ती, मी आणि पाऊस..!!! भाग १

bhampak post

ती, मी आणि पाऊस..!!! – भाग एक

 
आकाशात काळे ढग दाटून आले, गार वारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की माझ्या मनात सुध्दा “ती”च्या आठवणींचे ढग दाटून येतात. न चुकता, न बोलवता प्रत्येक पावसात “ती”ची आठवण मला भेटायला येते, गळ्यात पडते, करकचून मिठी मारते आणि माझ्या डोळ्यातून अश्रु घेऊन जाते. आज सकाळपासूनच बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि सकाळपासूनच “ती”च्या आठवणींनी माझं मन भरून येतय.
 
आम्ही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखायचो. आमच्या शेजारीच त्यांच घर होतं. “ती”, तीची आई आणि तिचे बाबा… तिघेच होते… आमच्या घरी मात्र मी, ताई, आई, बाबा, आजी आणि आजोबा… घरातले सगळेच प्रेमळ त्यामुळे तिच्या घरातले आमच्या घरातलेच झाले होते. एकदम मस्त नातेसंबंध तयार झाले होते. मला लहानपणीचं जास्त काहि आठवत नाही पण आई गप्पा मारताना बर्‍याच वेळा सांगते त्यावरून मी हे सांगतोय… “ती”चे आई बाबा कामाला गेले की “ती” दिवसभर आमच्याच घरी असायची. “ती” आणि मी आम्ही दोघे पण सारख्याच वयाचे, त्यामुळे आम्ही एकत्र खेळायचो. ताई जरा मोठी होती त्यामुळे ताई आमच्यासोबत खेळायची कमी आणि सुचना जास्त करायची. आमचं भांडण झालं की सोडवायला ताई असायची, “ती”ला चॉकलेट द्यायची आणि मला मारायची. आमच्या घरात ना माझ्यापेक्षा “ती”चेच लाड जास्त व्हायचे. “ती” होतीच तशी म्हणा.. प्रत्येकाने कौतुक करावे, लाड करावे अशी.. मी मात्र हुंबरदंड्या… त्यामुळे माझं कौतुक करायला शब्द कमी आणि हात जास्त वापरले जायचे..
 
हळूहळू आम्ही शाळेत जायला लागलो. एकाच वर्गात होतो. एकत्रच यायचो जायचो.. वर्गात “ती”चा आणि माझा कायम पहिला नंबर यायचा; “ती”चा अभ्यासात आणि माझा मारामारीत. घरी गेल्यावर दोघांचे पण कौतुक व्हायचे; “ती”चे कॅडबरी देऊन आणि माझे धपाटे देऊन.. मला मार खाताना बघून “ती”ला कसतरी वाटायचं, मग “ती” तीचं चाॅकलेट मला द्यायची.. मी मात्र जळायचो तिच्यावर.. मुद्दाम खोड्या काढायचो “ती”च्या.. “ती” रडली की मला बरं वाटायचं.. तिला रडवलं म्हणून मला अजून मार खावा लागायचा पण त्याच एवढं काही वाटायचं नाही, आजीजवळ जाऊन रडलं की आजी लाड करायची; त्यामुळे “ती”ला रडवायला आणि मार खायला मला अजून स्फुरण चढायचं. बरेच असे किस्से आई अधून मधून सांगत असते.
 
आम्ही चौथी-पाचवीला होतो तेव्हा.. आता जरा मोठे झालो होतो.. थोडं थोडं कळायचं.. त्यामुळे मी जरा कमी त्रास द्यायचो “ती”ला.. आता आमच्यात मैत्रीचे धागे बांधले जात होते… स्वभाव मात्र भिन्न, अगदि लहानपणीसारखेच… “ती” एकदम शांत, सालस, गोड… मी मात्र हुंबरदंड्या, आरबुज… पण मित्र म्हणून आम्ही एकमेकांना पूरक होऊ लागलो होतो. “ती” मला अभ्यासात मदत करायची आणि मी तीला डबा संपवायला मदत करायचो. “ती”ला वर्गात कोणी चिडवले किंवा खोडी काढली की मी मधे पडायचो. मजा यायची पण खुप. “ती”ने मला खुप वेळा शिक्षकांचा मार खाण्यापासुन वाचवलय.
 
एकदा “ती” आणि मी शाळेतून घरी चाललो होतो. पाऊस सुरू झाला आणि आम्ही एका ठिकाणी आडोशाला उभे राहिलो.. मस्त पाऊस पडत होता.. “ती” पावसाच्या कविता म्हणत होती.. पत्र्यावरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या धारेला हाताने मधेच छेदत होती.. तेच पाणी माझ्या अंगावर उडवत होती.. हसत होती.. पायात साठलेले थोडेसे पावसाचे पाणी पायाने उडवत होती.. पावसाची जमेल तेवढी मजा घेत होती. मी मात्र तोंड बारिक करून पाऊस उघडायची वाट पहात होतो. घरात आई गरमागरम भजी तळत असताना मला दिसत होती (पाऊस पडायला लागला की आई भजी करते ना). कधी एकदा पाऊस उघडतोय आणि कधी एकदा मी घरी जाऊन भजी खातोय असं मला झालं होतं… पोटात कावळे बोंबाबोंब करत होते… पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता..
एवढ्यात “ती”ने दप्तरातून एक वही काढली. दोन पाने फाडली आणि वही दप्तरात ठेवून दप्तर पाठीला अडकवले. एक पान माझ्या हातात देत म्हणाली –
ती : तुला होडी करायला येते?
मी : नाही…
ती : मी शिकवते हं.. मी करते तसं कर…
मी : हममम…..
खरंतर मला होडी करायची नव्हती.. माझ्या डोक्यात त्यावेळी फक्त भजी होते.. पण “ती” माझा अभ्यास करून द्यायची ना म्हणून मी सहसा तिचं सगळं ऐकायचो (मनात नसलं तरी)…
ती : हे बघ हे असं कर, असं कर आणि असं कर…
मी : हममम केलं…
ती : आता हा कागद असा घडी घालून हे असं कर..
मी : हममम…
ती : झाली होडी तयार.. किती छान ना…
मी : सोडू का पाण्यात?
ती : आपण दोघे मिळून सोडूया..
आणि आम्ही पाण्यात होड्या सोडत बसलो… पाऊस आता कमी झाला होता..
मी : चल घरी जाऊ..
ती : थांब ना.. अजून आहे पाऊस.. भिजत गेलो तर आई आणि काकू ओरडतील..
मी : मला भजी खायचेत.. मी चाललो..
असं म्हणत मी जोरात उडी मारून पुढे गेलो आणि माझा पाय नेमका “ती”च्या होडीवर पडला… होडी चिखलात रुतून चिखलमय झाली आणि तीच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणात बदलले.. मघापासून हसणारा चेहरा आता नाराज झाला होता. मी मात्र भजी खायला पळत सुटलो…
 
क्रमशः
1 Comment