मातृभूमी हवी!

प्रभावती देवींना त्रिखंडावर सत्ता गाजवणारा पुत्र हवा होता, पण पोटी सप्तसमुद्र गदगदा हलवून सोडणारा पुत्र निपजला होता.

क्रमशः सुभाष बावनी भाग ६ | आयसीएसचा त्याग.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२० 

Leave a comment