सत्य आणि शांती

bhampak-banner

सत्य आणि शांती –

आपले मन ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा स्वीकार करत नाही, त्यावेळी ते नाकारण्याचे आपल्यात जर धाडस नसेल, तर आपले मन आपल्याला नाटक करायला भाग पाडते. आपल्या जीवनातील कोणतेही ढोंग आणि नाटक, हे आपण स्वतःशी प्रामाणिक नसलो, तरच शक्य होते.सत्य आणि शांती.

जीवनातील काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे, आपल्या किंवा एखाद्याच्या तोट्याचे असेल, तर अशावेळी स्पष्ट न बोलणे शहाणपणाचे असते. एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर आपला तोटा होत असेल किंवा ते आपल्याला आवडत नसेल, तर आपण तिला टाळणेच पसंत करतो, मग ते कोणीही असो, परंतु आपण टाळतोय हे इतरांना समजू नये, असे आपल्याला वाटत असते कारण त्यामुळे आपल्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता असते. या भीतीपोटी आपण नाटक करायला प्रवृत्त होतो.

ढोंग किंवा नाटक केल्याने आपली त्यावेळची वेळ जरी मारून नेता आली, तरी आपले नाटक फार काळ टिकत नाही कारण ते आपल्याला टिकवता येत नाही. सत्य फार काळ लपून राहत नाही, आपले नाटक म्हणजे सत्य लपविण्याचा प्रकार असतो, त्यामुळे नाटकाचा सत्यावरील पापुद्रा कधीच दीर्घायुष्यी नसतो.

का कोणास ठाऊक⁉️ पण आपल्या जीवनातील सगळी नाटके आपण दुसऱ्याचा विचार करूनच करत असतो. समोरच्याला काय वाटेल⁉️ हा विचार मनात आला की आपण आपल्या स्वतःचा विचार करणे सोडून देतो.

आपल्या स्वतःचा विचार म्हणजे स्वार्थ नव्हे, तर आपल्या आत्मस्वरुपाचा विचार आहे. आपण ज्यावेळी आत जसे आहोत, तसेच बाहेर असतो त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने स्थिर असतो. आपल्या आतल्या आणि बाहेरच्या रूपात व स्वरूपात फरक पडला की आपण अस्थिर होतो. ही अस्थिरता आपल्या स्वास्थ्याला अस्वस्थ करते, वृत्तीला अशांत करते आणि शरीराला बेचैन करते.

अशा माणसाची शांती आणि विश्रांती दोन्ही गायब होते. आपण जसे आत आहोत, तसे बाहेर असणे आणि राहणे परमार्थिक पातळीवर शक्य होते आणि हे अध्यात्मिक पातळीवर आपल्या हिताचे असते, परंतु व्यावहारिक पातळीवर यात काही वेळा तोटा होतो, म्हणून संसारा मध्ये नाटक करावे लागते.

संसारात केलेली नाटके आर्थिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याची ठरत असतील, तर ती करावी लागतात आणि संसारातील हा शहाणपणा असतो, म्हणून सर्वानुमते संसारातील सुख कायम रहात नाही. यात फक्त ताप आणि त्रासच आहे. अगदी संत सुद्धा याला अपवाद नाहीत. विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात,

संसार तापे तापलो मी देवा l
करीता या सेवा कुटुंबाची ll
म्हणवोनि तुझे आठविले पाय l
येई वो माय पांडुरंगे ll

रूपाची आणि स्वरूपाची एकवाक्यता, ही जीवनातील सत्याशी झालेली ओळख असते, हेच अध्यात्म आहे आणि हाच परमार्थ आहे व हेच शांतीचे मूळ आहे.

शांती परते नाही सुख l येरं अवघेचि दुःख ll
म्हणवोनि शांती धरा l उतराल पैलतीरा ll

परमसत्याचा, शांतीचा आणि सुखाचा घनिष्ठ संबंध आहे. आपण या तिघांमध्ये जेवढे अंतर ठेवू, तेवढा काळ आपल्या जीवनातील अस्वस्थतेचा, अशांततेचा आणि पर्यायाने दुःखाचा असतो.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment