सुभाष बावनी भाग ७ | असहकार आंदोलन –
सुभाष बावनी भाग ७ –
“या लवलवत्या अग्निज्वालेला साक्षी ठेवून मी शपथ घेतो कि ब्रिटिशांचे साम्राज्य जनक्षोभाच्या या दावानलात भस्मसात केल्याशिवाय मी शांत बसणार नाही!”(असहकार आंदोलन)
१३ ऑगस्ट १९२१ या दिवशी हजारी पार्क मैदानात झालेल्या परदेशी कपड्यांच्या होळी समोर सुभाषने घनगंभीर शपथ घेतली. लोकमान्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित ही होळी जणू त्यांना अभिवादनच देत होती.
सुभाष भारतात आल्या आल्या देशबंधूंनी त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. सुभाषने देशबंधूंनी सुरू केलेल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्यपद स्वीकारले. अध्यापन हे सुभाषचे आवडते काम! त्याच बरोबर बंगाल प्रांतिक काँग्रेसचा प्रचार विभाग त्याला दासबाबूंच्या आग्रहाखातर घ्यावा लागला. अध्यापन, भित्तीपत्रके, भाषणे आणि दासबाबूंच्या बरोबरीने पायाला भिंगरी लावून केलेले दौरे यांच्या निमित्ताने सुभाष दिवस दिवस घराबाहेर राहू लागला. त्याचा हा झपाटा पाहून स्टेट्समनने लिहीले देखील- “सुभाषचंद्र बोस यांच्या रुपाने काँग्रेसला एक तडफदार कार्यकर्ता लाभला आहे, तर सरकारने तेवढाच कर्तबगार अधिकारी गमावला आहे”
“पण बाबूजी तुम्ही सुभाषवर नको तेवढा विश्वास टाकत आहात!” कुणीतरी चित्तरंजन दासांजवळ नाराजी व्यक्त केली.
“मला इतक्या वर्षांच्या जनसंपर्कानंतर निदान माणसांची पारख तरी चांगली जमायला लागली आहे. सुभाष माझा अपेक्षाभंग करणार नाही. तो याहूनही मोठी जबाबदारी लीलया पेलेल, त्यासाठी त्याला तयार केला पाहिजे.”
‘परदेशी कपड्यांची होळी झाली, आता पुढे काय?’ दासबाबूंच्या घरी चर्चा रंगली होती. गांधीजींनी असहकाराची हाक दिली त्याला एक वर्ष होत आलं. सामान्य जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद या आंदोलनाला लाभला. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी सरकारी शाळा कॉलेजात जायचे नाही; शेतकऱ्यांनी सरकारला कर द्यायचा नाही; कामगारांनी सरकारकडे काम करायचं नाही, की फिर्यादींनी सरकारकडे न्याय मागण्यासाठी फिरकायचं नाही.
“हे इथेच थांबता कामा नये, दिवसेंदिवस सरकारला जास्तीत जास्त कासावीस करण्यासाठी काहीतरी अजून मोठं घडायला पाहिजे.” चित्तरंजन दास आपल्या तरुण सहकाऱ्यांकडे आलटून पालटून पाहत म्हणाले.
“जालियनवाला बाग हत्याकांडापासून चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी युवराज भारत दौर्यावर येणार आहेत. ते ज्या दिवशी गेटवे ऑफ इंडियामध्ये पाऊल ठेवतील, त्या दिवशीपासून हरताळ सुरू करायचा. तो यशस्वी झाला तर जनता आपल्या बाजूनं आहे. त्यानंतर निदर्शनं करायचे.”
स्वयंसेवकदलाचा प्रमुख सुभाष असल्याने निदर्शनासाठी इच्छुक स्वयंसेवकांची यादी करणे, त्यांचे गट पाडणे, काय करायचे आहे आणि काय करायचे नाही, हे त्या गटांना समजून सांगणे ही कामं सुभाषकडे आली.
हळूहळू निदर्शकांच्या तुकड्या बाहेर पडू लागल्या. खादीचे कपडे हातगाडीवरून विकले जाऊ लागले. पण भटकायचे, विक्री करायची आणि परत यायचे. पोलीस हटकतही नव्हते, अटक करण्यात दूरची गोष्ट!
“यातूनही मार्ग निघेल!” आत्मविश्वासाने दासबाबू म्हणाले.
यानंतर दासबाबूंचा मुलगा चिररंजन बाहेर पडला. त्याला मात्र पोलिसांनी पकडले. पण तरीही आंदोलन मूळ पकडेनासे झाले. फसते की काय?
दासबाबूंनी आता आपल्या पत्नीला-बासंतीदेवी यांना, बहिण उर्मिलादेवी, मुलगी प्राजक्ता यांना पाठवायचे ठरवले, तो बैठकीत एकच गदारोळ उठला. सुभाष ओरडला,
“दासबाबू हे काय करता आहात तुम्ही? आम्ही पुरुषांनी घरी बसून राहायचे आणि आमच्या आया-बहिणींनी पोलिसांच्या लाठ्या खायच्या?”
पण दासबाबूंनी हा फासा अगदी बरोबर टाकला होता. बासंतीदेवी, उर्मिलादेवी यांना अटक होताच कलकत्त्यात संतापाची लाट उसळली. दासबाबूंच्या घरातील स्त्रियांना पोलिस ठाण्यात पाहताच तेथील शिपाई नोकरी सोडून आंदोलनात उतरण्याची भाषा करू लागले. आंदोलनात निदर्शने करण्यासाठी सुभाषबाबूंकडे इच्छुक स्वयंसेवकांची रांग लागली. त्यात विद्यार्थी होते, कामगार होते, स्त्रिया होत्या, पुरुष होते, बाल होते, वृद्ध होते, हिंदू होते, मुसलमान होते. अवघ्या वंग आसमंतात चित्तरंजन दास नावाचे आवर्त उठले. पोलिसांना लोकांना पांगवायला लाठीचार्ज करावा लागला.
दासबाबूंना अटक झाली. त्यांना पोलिस घेऊन जात असताना सुभाष त्यांच्याकडे खूप अपेक्षेनं पाहत होता.
“एवढी दासबाबूंना अटक झाली पण पोलिसांनी माझ्याकडे वळूनही पाहिले नाही.” सुभाष हळहळत बोलला. शेवटी एकदाचं पकडलं सुभाषला.
सुभाष, हेमंता, किरण शंकर हे उत्साहाने दासबाबूंच्या भोवती जमले. गव्हर्नर ऑफिसमधला फोन रात्री अपरात्री घणाणू लागला- “युवराज कलकत्त्यात यायच्या आधी तिथली परिस्थिती आटोक्यात आणा!”
युवराज यायच्या आधी वातावरण ठीकठाक करण्यासाठी स्वतः रीडींगसाहेब मदन मोहन मालवीय यांना घेऊन कलकत्त्यात उतरले. पंडितजींच्या मध्यस्थीने त्यांनी देशबंधूंशी बोलणी सुरू केली.
‘काँग्रेसने एक जानेवारीपासून असहकाराचे आंदोलन मागे घ्यावे; त्याबदल्यात सर्व आंदोलकांची सुटका. त्यानंतर भारताची राज्यघटना ठरवायला प्रमुख पक्षांची गोलमेज परिषदही भरवण्यात येईल.’
वर्षभराच्या आंदोलनानंतर जनतेच्या हाती काहीतरी पडायला पाहिजे, नाहीतर जनताही दिशाहीन होईल आणि काँग्रेसही! हे युवराज येण्याच्या मुहूर्तावर व्हावं, गांधीजींनी हा प्रस्ताव स्वीकारावा अशी दासबाबूंची स्वतःची इच्छा होती. पण गांधीजी अली बंधूंच्या सुटकेवर अडून बसले. प्रत्यक्षात अली बंधूंची अटक ही तुर्कस्थानच्या खलिफासाठी केलेल्या आंदोलनासंदर्भातील होती; त्याचा भारताच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नव्हता. पण गांधीजी हटायला तयार नव्हते.
युवराज आले आणि गेले, वातावरण जैसे थे! आंदोलक तुरुंगात आणि गांधीजी बाहेर! अली बंधूंच्या सुटकेवर अडून बसलेले!
४ फेब्रुवारी १९२२! चौरीचौराची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली. गोरखपुर जिल्ह्यातल्या चौरीचौरा येथे शांतपणे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. चिडून गेलेल्या आंदोलकांनी पोलीस चौकी पेटवून दिली. त्या आगीत होरपळून बावीस पोलिसांचा मृत्यू झाला. त्या पुढची बातमी देशाला बुचकळ्यात टाकणारी होती-
“चौरीचौराच्या घटनेनं व्यथित होऊन गांधीजींनी असहकाराचे आंदोलन मागे घेतले!”
दासबाबू,सुभाष यांच्यासकट अवघ्या देशानं कपाळावर हात मारला. थोडं वातावरण शांत होताच सरकारने गांधीजींना अटक करून सहा वर्षांची शिक्षा ठोठावली.
सगळीकडे शुकशुकाट! आंदोलकांची उभारीच नाहीशी झालेली. आता पुढच्या आंदोलनासाठी सायमन कमिशनची वाट पहावी लागणार होती. अतिशय योजनाबद्धरीतीने सुरू केलेल्या आंदोलनाचा अतिशय धसमुसळेपणाने अंत झाला होता.
क्रमशः असहकार आंदोलन | सुभाष बावनी.
ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील
(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)
लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०