ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही!

By Team Bhampak Travel Articles 3 Min Read
ट्रेकिंग

ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही!

ट्रेकिंग करणे जितकं वाटत तितकं सोपं नाही.येण्या जाण्याची सोय बघणं.सगळ्यात अवघड म्हणजे पहाटेच्या साखर झोपेतून जागे होऊन सह्याद्रीची वाट धरण.आडवे उभे डोंगर चढण येड्या गबळ्यांच काम नाही.चालताना लागणार दम ,येणारा घाम हे सगळं सहन करावं लागतं.इथं सगळ्याची तयारी ठेवावी लागते.उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल असेल , पावसासाठी वाऱ्यासाठी जॅकेट आणि थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर…याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते..तरीही जोरात पाऊस यायच्या आत त्यात उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून.थंडी वाजणार नाहीच तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच याची काही खात्री नाही.आपल्याला काय पाहिजे ते आपण करायचं निसर्गाला काय पाहिजे ते तो करून घेतो.ऊन, वारा, पाऊस, थंडी सह्याद्री प्रत्येक वेळी तुमची परीक्षा पाहत असतो.तिथे गेल्यावर कोण गरीब अन कोण श्रीमंत हा भेदभाव राहत नाही. छोट्याश्या सॅक मध्ये सगळं माववावं लागतं.

निसर्गाशी लढा देण्याची सगळी अवजारं म्हणता येईल का! अर्धी चड्डी, पूर्ण विजार , टॉर्च, मेणबत्ती, काड्यापेटी,औषध, पाण्याची बाटली हे सगळं पण टेन्ट मध्ये झोपताना कळतं…कमी वस्तू आणणाऱ्यांचं काय असतं ते…कसंही भागतंच…तर कुठे भली मोठी सॅक आणणाऱ्यांना काहीतरी कमी पडतंच!काही जणांना अतिउत्साहात..उर फुटेस्तोवर धावायचं असतं..तर एक चुकीचं पाऊलं अन खेळ खल्लास..काहींना स्वतःच स्वतःशी शर्यत लावावी..त्यात पण स्वतःच जिंकायचं असतं.

काहींना अजिबात घाई नसतेच..दमायच्या आत बसायचं असतं..सावली दिसेल तिथं पसरायचं असतं…दिसेल त्या तळ्यात डुंबायचं असतं.कड्या कपारीत सेल्फी घेत हिंडायचं असतं..कॅम्पफायरपाशी गाणी गात बसलं की कळतं! जे धावत आले ते खूप दमून गेलेत! त्यांच्या कडे फक्त आकडेवारीच आहे..आम्ही अमक्या वेळात पोचलो..इतकी पावलं टाकली..अमुक तमुक वेग होता..असं तसं सगळं कसं ऐटीत! पण त्यांच्याकडे आठवणी कुठं आहेत?
त्या झऱ्याच्या तुषारात कुठं चिंब झालेत? त्यांना केसांमध्ये वारं शिरल्यावर वाऱ्याचा वास केसांना लागला की केसाचा वाऱ्याला अशी कोडी कुठं पडली आहेत?शेकोटीची गाणी कुठं सुचताहेत?त्यांची तयारी चाललीय ती फक्त सकाळी उठून परत एक शर्यत जिंकायची..स्वतःच स्वतःशी.रेंगाळणारे अजून ही रेंगाळतयात.चंद्राची वाट बघत, शेकोटी विझवत…चंद्र गेल्यावर येणाऱ्या पुन्हा आकाशगंगेची वाट बघत..आकाशगंगा गेल्यावर येणाऱ्या सूर्याची वाट बघत..येणारी, न येणारी गाणी एकमेकांना ऐकवत..हसत-खिदळत रडत-सावरत आलेला, येणारा प्रत्येक क्षण जगत! म्हणून एक म्हणावसं वाटतं.

कधी हाच सह्याद्री तुम्ही १२ महिने फिरून बघा ,मग कळेल ट्रेकिंग काय चीज आहे.हाच सह्याद्री तुम्हाला आईच्या मायेप्रमाणे जवळ घेतो तर बापाप्रमाणे खडसावतो सुध्दा.आपण कितीही लवकर पोचलो तरी सूर्य उगवायचा तेव्हाच उगवतो.कितीही काळजी घेतली तरी प्रत्येक जण एकदा तरी घसरून आपटतोच.आपण कितीही बॅटरी फुल्ल असले तरी फोन डिस्चार्ज होतोच..जवळचं पाणी संपलं की डोंगर दऱ्यातलं कसलं वसलं पाणी प्यावं लागतंच..आणि या निसर्गाच्या भव्य-दिव्य, राकट-रौद्र,सुबक, हळुवार रुपापुढं नतमस्तक व्हावं लागतंच..आयुष्याचं तरी काय वेगळं असतं? आपण जास्त फिरलो नाही पण जेवढं पण फिरलोय तो प्रत्येक क्षण जगलोय.सौ बातो की एक बात ‘सह्याद्री ’कधीच नाराज करत नाही.

– संकेत फडके (The_Nationfirst) –

Leave a comment