ती, मी आणि पाऊस भाग ४

By Digvijay Vibhute Articles Entertainment 8 Min Read
bhampak post

ती, मी आणि पाऊस..!!! – भाग चार 

त्या किस नंतर आमचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर आलं. आम्ही आता एकमेकांमधे खुपच गुंतलो होतो. काटा माझ्या पायात रूतावा आणि पाणी “ती”च्या डोळ्यात यावे, हात “ती”चा भाजावा आणि चटका मला बसावा असं काहीसं आमचं नातं झालं होतं. जणू आम्ही एकमेकांसाठीच जन्माला आलो होतो. मेड फॉर इच ऑदर…
मी एकदा आजारी होतो तर “ती” रात्रभर माझ्या जवळ बसून होती. माझा ताप कमी होईपर्यंत जेवली पण नाहि. आमच्या वागण्या बोलण्यावरून आमच्यात मैत्रीपेक्षा जास्त काहितरी आहे हे बहुतेक घरात कळलं होतं. म्हणजे आई, ताई, आजी, तीची आई या सारख्या चिडवायच्या आम्हाला. बाबा, आजोबा, तीचे बाबा मधून अधून चौकशी करायचे. मला कसतरीच व्हायचं, काय बोलायचं ते कळायचं नाही. मी चेहर्‍यावर असे भाव आणायचा प्रयत्न करायचो की जणू “मी त्या गावचा नाहिच”.. काहिच कळत नसल्यासारखं दाखवायचो.. “ती” मात्र बिनधास्त होकारार्थी मान हलवायची. पण घरात कधीच कोणी आम्हाला विरोध नाहि केला. कदाचित त्यांना पण आम्ही दोघे एकत्र असावं असचं वाटत असावं.. आई तर सरळ सरळ म्हणायची “लवकर चांगलं शिक्षण घ्या, उद्योगधंद्याला लागा, म्हणजे तुमचे हात पिवळे करून द्यायला आम्ही मोकळे..”.
आई असं बोलली की “ती” लाजून आईच्या गळ्यात पडायची, मला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायच्या पण चेहर्‍यावर दाखवायची इच्छा नसायची.. मग मी काहि न कळल्याचा आव आणत काढता पाय घ्यायचो..
असचं सगळं छान छान चाललं होतं.. काॅलेज पण संपत आलं होतं.. करिअर वगैरे असल्या गोष्टीकडे आम्ही जास्त लक्ष देऊ लागलो.
एकदा “ती” काॅलेज ला येणार नव्हती म्हणून मी मित्रांसोबत काॅलेज ला गेलो.. काॅलेज बंक करून सगळे बाहेर फिरत होतो. मी कधी काॅलेज बंक केले नव्हते (तिच्यामुळे).. पण आज “ती” नव्हती आणि मी मित्रांसोबत होतो.. एका टपरीवर चहा प्यायचा म्हणून सगळे गेलो.. तिथे दोघा-तिघांनी सिगारेट घेतल्या.. मला धुराचा त्रास होत होता म्हणून मी जरा बाजूला बसलो. सगळे मित्र मला चिडवू लागले.. “कायम पोरीसोबत राहून हा पण पोरींसारखाच करायला लागला की..” असं म्हणत माझी टर उडवत हसू लागले.. माझा इगो दुखावला जाऊ लागला.. मग मी पण एक सिगारेट घेतली आणि पेटवली.. मला जोराचा ठसका लागला.. मी जोरात खोकत होतो.. नेमकं त्याचवेळी “ती” आणि ताई त्याच रस्त्याने चालल्या होत्या. तीने मला पाहिलं.. ताई आणि “ती” माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या.. हसणारी मुले एकदम शांत झाली आणि हळुहळू पांगू लागली. “ती” रागाने माझ्याकडे पहात होती.. चेहरा लालबुंद झाला होता.. मला सुचायचं बंद झालं होतं.. ताई घरी सांगेल यापेक्षा “ती” आता काय बोलेल याचं टेंशन जास्त आलं होतं. माझा ठसका थांबला.. मी हातातली सिगारेट फेकून दिली.. ती रागाने बघत होती… मी मात्र नजरेला नजर देऊ शकत नव्हतो..
ती : कधीपासून चालू आहे हे?
मी : आज पहिल्यांदाच… (मी अडखळत बोललो)
ती : हे पहिलं आणि शेवटचं.. पुन्हा जर असं काहि केलस तर मी विसरून जाईन की माझं तुझ्यावर प्रेम आहे.. हातात जे सापडेल त्याने मारीन.. लक्षात ठेव…
(ती निघून गेली)
बाकिचे बघे माझ्याकडे कुत्सित नजरेने पहात होते, हसत होते.. मला ते भयंकर अपमानास्पद वाटलं.. मी “ती”च्यावर नाराज झालो.. (खरतर चुकलो मी होतो पण हे मला उशीरा कळलं होतं.. )
दिवसभर आमच्यात एका शब्दाचा पण संवाद झाला नाहि.. रात्री झोपताना तीचा मेसेज आला-
ती : जेवलास?
मी : हममम
ती : किती रे रुसुन बसतोस… एक शब्द पण बोलला नाहिस सकाळपासून..
मी : चारचौघात माझा अपमान केलास की..
ती : सिगारेट प्यायला मी सांगितलं होतं?
मी : झाली चुक माझी… पुन्हा नाहि असं करणार.. पण तु मला सगळ्यांसमोर जे बोललीस ते खुप लागलं मनाला..
ती : माझा आहेस म्हणून बोलले.. उगाच का बोलेन?
मी : सगळे हसले मला..
ती : साॅरी बाबा.. चुकलं माझं..
मी : मी पण साॅरी.. माझ्याकडून कळत-नकळत अशी चुक पुन्हा होणार नाहि..
ती : नक्की?
मी : लिहून देऊ?
ती : नको.. मला माहित आहे तुझं खुप प्रेम आहे माझ्यावर.. तु मला दिलेला शब्द मोडणार नाहिस… लव्ह यु..
मी : बरं…
ती : बरं??? मी लव्ह यु म्हणलं..
मी : हा.. मग???
ती : मग बादलीत..
मी : हाहाहा… टेरेस वर ये..
ती : आलेच..
मी टेरेस वर “ती”ची वाट पहात उभा होतो.. ती माझ्या मागून हळूच आली आणि मला पाठीमागून मिठी मारली…
ती : साॅरी.. लव्ह यु..
मी : माहितीये मला.. प्रेम नसतं तर तुला राग आला नसता..
ती : हममम
मी : लव्ह यु टु..
ती : बोल.. कशाला बोलवलं टेरेस वर?
मी : मेसेज मधून मिठी मारता येत नाहि ना..
ती : आगाऊपणा करायचा नाहि.. मी लांब उभा राहून बोलणारे तुझ्याशी..
मी : हो का? मिठी सोड की मग..
(“ती” खरचं बाजूला उभी राहिली..)
ती : बोल..
मी : काय?
ती : काहिही..
मी : अगं काहि नाही.. असचं.. आज पहिल्यांदा आपल्यात असं रूसवा-फुगवा, राग हे प्रकार झाले.. पण तु हक्काने बोलली ते खुप मस्त वाटलं…
ती : हममम.. नात्यात असे छोटे छोटे लुटूपुटू चे रूसवे-फुगवे नेहमीच चालणार.. आपण जसं हक्काने बोलतो तसं हक्काने समजून पण घेतलं पाहिजे..
मी : हो ना.. मला तुझा राग आला होता.. पण नंतर राग शांत झाला की माझी चुक मला कळली..
ती : म्हणून मी मेसेज करायची वाट पहात होतास? स्वतःहून मेसेज केला तर कमीपणा येणार होता?
मी : गप आता.. नाहितर तोंड बंद करेन..
ती : नको… बसते गप..
मी : तुला आठवतो का तो दिवस? पावसात आपण किस केलं होतं..
ती : हममम
मी : आपल्या नात्यात जेव्हा जेव्हा काहितरी छान घडलयं तेव्हा तेव्हा पाऊस होता साक्षीला..
ती : हो ना.. कसलं छान ना..
मी : आत्ता पाऊस पडला तर?
ती : तर?? आपण घरात जायचं.. तु तुझ्या.. मी माझ्या..
मी : बेकार… बेकार आहेस तु…
ती : हाहाहा.. मला माहित आहे तुझ्या डोक्यात काय चाललयं ते… आता पाऊस पण पडणार नाहिये आणि तुझ्या डोक्यात जे आलय ना ते पूर्ण व्हायला अजून खूप वेळ आहे.. आता घरी जाऊन गप झोप.. उद्या सेमिनार आहे आपला..
मी : हममम साॅरी अजून एकदा..
ती : लव्ह यु.. बाय..
“ती” पटकन निघून गेली.. मी मात्र निवांत पायर्‍या उतरत होतो.. माझ्या आयुष्यात “ती” आहे याचं वेगळचं समाधान माझ्या चेहर्‍यावर होतं..
त्या दिवशी पाऊस पडला नाहि, पण “ती”च्या प्रेमाचा वादळी पाऊस मी अनुभवला.. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ना ते काहि खोटं नाहि.. त्या दिवशी जे झालं त्यामुळे “ती”चं प्रेम मला जवळून कळलं.. आमच्या नात्याला एक नवीन पैलू पडला.. “ती”च्या प्रेमाची अजून एक बाजू उलगडली गेली.. जिथे प्रेम आहे तिथेच राग येणार.. हक्काचं माणूस चुकीचं वागलं की राग तर येणारच ना.. तसाच विचार करत घरात गेलो आणि देवासमोर उभा राहिलो.. आमच्या नात्याला कोणाची नजर नको लागायला म्हणून मनापासून प्रार्थना केली.. तसाच उभा होतो हात जोडून, तेवढ्यात ताईचा आवाज आला “बोललास ना तिच्यासोबत? झोप आता शांत..”
मला काय उत्तर द्यावं ते कळेना.. मी पटकन बेडवर गेलो आणि झोपलो.. डोळ्यासमोर बराच वेळ “ती”चा चेहरा होता.. एकदा हसरा, प्रेमळ.. तर एकदा रागाने लालबुंद झालेला… “ती”चा चेहरा पहात पहातच मी झोपी गेलो..
क्रमशः
Leave a comment