ती, मी आणि पाऊस भाग ५

By Digvijay Vibhute Articles Entertainment 5 Min Read
bhampak post

ती मी आणि पाऊस..!!! – भाग पाच

त्या दिवसापासून आमच्यातलं mutual understanding अजून वाढलं. आम्ही एकमेकांना समजून घ्यायला आणि एकमेकांच्या मतांना आदर द्यायला जास्त महत्व द्यायचो, किंबहुना ते आपोआपच व्हायचं.. एवढ्या वर्षांत आम्ही किस पेक्षा पुढे कधीच गेलो नाहि. म्हणजे इच्छा तशी आमच्या दोघांची पण व्हायची.. तसं मी एक दोन वेळा बोललो पण होतो, “ती” पण बिनधास्त सांगायची.. पण ते फक्त बोलण्यापुरतं मर्यादित.. आम्हाला घरातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर आम्ही कधीच केला नाहि.. मर्यादा कधीच ओलांडली नाहि.. “तिच्यामुळेच”…
“ती” म्हणायची – “मी तुझीच आहे की, लग्नानंतर या गोष्टी आयुष्यभर आहेतच, मग आत्ता इच्छा झाली म्हणून लगेच ते क्षण अनुभवायची घाई कशाला? आपलं नातं ना लोणच्यासारखं आहे, आत्ताच कच्च्या कैरीच्या फोडी करून मसाला फोडणी दिल्यासारखं.. जरा लोणचं मुरूदेत.. नंतर खाताना जास्त चव येईल..”
आता “ती” असं बोलल्यावर मी नाहि म्हणणे शक्यच नसायचं.. मला पटायचं.. मी होकारार्थी मान डोलवायचो..
आमचं काॅलेज आता संपलं होतं. आम्ही जाॅब शोधायच्या मागे लागलो होतो. रिझल्ट्स अजून यायचे होते.. साधारण जुन जुलै चा महिना सुरू होता.. मस्त पावसाळा सुरू झाला होता.. उन्हाळ्यातल्या वैतागापासून सुटका झाली होती.. मस्त ढगाळ वातावरण असायचं.. रिमझिम पाऊस पडायचा.. सगळीकडे हिरवाई.. एकंदरीत सगळंच असं रोमॅन्टिक वाटायचं..
“ती”ला फिरायची खुप हौस होती.. मला म्हणाली “किती मस्त वाटतयं ना.. चल ना आपण फिरायला जाऊ.. एक दिवसाची मस्त पिकनिक करू..”
मी नकार देणं शक्यच नव्हतं.. आम्ही घरात सांगितलं.. परवानगी घेतली.. आणि दुसर्‍याच दिवशी फिरायला जायचं प्लॅनिंग केलं..
मी गाडी सुरू केली. “ती” माझ्या मागे बसली.. जरा पुढे गेलो आणि बारीक पाऊस पडायला सुरवात झाली.. “ती” मला बिलगली.. घट्ट मिठी मारून बसली.. पावसात भिजत, मस्त गप्पा मारत आम्ही चाललो होतो. घाट सुरू झाला होता.. पावसाने पण जोर धरला.. मी गाडी एका बाजुला घेतली.. झाडाचा आडोसा बघून आम्ही उभे राहिलो.. जाम गारठलो होतो.. हातावर हात चोळत गप्पा चालु होत्या.. दात कुडकुडत होते.. एकमेकांकडे बघत हसत आम्ही बोलत होतो.. पाऊस बर्‍यापैकी कमी झाला होता.. समोरचं स्पष्ट दिसत होतं..
मी : चल जाऊया..
ती : अरे थांब ना.. इकडे बघ की पावसाने मस्त धबधबे तयार झालेत.. इकडे तर खोल दरी आहे.. ढग जमा झालेले दिसतायत.. बघ ना किती मस्त.. आपण ढगांच्या उंचीवर आहोत.. कसलं भारी ना…
(ती एवढी हरखून बोलत होती ना, मी नुसतं पहात होतो तिच्याकडे..)
ती : असं काय बघतोय? ये ना फोटो काढू..
(आम्ही जिथे उभे होतो तिथुन पलीकडच्या डोंगरातले छोटे छोटे धबधबे दिसत होते.. दोन डोंगरांमधल्या दरीत ढग दाटले होते.. खुप सुंदर दृश्य होतं ते..)
मी : हममम आलो.. रहा उभी..
ती : हममम काढ फोटो.. ढग आणि धबधबे आले पाहिजेत हं फोटोत..
(“ती”चे वेगवेगळ्या पोझ मधले भरपुर फोटो काढले.. तीने माझे फोटो काढले.. माझ्या हातातुन “ती”ने मोबाईल घेतला.)
ती : चल एक सेल्फी काढू.. निसर्गाचा नजारा, तु आणि मी… एका फोटोत..
मी पण तीच्या शेजारी उभा राहिलो.. एक फोटो झाला… आता “ती” कठड्यावर चढू लागली..
ती : पकड हं मला नीट..
मी : खाली उतर..
ती : अरे मस्त फोटो येईल..
मी : उतर खाली..
ती : फक्त एकच..
मी : ऐकत जा जरा.. उतर खाली..
(मी “ती”चा हात पकडू लागलो.. ती ऐकत नव्हती.. एवढ्यात निसरड्या कठड्यावरून “ती”चा तोल गेला.. “ती”ला दरीत पडताना मी वाचवू शकलो नाही… “ती” मला सोडून गेली.. कायमची…
त्या धक्क्यातून मी सहा महिने सावरलो नाहि.. या घटनेला आता चार वर्ष होतील.. पण आज पण “ती”ची आठवण माझ्या डोळ्यातून पाणी आणते.. माझ्या प्रत्येक गोष्टीत “ती”ची काहिना काही आठवण आहे.  सगळं असं नाहि विसरू शकत.. सगळं चांगलं चाललं असताना दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं.. बघितलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.. मी एकदम लुळा पडल्यासारखा झालो.. अचानक “ती” मला कशी काय सोडून गेली हेच कळत नाही.
अगदि लहानपणापासून प्रत्येक पावसातली “ती”ची आणि माझी एक आठवण होती.. त्यामुळे पाऊस हवाहवासा वाटायचा.. “त्या” दिवशी पासून पाऊस पडायला लागला की नको वाटतो.. मन भरून येते.. डोळे ओले होतात..
आता सुध्दा मी ऑफिस मधे बसलोय.. सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू आहे.. सकाळपासूनच “ती”च्या आठवणींचे ढग मनात दाटले आहेत.. मन गहिवरून आलय… खिडकीच्या बाहेर पाऊस पडतोय, खिडकीच्या आतमधे पण पाऊस पडतोय… बाहेर ढग बरसत आहेत, आतमधे माझे डोळे.. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे असचं सगळं आठवतं.. आमचं नातं न संपणारं आहे, “ती”चं, माझं आणि पावसाचं…!!!
समाप्त.
Leave a comment