खरी श्रीमंती

bhampak-banner

खरी श्रीमंती –

जीवनात स्वावलंबनासारखी खरी श्रीमंती नाही. आपल्या आयुष्यात येणारे वैभव आणि सौख्य त्याचा मनसोक्त उपभोग घ्यायचा असेल, तर माणसाने स्वावलंबी असणे गरजेचे आहे.

माणूस जेवढा सधन आणि प्रतिष्ठित होत जातो तेवढा तो परावलंबी होत जातो. सधन असल्यानंतर नोकर चाकर या गोष्टी आपोआप येतात. आपण सुखी होण्याच्या नादात आपली सर्व वैयक्तिक कामेसुद्धा नोकर चाकर यांच्यावर सोपवायला लागतो. यातून आपण परावलंबी होत चाललोय हे आपल्याला लवकर समजत नाही. आपले नोकर हे कितीही केले तरी पगारासाठी काम करत असतात.

आपण परोपकारी वृत्तीने त्यांना कितीही मदत केली, कितीही मोकळीक दिली, कितीही सवलती दिल्या आणि कितीही पगार दिला, तरी त्यांना तो मालक आपल्यावर उपकार करतोय, असे वाटत नाही. त्यांचा समज असा असतो की माझी त्यांना गरज आहे, म्हणूनच तो हे करतोय. यात त्याच्या मनाचा मोठेपणा काहीच नाही, कोण कोणासाठी फुकट काही करत नाही, ही त्या नोकराची भावना असते.

दुर्दैवाने आपण मालक म्हणून नव्हे, तर एक माणुसकी म्हणून त्याच्यावर जे प्रेम करत असतो किंवा त्याला मदत करत असतो, याची त्याला गंधवार्ताही नसते.

आपल्या सढळ हाताने केलेल्या मदतीचा गैर अर्थ निघू लागला की आपल्या परोपकारी वृत्तीचा गैरफायदा घेतला जातो. त्यानंतर त्या नोकराला असे वाटू लागते की माझ्याशिवाय या व्यक्तीचे काहीच चालत नाही. ज्यांना आपण पगार देतोय अशा व्यक्तीच्या मनात हा भाव तयार झाला की तिथून पुढे तो आपले काम मोजू लागतो आणि जो काम मोजत असतो. त्याचे कामात लक्ष रहात नाही आणि मालक समाधानी राहत नाही. हे सर्व का घडते⁉️ तर आपण आपल्या स्वावलंबनापासून दूर गेलेलो असतो.

परावलंबित्वाइतके जीवनात दुसरे कोणतेच दारिद्र्य नाही. माणसाने मरेपर्यंत स्वावलंबी रहावे, जो स्वावलंबी आहे, त्याचे कोणावाचून काहीही नडत/अडत नाही. ज्याचे कोणावाचून काहीही नडत नाही त्याच्यासारखा सुखी, समाधानी आणि श्रीमंत माणूस दुसरा कोणीच नाही, यासाठी फक्त स्वावलंबन असावे लागते.

आज जगात पाश्चिमात्य राष्ट्रे श्रीमंत आहेत, याचे कारण ती माणसे पूर्णपणे स्वावलंबी आहेत. आपल्या देशातून त्या देशात गेलेल्या माणसाना विचारून पहा, त्या ठिकाणी प्रत्येक माणूस हा स्वतःची कामे स्वतः करतो, मग तो कितीही श्रीमंत असू देत. स्वावलंबनासारखी खरी श्रीमंती त्या लोकांना माहीत आहे, म्हणूनच ते आजही जगावर राज्य करीत आहेत. आपल्या जीवनातील ही मालकी हक्काची जीवनशैली आपण बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वावलंबनाची किंमत कधीच कळणार नाही.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment