ती, मी आणि पाऊस..!!! – भाग दोन
असचं दिवसामागून दिवस जात होते.. आमची मजा-मस्ती, शाळा मस्त चालू होतं.. आमची मैत्री पण घट्ट होत चालली होती. साधारणतः तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशाप्रकारच्या नात्याला आमच्यात सुरवात झाली होती.
आता आम्ही सातवी-आठवीला गेलो होतो. आम्ही सायकल वरून जायचो शाळेला. भारी वाटायचं एकदम… कधी कधी आम्ही एकाच सायकल वरून यायचो. म्हणजे व्हायचं काय, कोणीतरी मुद्दाम खोड्या काढायचं आणि “ती”च्या सायकल ची हवा सोडायचं.. मग तीची सायकल पंक्चर काढायला दुकानात ठेवून आम्ही माझ्या सायकल वरून घरी जायचो. एक दिवस मी ठरवलं की कोण खोड्या काढातयं हे शोधून काढायचं आणि त्याला धरून मारायचं…
मी सायकल स्टँड च्या मागे एका आडोशाला लपून बसलो. तीची सायकल मला बरोबर दिसत होती. बराच वेळ वाट पाहिली मी.. पण कोणी आलेच नाही… मी तिथून बाहेर पडणार एवढ्यात समोरून “ती” येताना दिसली. मी पुन्हा लपलो. पहातो तर काय “ती” स्वतःच तिच्या सायकलच्या टायर ला खिळ्याने भोक पाडत होती.. मला कळेना “ही असं का करतेय?”
मी ताडकन बाहेर आलो आणि “ती”च्या समोर येऊन उभा राहिलो. “ती”ला पण सुचायचं बंद झालं. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि “ती”ने मला घट्ट मिठी मारली.. मी विचारलं “असं का करतेय?” तर “काहि नाहि” म्हणाली आणि निघून गेली. मी ठोंब्या सारखा विचार करत उभा राहिलो. “ती”ला माझ्यामागे बसायला आवडतं म्हणून असं करतेय हे पण कळलं नाहि मला.
नंतर थोडे दिवस हा प्रकार जरा बंद झाला. आमच्यातले बोलणे पण कमी झाले होते. “ती” माझ्यासोबत बोलताना जरा अवघडल्यासारखी वाटायची, नजर चोरायची…
शाळेत आम्हाला पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल या विषयावर माहिती दिली जायची. आधी मला नीट काय कळायचं नाहि पण आता हळूहळू समजायला लागलं होतं, “ती”च्या वागण्याचा बोलण्याचा अर्थ समजायला लागला होता.
“ती” दिसायला खुप सुंदर होती, हसताना गालावर खळी पडायची जणू पारिजातकाचे फुल पडल्यासारखी, केसांची बट एका बोटाने कानामागे सरकवताना एकदम मस्त दिसायची..
एकदा दहावीच्या एका पोराने “ती”ला चिठ्ठी दिली. “ती”ने ती चिठ्ठी न उघडता सरळ मला आणून दिली. मी चिठ्ठी पाहिली तर त्यात “I love u” लिहिलं होतं… मी “ती”च्याकडे बघत उभा राहिलो, मला काहिच सुधरेना..
ती : असा बघत काय उभा आहेस? त्या दहावीच्या वर्गातल्या त्या मुलाने दिलीये मला..
आता माझ्या डोक्यात झिनझिन्या यायला लागल्या, डोकं एकदम गरम झालं, कानातून वाफा आल्यासारखं झालं.. मी सरळ दहावीच्या वर्गात घुसलो आणि मारामारी करून आलो. मला पण मार खावा लागला तेव्हा. पण “ती” जाम खुश झाली होती. आता आमच्यातला मोकळेपणा वाढला होता. एकदम पहिल्यासारखी बिनधास्त बोलु लागली होती “ती”. कदाचित माझी परिक्षा घ्यायला तिने मुद्दाम ती चिठ्ठी घेतली असावी आणि मुद्दाम मला आणुन दिली असावी.
एकेदिवशी संध्याकाळी “ती” बाजारात भाजी आणायला गेली. जाताना मला चल म्हणाली पण मी टिव्ही पहात होतो त्यामुळे नाहि गेलो. ती गेली आणि साधारण दहाच मिनिटात पाऊस पडायला सुरुवात झाली. सगळीकडे अंधारून आलं. विजांचा कडकडाट होत होता.. त्या इर्ष्येवर ढग गडगडाट करत होते.. जोराचा पाऊस सुरू झाला. काकू (तीची आई ) गडबडीत आमच्या घरात आल्या आणि मला म्हणाल्या “छत्री घेऊन बाजारात जातोस का रे? पाऊस जोरात पडतोय, भिजत येईल पोरगी.. घरात कोणीच नाहि नाहितर मीच गेले असते..”
मी पटकन दोन छत्र्या घेऊन घराबाहेर पडलो. भरभर चालत बाजाराकडे चाललो होतो. वाटेत “ती” उभी होती, एका आडोशाला.. थोडीशी भिजलेली.. मी एक छत्री तिला दिली आणि आम्ही चालू लागलो. जोराच्या वाऱ्याने तीची छत्री उलटली आणि एक काडी तुटली. “ती”ने छत्री बंद केली आणि तशीच चालू लागली. त्या क्षणी मी माझी छत्री तिच्या डोक्यावर धरली. “ती” नाजूक हसली.. मला पण मनात काहितरी छान छान वाटायला लागलं होतं.
दोघेजण थोडं थोडं भिजत होतो.. मी तिरक्या नजरेने पहात होतो तिच्याकडे (कदाचित ती पण).. भिजल्यावर खुपच मस्त दिसत होती ती. एखाद्या नाजुक फुलावरून दवाचा थेंब खाली पडावा तसं तीच्या केसातुन आणि चेहर्यावरून पावसाचे पाणी टिपकत होते. मी ते सगळं चोरट्या नजरेने टिपत होतो. चालताना अधून मधून एकमेकांना एकमेकांच्या हाताचा स्पर्श व्हायचा. जरा शहारल्या सारखं वाटायचं.. तसं आम्ही लहानपणापासूनच एकत्र त्यामुळे एकमेकांचे स्पर्श आम्हाला नवीन नव्हते. पण हा स्पर्श चेहर्यावरचे भाव बदलत होता. ती लाजून स्मितहास्य करायची आणि मला ते पुन्हा पुन्हा पहावं वाटायचं.
चालत भिजत आम्ही घरी पोहोचलो. दारात आमच्या दोघांच्या पण मातोश्री उभ्या होत्या. आम्हाला भिजलेलं पाहून त्यांनी ओरडायला सुरवात केली. आम्ही मात्र चोरून एकमेकांकडे पाहिले आणि ती तिच्या घरात गेली अन् मी माझ्या घरात.. चेहर्यावर एकप्रकारचे स्मितहास्य मात्र तसेच होते…
क्रमशः