सभ्य चोर आणि लुटेरे

bhampak-banner

सभ्य चोर आणि लुटेरे –

लाचावलेले मन सैतानापेक्षा भयानक असते. आपल्या जीवनातील अपराध आणि गुन्हे घडण्यासाठी आपला स्वार्थ व लाचावलेले मनच कारणीभूत असते. स्वार्थ उत्पन्न झाला की तो एक विकार असल्यामुळे, आपल्या मनाला विकृत बनवतो, मन विकृत झाले की बुद्धी विकृत होते, चित्त गढूळ होते आणि शरीर आपोआप गुन्हे करण्यास प्रवृत्त होते.(सभ्य चोर आणि लुटेरे

विनासायास आणि सहज लाभ होत असेल, तर माणूस त्या ठिकाणी आपल्या नैतिकतेला तिलांजली देऊ शकतो. समोरचा व्यक्ती दुबळा आणि असाह्य असेल, त्याचे आपल्याशिवाय चालत नसेल, तर अशा प्रसंगी माणूसकीचा तोल जातो आणि माणूस भावना सोडून शुद्ध व्यवहारी व व्यापारी बनतो. कोणताही व्यापार हा फायद्यासाठीच केला जातो आणि व्यावहारिकदृष्ट्या तो शहाणपणाचा असतो.

तुका म्हणे लाभ होय तो व्यापार l करा फार काय शिकवावे ll

व्यापार सुरू झाला की आपल्या हातात असलेल्या सेवेचे रूपांतर धंद्यात होते. कोणताही धंदा हा भावनेवर नाही, तर स्वार्थावर वाढत आणि टिकत असतो. आपल्या धंद्यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी, कोणताही व्यावसायिक प्रयत्नशील असतो. जास्त नफा मिळवण्याच्या नादात आपली नैतिकता तो धुळीस मिळवतो.

श्रीमंत होण्यासाठी कोणालातरी लुटले किंवा फसवले पाहिजे, अशी मानसिकता त्याची होऊन बसते आणि असा माणूस मग माणूस न राहता सैतान बनतो. आज या जागतिक महामारीत सर्व रुग्ण असाह्य आहेत , वैद्यकीय क्षेत्राशिवाय त्याला पर्याय उरलेला नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य वैद्यकीय क्षेत्रातील माणसे प्रचंड व्यवहारी आणि व्यावसायिक झाली आहेत. नैतिकता, माणुसकी, सेवावृत्ती हे शब्द म्हणजे मागासलेपणा, अडाणीपणा आणि मूर्खपणा ठरू लागले आहेत.

पैसे मिळवण्याची आणि लुटण्याची जणू स्पर्धा सुरू झालेली आहे. ⁉️ याचा शेवट काय होणार ⁉️ हे ईश्वरालाच माहीत. शासन आणि प्रशासन कितीही प्रयत्न करत असले, तरीही लूट थांबवण्यात त्यांना यश आलेले नाही, कदाचित येणारही नाही. त्या क्षेत्रातील कोणताही विभाग सेवा करणारा राहिलेला नसून शुद्ध धंदेवाईक बनलेला आहे. काही ठिकाणी अगदी माणूस मेला तरी स्मशानात त्याचे प्रेत जाळण्यात सुद्धा लूट केली जात आहे.

येणाऱ्या पैशाला तळमळ आणि तळतळाट चिकटला असेल, तर त्या पैशाचे स्वरूप लक्ष्मी न राहता अवदसा बनणार आहे. आपल्या सावजावर टपून बसलेल्या या शिकारी वृत्तीच्या माणसांना याचे भान नाही राहिलेले नाही. बेभान झाल्याशिवाय, माणुसकी सोडल्याशिवाय, नैतिकता सोडल्याशिवाय लूट आणि चोरी, गुन्हा व अपराध करताच येत नाही. दुर्दैवाने यांना चोर किंवा लुटेरे म्हणता येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

लाचावले मन लागलिसे गोडी l
ते जीवे न सोडी ऐसे झाले.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment