गुरसाळेतील शिल्पवैभव –
गुरसाळे हे थोडं आडवाटेवरचं गाव. ते खटाव तालुक्यात येतं. अलीकडं ‘सोशल मीडिया’चा ‘टच’ लाभल्यानं गावाला वलय प्राप्त झालं आहे. विशेषतः इथल्या अनोख्या स्थापत्यशैलीच्या रामलिंग मंदिराचा, तिथल्या कलात्मक पुष्करणीचा मोठा गाजावाजा झाला आहे. त्यातून अभ्यासकांची, पर्यटकांची पावलं बहुसंख्येनं या गावाकडं वळू लागली आहेत.गुरसाळेतील शिल्पवैभव.
गुरसाळे आहे ते वडूजनजीक. सातारा ते वडूज हे जवळपास 55 किलोमीटरचं अंतर. पुढं वडूजहून गुरसाळे जेमतेम अर्धा तास. गावातल्या मुख्य रस्त्यानं पुढं गेलं, की शेवटच्या टोकास मोठा वटवृक्ष नजरेस पडतो. तिथंच कडेला रामलिंग मंदिर. अर्थात गावात सोमलिंग, गुपित लिंग, शिवलिंग, भोजलिंग अशी आणखीही शिवलिंगाची स्थानं आहेत.
त्यातील प्राचीन रामलिंग मंदीर हे सर्वाधिक लक्षवेधक आहेत. ते तेराव्या शतकात बांधलं गेलं आहे. हेमाडपंथी शैलीच्या या मंदिरापुढं असलेली पुष्करणी हे इथलं खास वैशिष्ट्यं. तिची कलात्मकता, स्थापत्यकाम, दगडी कोरीवकाम पाहताना अापण अचंबित होतो. हजारो वर्षांपूर्वीचं स्थापत्यकाम किती प्रगत, समृद्ध होतं याची साक्ष आपल्याला नक्कीच पटते.
पावसाळ्यात पुष्पकरणी पाण्यानं भरलेली असते. तिथून दगडी पायऱ्या वर चढून मुख्य मंदिरात जाता येतं. मंदिराचं बांधकामही अर्थातच दगडी आहे. ते चार कोरीव खांबांवर तोललेलं आहे. गर्भगृहाचं प्रवेशद्वार अत्यंत सूक्ष्म कलाकुसरीनं सजलेलं आहे. त्याचं छतही दगडी शिळांचं आहे.
मंदिराच्या दर्शनी भागात खजुराहो शैलीशी साधर्म्य सांगणारी कामशिल्पं आहेत. एरवी आपल्याकडं ती अभावानंच दिसतात. त्याचाही अभ्यास संशोधकांसाठी पर्वणी मानला जातो. सज्जनगडनजीक असलेल्या उरमोडी धरणाकाठच्या परळीतल्या शिवमंदिरातही अशी शिल्पं पहावयास मिळतात. प्रशांत जाधव हा इथला स्थानिक युवक. तो मंदिर, त्याचा इतिहास, पोैराणिक संदर्भ, स्थापत्यशैली आदींविषयी सखोल माहिती सांगतो. गुरसाळेनजीक कातरखटाव इथलं कात्रेश्वराचं मंदिरही लक्षवेधक आहे.
गुरसाळ्यातून पुढं किल्ले भूषणगडची सफर अनुभवता येते. तिथून अोैंधमार्गे साताऱ्याच्या वाटेला लागता येतं. एका दिवसात ही सारी भटकंती आटोपता येते. नवं काही अनुभविल्याची प्रचीती देते.
सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा