समज गैरसमज

By Team Bhampak Articles Laxman Asbe Lifestyle 2 Min Read
bhampak post

समज गैरसमज –

आपल्या सानिध्यात असणाऱ्या माणसांना आपण पूर्ण ओळखतो असा आपला समज असतो, खरं तर हा गैरसमजच असतो आणि तो अनुभवाने आपल्याला पटतो . आपण त्या माणसाला पूर्ण ओळखतो, असे आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी आपण त्या माणसाबद्दल एक साचा ठरविलेला असतो , त्यात त्याला बसवून आपणच मोजमाप लावलेले असते . आपण ठरविलेल्या चौकटीबाहेर ज्यावेळी तो येतो आणि वेगळेच गुण दाखवायला लागतो, त्यावेळी आपल्याला तो आश्चर्ययाचा धक्काच असतो . तो धक्का सुखद असला तर आपल्या अपेक्षा वाढतात आणि तो जर आपल्याला त्रासदायक, दुःखद असला तर आपल्याला वेडच लागायचे बाकी राहते इतका आपला थयथयाट होतो .

हे आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाचे आहे आणि असे धक्के आपल्या जवळच्याच माणसाकडून मिळतात. ज्याला आपण खूप जवळचा मानत असतो त्याचा धक्का खूप जोरदार असतो . या जवळच्या माणसाच्या धक्क्याने आपण जवळपास कोलमडूनच जातो आणि पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करताना मी याच्यासाठी काय काय केले ? आणि हा काय त्याची परतफेड करतोय ? असेच काहीतरी बरळत असतो . हे सर्व का घडते तर आपण त्याला पूर्ण ओळखतोय हा गैरसमज करून घेतलेला असतो.

आपण स्वतःलासुध्दा पूर्ण ओळखलेले नसते तर दुसऱ्याला काय ओळखणार ? स्वतःला पूर्ण ओळखणे म्हणजे आत्मज्ञानी होणे. आपण आत्मज्ञानी असाल तर दुसऱ्याला ओळखण्याच्या भानगडीतच पडणार नाही कारण असा माणूस सत्चिदानंद अवस्थेत स्थिर झालेला असतो , त्याला कोणताच धक्का हलवू शकत नाही, पाडण्याचे तर विसरूनच जावा .

आपण सामान्य माणसे आहोत , त्यामुळे असे धक्के आपल्याला नित्याचेच आहेत . गरज म्हणून आपण एखाद्याला जवळ करतो , मग ती त्याची असते किंवा आपली . गरज असतानाची माणसे आणि गरज संपल्यानंतरची माणसे भिन्न असतात म्हणून कोणाच्या व्यक्तीमत्वाची चौकट तयार करू नका आणि बनवायचीच असेल चौकट तर ती इतकी विशाल बनवा की त्यात कोणताही बदल सामावून घेण्याची क्षमता असेल. उपकाराची जाण नसलेली माणसे सर्वात नीच असतात .

दुर्दैवाने ही आपल्या वाट्याला आली की मनाच्या सगळ्या चौकटी उध्वस्त करून टाकतात . या नीच लोकांच्या वाक्याबाहेरची आपल्या मनाची विशालता असेल तरच या मनस्तापापासून सुटका होते अन्यथा आपण केलेला परोपकारही आपल्याला छळल्याशिवाय रहात नाही.

डॉ . आसबे ल.म.

Leave a comment