सुभाष बावनी | विषयप्रवेश

सुभाष बावनी भाग १

सुभाष बावनी –

सुभाष बावनी – विषयप्रवेश.

“काही खायला आहे का गं आई?”आशिषने स्वयंपाकघरात डोकावत विचारलं.

“तुझे मघाशीच पोहे हादडून झालेत आशिष! तुला भूक लागलेली नाही, तर काय करावं हे समजत नाहीये.”

कोरोनामुळे कॉलेज बंद! ऍडमिशन, लेक्चर सगळं ऑनलाइन! सेमिस्टर एक्झामचं काही वाटत नव्हतं, पण या कोरोनामुळे मित्रांचं भेटणं बंद केलं. कॅन्टीनमधले गप्पांचे फड रंगणे बंद झालेले! फेसबुक,वॉट्सअप्प वर तरी किती वेळ घालवणार! कावलेला आशिष म्हणाला,

“पण मग मी काय करू आता?”

“मी तुला कितीदा म्हटलं आशिष अनायसे वेळ मिळाला आहे तर छान वाचनाची सवय लावून घे. बरीच पुस्तकं आहेत आपल्याकडे…”

“ते बोअर होतं आई” आईचं वाक्य मध्येच तोडत आशिष म्हणाला.

“मग व्यायाम करत जा रोज. घरात बसून बसून आळसावला आहेस तू!”

“ह्या! जीम कुठे सुरू आहेत आई? जीमशिवाय कुणी व्यायाम करत नाही आजकाल”

“मग मी तरी काय सांगू बाबा आता? जा चक्कर मारून ये बाहेर”

व्होडाफोनच्या सर्वर क्रॅशमुळे मोबाईल पाहता येण्यासारखा नव्हता. बराच वेळ विचार केल्यावर आशिषने लँडलाईनवरून चेतनला फोन लावला,

“काय करतो आहेस रे चेतन?”

“काही खास नाही रे. काही वाचायला सापडतंय का नवीन ते पाहतोय. काय म्हणतोस?”

“अरे बोअर होतंय खूप. भेटायचं का यार?”

“अरे पण संचारबंदी?”

“दोघंच भेटू हवंतर बाकीच्यांना नाही बोलावू?”

“ठीक आहे. कुठे येतो मग?”

“सुभाष चौकात? आपल्या नेहमीच्या जागी?”

“चालेल! दहा मिनिटात पोचतो.” असं म्हणून चेतनने फोन ठेवला.

ऍक्टिवा सुरू करून आशिष निघाला. थोड्या वेळातच त्याला उजव्या बाजूला असलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिसला. सुभाष चौक! पाथडीव्हायडरला वळसा घालून तो पुतळ्याजवळ आला. इथे मात्र त्याला कोरोनाचा  चांगलाच परिणाम जाणवला- एरवी कॉलेजच्या मित्रांनी ओसंडून वाहणारा हा परिसर आज निर्मनुष्य होता. क्वारंटाइनचा अदृश्य शिक्का मारल्यासारखा! कधी नव्हे ती आशिषला गाडी लावायला जागा मिळाली. चेतन अजून आलेला नव्हता.आशिष चालत चालत सुभाष चौथऱ्याजवळ जाऊन थांबला.

‘आत्तापर्यंत  हा एवढा मोठा पुतळा मी पाहिला कसा नाही?’ मित्रांची गर्दी-गोंगाट, पार्किंगच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या या सगळ्यामुळे आजवर सुभाषबाबूंच्या अश्वारूढ पुतळ्याकडे त्याचं लक्षच गेलं नव्हतं. सुभाष चौक म्हणजे फक्त मित्रांनी एकत्र यायची, टपरीवर चहा प्यायची, गप्पा मारायची जागा बस्स!

आशिषला स्वतःचंच आश्चर्य वाटू लागलं. डोळ्यात कुतूहल घेऊन तो त्या पुतळ्याचं निरीक्षण करू लागला.

लष्करी गणवेश, मांडीवर फुगीर आणि खाली तंग विजार, त्यावर गुढघ्यापर्यंत आलेले बूट, डाव्या हाताने घोड्याची लगाम खेचलेली, चष्मा!

आशिषला या सगळ्याची एकत्र संगतीच लागेना! तो दोन्ही हात डोक्याच्या मागे बांधून त्या पुतळ्याकडे पाहू लागला.

“काय पाहतो आहेस रे एवढं?” चेतनच्या या प्रश्नाने आशिषची तंद्री भंगली. त्याने वळून पाहिलं तर चेतन आपली गाडी स्टँडला लावत होता.

“अरे चेतन, सुभाषचंद्र बोस यांना नेताजी का म्हणायचे रे? राजकीय नेते होते म्हणून? आणि राजकीय नेत्याचा अश्वारूढ पुतळा कशासाठी?”

“अरे तुला नेताजींबद्दल काहीच माहित नाही का?”

“नाही बुवा! तुला तर माहित आहे चेतन मला शाळेत इतिहास किती बोअर व्हायचा ते! कसातरी रट्टा मारून पास झालो.”

“पण आपले देशपांडे सर खूप छान शिकवायचे रे इतिहास! दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक घटना तारीख-सालासाहित त्यांना तोंडपाठ असत. वर्गात शिकवताना इतिहासाचं पुस्तक उघडलेलं मी सरांना कधीच पाहिलं नाही.”

“असेल बुवा! पण त्यातही नेताजींबद्दल खूप काही होतं असं मला आठवत नाही रे!”

“हो! कारण आपल्या शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात फक्त एक पॅरेग्राफ दिला होता नेताजींबद्दल!”

“हो. आझाद हिंद सेनेची स्थापना….विमान अपघातात मृत्यू वगैरे… थोडंसं आठवतंय मला”

“बरोब्बर!”

“पण त्यांची ती आझाद हिंद सेना कुठे लढली? हरली की जिंकली? त्यांच्या विमान अपघाताचं गूढ…”

“त्याच्याबद्दल आपल्या वयाच्या मुलांना खूपच कमी माहिती आहे.”

“तू तर खूप पुस्तकं वाचतोस ना रे? मग तुला तर खूप माहीत असेल नेताजींबद्दल?” आशिषने विचारलं.

“हा म्हणजे खूप तर नाही पण वाचलं आहे. आजकाल तर त्यांच्या मृत्यूबद्दल रिसर्च केलेल्या अभ्यासकांची बरीच पुस्तकं येत आहेत.”

“मग मला सांग नं!”

“अरे ते काय असं पाच दहा मिनिटात थोडंच सांगून होणार आहे?”

“मग रोज भेटत जाऊ. तसंही सध्या काय काम आहे?”

“ठीक आहे मग करायची सुरुवात? पण कंटाळायचं नाही?”

“अजिबात नाही कंटाळणार!”

दोघांनीही धूळ साचलेल्या, पालापाचोळा पडलेल्या सुभाष चौथऱ्यावरची थोडी जागा साफ केली आणि चेतनने सांगायला सुरुवात केली.

आशिष नावाच्या कॉलेजवयीन तरुणाचा लॉकडाऊनमधला आत्तापर्यंत मिळालेला वेळ वायाच गेला होता, पण यानंतर वर्षभर चालणाऱ्या ‘सुभाषबावनी’ च्या श्रवणाने त्या सगळ्याची भरपाई होणार होती आणि सगळ्याला साक्षी होता तो सुभाषबाबूंचा अश्वारूढ पुतळा!

क्रमशः सुभाष बावनी – विषयप्रवेश.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०

Leave a comment