फुकट घेण्याची सवय माणसाला हळूहळू लाचार बनविते…

By Team Bhampak Articles Laxman Asbe Lifestyle 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

फुकट घेण्याची सवय माणसाला हळूहळू लाचार बनविते…

आपल्याला निश्चित मदत होईल अशी काही ठिकाणे आपण ठरवून ठेवलेली असतात आणि अडचणीच्या काळात मनाला धीर देणाऱ्या
त्या जागा असतात . मग भले आपण त्यांच्याकडे मदतीची मागणी नाही केली तरी मानसिक आधार न मागता मिळणे ही पण मदतच असते.

माणसाला जीवनात अनेक संकटांना आणि अडचणींना सामोरे जावे लागते, कधी आपली कुवत कमी पडते तर कधी आपले मन खचते . या जीवनातील कमजोरी ज्यावेळी आपल्या अवाक्याबाहेर जातात त्यावेळी माणूस कितीही मोठा असला तरी त्याला मदतीची गरज भासत असते . आपला एखाद्या निर्णय ठाम होत नसला तरी सल्ला घेण्याची तरी गरज भासतेच. मला कोणाची गरज नाही ! हा शुध्द मूर्खपणा किंवा अज्ञान आहे . अशा आपण ठरवून ठेवलेल्या आधारस्थानाकडून आपल्याला मदत झाली तरी त्यात अनपेक्षित काही नसते , पण
जर शक्य असूनही जाणीवपूर्वक मदत करण्याचे त्यांनी टाळले तर मात्र हे आपल्याला अनपेक्षित असते आणि याचा धक्का सहन करण्यापलिकडे असतो .

आपल्या मनाच्या विरोधात घडणारी कोणतीही गोष्ट आपल्याला अनपेक्षितच असते आणि ती खूप त्रासदायक ठरते कारण ते स्वीकारण्याची आपली मानसिक तयारी झालेली नसते . आपण ज्यांना मदत केलेली आहे ती माणसे आपल्यावर वेळ येईल त्यावेळी आपल्याला मदत निश्चित करतील ही एक धारणा आपल्या मनात आपण तयार करून ठेवलेली असते. हीच सर्वात मोठी चुक असते .

आपण ज्यावेळी एखाद्याला मदत करतो त्यावेळी आपली भूमिका ही सहानुभूतीतून तयार झालेली असते , पण घेणारा कधीकधी फक्त गरजू असतो , त्याच्या गरजेसाठी तो जमेल ते सर्व प्रयत्न करत असतो , त्यातल्या एखाद्या प्रयत्नात आपली विकेट पडलेली असते .
गरज संपल्यानंतरचा तो माणूस खूप वेगळा असतो आणि आपल्याला त्याचा परिचय नसतो . आपल्याला गरज पडताच त्याचा खरा परिचय झाला की आपल्या हातात फक्त पश्चात्ताप असतो. हा अनुभव आपल्या प्रत्येकाचा आहे आणि हा त्रास आपण प्रत्येकाने सहन केलेला असतो . या अनुभवातूनच आपल्याला खरे व्यवहारज्ञान मिळत असते , हे कोणत्याच अभ्यासक्रमात शिकविले जात नाही , ही अनुभवाची शाळा असते .

या सर्व अनुभवातून स्वतःला स्थिर ठेवायचे असेल तर नेहमी प्रयत्न चांगल्यासाठी करा आणि वाईट स्वीकारण्यासाठी सतत तयार रहा
व्यवहारी जगाशी शुध्द व्यवहारी वागा , भावना कोणावर लादू नका . एखाद्याला मदत केली असेल किंवा करत असाल तर त्याचा मोबदला
हा फक्त समाधान एवढाच ग्रहीत धरा . ज्या मदतीत परतफेडीची अपेक्षा ठेवली जाते ती मदतच नसते तर तो व्यवहार किंवा धंदा ठरतो, जो फक्त फायदा तोट्याचाच विचार प्रमाण मानतो . मदत करण्यात कधीच कंजूषी करू नका आणि मदत घेण्यासाठी चुकीची जागा निवडू नका .

जीवनात फुकट काही स्वीकारू नका कारण फुकट घेण्याची सवय माणसाला हळूहळू लाचार बनविते . जीवनातील प्रत्येक गोष्ट मोल देऊनच घ्यायची सवय लावा, मग कोणाकडे मदतीसाठी हात पसरण्याची शक्यतो वेळ येत नाही आणि आपण केलेल्या मदतीचा मोबदला हा फक्त समाधान एवढ्यावरच त्याला सीमीत करा कधीच पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.

– डॉ .आसबे ल.म.

Leave a comment