शेतकरी जगला पाहिजे

By Digvijay Vibhute Articles 3 Min Read
bhampak post

शेतकरी जगला पाहिजे

सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून आपण शेतकऱ्याकडे पाहतो. गेले अनेक वर्षे हा पोशिंदा संकटात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आजपर्यंत कोणत्याही सरकारने ठोस उपाययोजना केलेली नाही. सरकारवर अवलंबून न राहता शेतकरी आत्मनिर्भर झाला तर?

आपण सर्वांनी लहानपणी “एकीचे बळ” ही गोष्ट ऐकली आहे, शिकली आहे. आपण शिकलेली गोष्ट जरा आठवून बघा. एकत्र असल्याने आपण संकटांवर मात करू शकतो असा त्या गोष्टीचा सारांश होता. शेतकरी शेतात कष्ट करतो, अन्नधान्य-भाजीपाला पिकवतो, तो बाजारात घेऊन जातो, जो भाव चालू असेल त्या भावाने व्यापाऱ्याला ते विकतो, शेतकऱ्याच्या हातात खूप कमी पैसे येतात, व्यापारी मात्र जास्त दराने तो माल ग्राहकांना विकतो आणि व्यापारी भरपूर नफा कमावतो. ही सध्याची शेतीची पद्धत. शेतकऱ्याची ही परिस्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्याला स्वतःला सुद्धा काही बदल स्वीकारावे लागतील. बांधा-बांधावरून असणारे वाद मिटवून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित शेती किंवा गटशेती हा प्रकार सुरु केला पाहिजे. “एकीचे बळ” ही संकल्पना येथे लागू करणे गरजेचे आहे.

उदाहरण : समजा एका गावात १०० शेतकरी आहेत. १०० शेतकऱ्यांची मिळून साधारण ५०० एकर जमीन आहे. १०० शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी व्यवस्थित नियोजन करून ५०० एकर मध्ये वेगवेगळा भाजीपाला-धान्य लावले. (शेतीला व्यावसायिक दृष्टीने बघणे अत्यंत गरजेचे आहे.) ५०० एकर जमीन सलग असल्याने नांगरणी, पेरणी आणि इतर कामे कमी वेळात होतील आणि तिथे खर्च वाचेल. १०० जण एकत्र असल्याने आर्थिक प्रश्न फारसे येणार नाहीत. १०० कुटुंबातून कमीत कमी १५० लोक शेतीत कामाला येतील म्हणजे मजुरांवर होणारा खर्च पण कमी होईल.

सगळं व्ययस्थित नियोजन करून केल्याने खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल. पिकवण्याचा पद्धतीत तर बदल केला आता विकण्याच्या पद्धतीत बदल कसा करता येईल हे बघू. ज्या १०० लोकांनी एकत्र येऊन शेती केली त्यांच्या घरात कोणी ना कोणी बेरोजगार असतेच. असे २५ बेरोजगार तरी मिळतील. या २५ जणांनी विक्री कौशल्य विकसित करण्यावर भर द्यायचा. तयार झालेला शेतमाल या २५ जणांनी बाजारात विकायचा. आतापर्यंत इतर व्यापाऱ्यांना शेतमाल कमी दराने विकला जायचा. आता शेतकऱ्याच्या घरातल्याच व्यक्तीने व्यापारी व्हायचं. म्हणजे जो काही नफा आहे तो शेतकऱ्यालाच मिळेल. आणि २५ जण एकत्र असल्याने बाजारात इतर व्यापारी तुमच्यावर अरेरावी करायला येणार नाहीत. आतापर्यंत शेतकरी पिकवत होता आणि व्यापारी विकत होता आता पिकवणारा आणि विकणारा शेतकरीच असेल तर नफा नक्कीच वाढेल आणि शेतकऱ्याचे अच्छे दिन येतील.

बांधा-बांधावरची भांडणे मिटवून एकत्र येऊन शेतकरी स्वतः अनेक प्रश्न सोडवू शकतील. गरज आहे “एकीच्या बळाची”, गरज आहे शेतीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची, आणि गरज आहे शेतीला व्यावसायिक दृष्टीने बघण्याची.

Leave a comment