सुभाष बावनी भाग ९ | मंडालेच्या कारागृहात

सुभाष बावनी भाग ९ | मंडालेच्या कारागृहात

सुभाष बावनी भाग ९ | मंडालेच्या कारागृहात –

“लोकमान्य टिळकांना कोणत्या कोठडीत ठेवलं होतं हो?” सुभाषबाबूंनी मंडालेच्या अवाढव्य कारागृहात शिरता शिरताच कुतूहलाने प्रश्न केला. मंडालेचा तुरुंग म्हणजे एखादा किल्लाच जणू. अवती भवती खंदक, त्यात पाणी! त्यात कैदी निसटून जाऊ नये म्हणून सरपटणारे प्राणी सोडलेले!

‘टिळकांना ज्या मंडालेच्या कारागृहात ठेवलं होतं, त्या मंडालेला आपल्याला आणलं गेलं आहे’ याचा कोण आनंद सुभाषबाबूंना झाला होता.

“ती टिळकांची कोठडी! त्याच्या बाजूची लिंबाची झाडे टिळकांनीच लावलेली आहेत”

“अस्सं!” सुभाषबाबू काही क्षण त्या कोठडीकडे पाहत उभे राहिले. कोठडी कसली पिंजराच! जनावरांना ठेवतात तसला. ऊन-वारा-थंडी-पाऊस धूळ यापैकी ज्याचा जोर असेल, त्याचा आतल्या कैद्याला अधिकाधिक उपद्रव कसा होईल; असा विचार करूनच जणू बनवलेले पिंजरे!

“उतारवयाकडे झुकलेले टिळक सहा वर्ष इथे कसे राहिले असतील? त्यात टिळकांना मधुमेह! आपला मनाचा समतोल त्यांनी या रोगट वातावरणात टिकून कसा ठेवला असेल?” सुभाषबाबू स्तब्ध होऊन त्या तीर्थक्षेत्राकडे पाहत होते. जणू त्यांना काहीतरी ऐकू येत होतं-

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।

आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।

ती कोठडी जणू सुभाषबाबूंना सांगत होती, ‘सुभाष थंडी, वारा, पाऊस यांनी तुझ्या शरीराला कितीही जर्जर करून टाकलं, तरी तुझ्या आत्म्यावर मात्र याचा ओरखडाही उमटू देऊ नकोस. धीरोदात्तपणे हे सगळं सहन कर!’ ‘तांस्तितिक्षस्व भारत!!’

तुरुंगात हट्टाने, सरकारशी झगडून दुर्गा पूजा साजरी केल्यावर समाधानाचा विजयी सुस्कारा टाकत असतानाच एक दिवस बातमी येऊन थडकली-

“सुभाष! सुभाष! अरे आपले दासबाबू गेले रे!” बिपिन गांगुलीच्या वार्तेने सुभाषबाबूंची मती गुंग करून टाकली. एवढा आयसीएसचा गोवर्धन लीलया पेलणारा मेधावी सुभाष, ‘दासबाबू गेले!’ या दोन शब्दांच्या छोट्याशा वाक्याचा अर्थच लावू शकत नव्हता.

दासबाबू! अरविंद घोष यांना आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेच्या आणि बिनतोड युक्तिवादाच्या ताकदीवर साक्षात मृत्युच्या दाढेतून ओढून आणणारे बॅरिस्टर!

दासबाबू! नागपूर काँग्रेस अधिवेशनात आपली सगळी संपत्ती देशाला समर्पित करून एखाद्या भणंग फकीरासारखे राजमहालातून रस्त्यावर येऊन उभे राहणारे देशबंधू!

दासबाबू! ‘सुभाष बोस गुन्हेगार असेल तर मी त्याचा गुरु; मी सात गुन्हेगार आहे. कलकत्ता महापालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी दोषी असेल, तर त्याच महापालिकेचा महापौरही दोषीच आहे- घाला आम्हालाही बेड्या!’ असं जमलेल्या दीड लाखाच्या गर्दीसमोर खुले आव्हान देणारे गुरु!

दासबाबू! तुरूंगातच आपल्या गुरूच्या पायाला हात लावून विषण्णपणे मागे सरकणाऱ्या सुभाषला ‘काळजी करू नकोस बेटा, मी तुला फार काळ तुरुंगात राहू देणार नाही’ असे आत्मविश्वासानं म्हणणारे वत्सल पिता!

दासबाबू! या देशाला मी ‘सुभाष’ हे माझं सर्वोच्च रत्न दिलं आहे, असे द्रष्टेपणाने प्रतिपादन करणारे देशबंधू चित्तरंजन दास!

“ दासबाबू गेले? असंही होऊ शकतं? नियती माझ्यावर इतका क्रूर आघात करू शकते?

“मग आता या तुरुंगातून कुणासाठी बाहेर पडायचं? कुणाच्या प्रेरणेने ब्रिटिश साम्राज्याशी दोन हात करायला शड्डू ठोकून उभे राहायचं?

“आमच्यासाठी स्वातंत्र्याचं मूर्त रूप म्हणजे दासबाबू! आता हे मंडालेचे भयाण पिंजरे आम्हाला गिळून का टाकेनात; त्यामुळे आमच्या सध्याच्या वेदनेत तसूभरही वाढ होणार नाही.” त्या सातही बंदीवानांनी गजांवर डोकं आपटून टाहो फोडला.

मंडालेतील रोगट वातावरणाने सुभाषबाबूंची तब्येत बिघडत गेली. ताप, अपचन, पाठीतून तीव्र वेदना याने जीव बेजार झाला. अन्नावरची वासना गेली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. उठून उभे रहायचे त्राणही त्यांच्यात उरले नाही. वजन अकरा किलोने कमी झाले होते. वैद्यकीय तपासणीसाठी सुभाषबाबूंना रंगूनला आणले गेले. कलकत्त्याहून डॉक्टर बंधू सुनील दादाही रंगून पोहोचले. सुभाषबाबूंना क्षययोग झाला असावा, असे सर्व डॉक्टरांना वाटले. तसे सरकारला कळवले गेले-

‘सुभाषबाबूंची ताबडतोब सुटका केली नाही तर तुरुंगात त्यांचे काहीही होऊ शकते. आणि त्याबद्दल लोक सरकारलाच जबाबदार धरतील.’ बंगाल सरकार, हिंदुस्तान सरकार आणि ब्रह्मदेश यांच्या दरम्यान तारा फिरू लागल्या. ‘सुभाषचंद्र बोस जर रंगूनवरून थेट स्वित्झर्लंडला जायला तयार असतील, तर आम्ही त्यांची सुटका करू’ सरकारने जाहीर केले.

“स्वित्झर्लंडला जाऊ? कुणालाही न भेटता? आणि तिथला माझ्या राहण्याचा आणि उपचाराचा खर्च कोण करणार? माझ्या भारतात परत येण्याविषयी काहीही उल्लेख यात नाही. युरोपातील एखाद्या खबर्‍याने काहीही खोटेनाटे जर माझ्याबद्दल कळवले, तर सरकार नेहमीसाठी मला हद्दपार करायलाही मागेपुढे पाहणार नाही. मला ही अट मंजूर नाही.

तब्येत आणखी बिघडली. वजन घटले. पांढराफटक हाडांचा सापळा ग्लानीतच तासनतास पडून राहू लागला. गलितगात्र अवस्थेत सुभाषबाबूंनी पत्र लिहायला घेतले-

“आपण हाती घेतलेले कार्य स्वातंत्र्याचे कार्य आहे. सत्याचे कार्य आहे. त्यामुळे रात्रीनंतर दिवस जसा हमखास उगवतोच; तसा तात्कालिक पराभवानंतर अंतिम विजय आपलाच आहे याबद्दल मी नि:शंक आहे. या लढाईत आपली शरीरे कोसळतील, पण अंगीकृत कार्यावरची आपली श्रद्धा उणावणार नाही. शत्रूला आपले मन जिंकता येणार नाही. अंतिम विजय आपलाच आहे.”

बेशुद्धावस्थेत मंडाले ते रंगून, रंगून ते कलकत्ता असा प्रवास पार पडला. आपल्याला अलमोड्याला नेण्यासाठी हा सारा घाट घातला जात आहे, असे सुभाषबाबूंना वाटले. पण १६ मे १९२७ यादिवशी सुटकेचा हुकूम सुभाषबाबूंच्या हाती पडला.

गलीतगात्र सुभाषबाबू खिडकीतून बाहेर स्वच्छंदपणे उडणाऱ्या पक्षांची क्रीडा बघत ३८/२, एल्गिन रोड, कलकत्ता येथील आपल्या खोलीत पडले होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भडकलेल्या आत्मयज्ञात रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान आणि साथीदारांच्या फाशीचा थरार अनुभवलेला देश भगतसिंग- सुखदेव- राजगुरू या अग्नीशलाकांच्या क्षितिजावरील प्रवेशाने सरसावून बसला.

क्रमशः

ग्रंथ सूची:

१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी

२) नेताजी- वि. स. वाळिंबे

३) महानायक- विश्वास पाटील

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment