वेळेची किंमत

bhampak-banner

वेळेची किंमत –

आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मौल्यवान वेळ आहे. याचे मूल्य ज्यांना समजले त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. वेळेची किंमत ज्याला कळली नाही, त्याचे आयुष्य बेशिस्त असते.

दिवसाच्या चोवीस तासाचे नियोजन ज्याचे अगोदर तयार असते, त्याचा दिवस कधीच वाया जात नाही आणि कंटाळवाणा होत नाही. कर्तुत्वान माणसाला वेळ पुरत नाही आणि आळशी माणसाचा वेळ जाता जात नाही. आपण कितीही कष्ट करत असलो, कितीही हुशार असलो आणि वेळेचे नियोजन आपल्याकडे नसेल, तर आपले कष्ट आणि हुशारी दिशाहीन होऊ शकते.

चोवीस तासांपैकी सहा ते आठ तास झोपेसाठी राखीव असावेत. त्यानंतर किमान अर्धा ते एक तास ध्यान, साधना यासाठी राखीव ठेवलाच पाहिजे. त्यानंतर किमान एक ते दोन तास व्यायामासाठी राखीव असला पाहिजे. हा स्वतःसाठीचा राखीव असलेला वेळ कधीच कोणाला देऊ नये कारण या दहा ते अकरा तासावरच उरलेल्या तेरा ते चौदा तासाचे फळ अवलंबून असते.

ज्याला स्वतःला वेळ देता येत नाही, त्या माणसाचा जगून काहीच उपयोग नाही कारण अशा व्यक्तीला फक्त वापरला जातो. पहाटेची वेळ ध्यानसाधना आणि व्यायाम यासाठी सर्वोत्तम आहे, असे जगातील प्रत्येक धर्म सांगतो. ज्याची पहाट वाया गेली त्याचा दिवस वाया जातो.

आपल्या दैनंदिन गरजा आणि वयानुसार अपेक्षित असणारे कर्तव्य आणि कर्म यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. मनोरंजनासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी एखादा छंद जोपासायला हवा. यातून मिळणारा आनंद आपल्या कामाची गती आणि प्रत वाढवण्यास उपयोगी पडतो .मित्रांसाठी, नातलगांसाठी, उत्सव, सण, समारंभासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. आपण कितीही सुधारलो आणि यांना वेळ नाही दिला तर आपण एखादे यंत्र बनून जातो ,ज्याला कोणतीच भावना नसते.

दिवसातून काही काळ निसर्गाची, पशुपक्षांची, राष्ट्राची आणि समाजाची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. या सेवांचा विचार आपल्या मनात येत नसेल तर आपण फक्त स्वार्थी असतो. या सर्व वेळेच्या नियोजनामध्ये कुटुंबासाठी दिलेला वेळ, अतिशय मौल्यवान असतो. दिवसाच्या चोवीस तासातील कुटुंबासाठीचा वेळ इतर कोणत्याही कामासाठी वापरता कामा नये. आपल्याशी बोलावे असे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. मोबाइल बंद ठेवून किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र करायला हवे. आज हे बंद झाल्यामुळे मानसिक ताणतणाव खूप वाढलेले आहेत. कोणी कोणाला वेळ देत नाही, कोणी कोणाचे ऐकून घेत नाही कारण कोणाकडेच वेळ शिल्लक नाही, असे असेल तरी जगायचे तरी कशासाठी ? आणि कोणासाठी ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने शोधायला हवे.

स्मशान ते भूमी प्रेत रूप जन l सेवाभक्ती हीन ग्रामवासी ll
भरतील पोटे श्वानाचियेपरी l वस्ती दिली घरी यमदूता ll

ज्याच्याकडे दिवसाच्या 24 तासाचे योग्य नियोजन आहे, त्याला आठवड्याचे नियोजन करता येते, त्यालाच महिन्याचे आणि वर्षाचे नियोजन करता येते आणि त्यालाच आयुष्याचे नियोजन करता येते. नियोजनबद्ध आयुष्य हेच यशस्वी आयुष्य असते. नियोजनाने जगलेला काळ, हाच जीवनातील सफल काळ असतो. अशा माणसाला आयुष्य कितीही कमी मिळाले तरी तो इतरांपेक्षा खूप जगलेला असतो आणि चिरकाल लोकांच्या लक्षात राहतो.

विश्वमाऊली ज्ञानदेव, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबाराय आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, हे सर्व महापुरुष वयाने खूप छोटे होते, परंतु चंद्रसूर्य असेपर्यंत ते लोकांच्या लक्षात राहणार आहेत आणि हेच त्यांचे आयुष्य आहे, त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे वेळेचे योग्य नियोजन आणि कर्तुत्व !

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment