समज | Understanding –
दुसऱ्याला समजावणे सोपे असते, परंतु दुसऱ्याला समजून घेणे खूप अवघड असते. जोपर्यंत आपण समजवायचे थांबत नाही तोपर्यंत आपण समजून घेण्याच्या भूमिकेत येतच नाही. आपल्याकडे जे काही आहे, ते सर्व दुसऱ्याला दाखवण्यात आणि पटवून देण्यात आपण नेहमीच अग्रेसर असतो. खरेतर आपल्याकडे चांगले आणि वाईट दोन्ही समाजाकडून गुप्त रहात नाही.समज जसे चांगल्याची दखल समाज घेतो, तसे वाईटाचा समाचारही समाज घेत असतो, तरीही पटवून देणे, व्यक्त करणे, समजावणे आपले थांबत नाही, हीसुद्धा आपल्यातील एक विकृतीच असते.
आपण दुसऱ्याला समजवण्याचा भूमिकेत असतो, त्यावेळी आपण आपल्या कानाची दारे मनाने बंद केलेली असतात, त्यामुळे आपली अनुभव आणि ज्ञान मिळवण्याची संधी आपण स्वतः होऊन बंद केलेली असते. दुसऱ्याला समजावणारा माणूस स्वतःला शहाणा समजत असतो. जो स्वतःला शहाणा समजतो, त्याला ज्ञानाची गरज भासत नाही, त्यामुळे असा अर्धवट शहाणा माणूस नेहमी अर्धवटच राहतो.
आपण जेवढे दुसऱ्याचे ऐकून घेतो, तेवढे आपले ज्ञान वाढत असते. जोपर्यंत आपण दुसऱ्याचे ऐकत नाही, तोपर्यंत आपण त्याला समजून घेऊ शकत नाही. यात वयाचा ज्येष्ठतेचा, श्रेष्ठतेचा आडपडदा कधीच नसावा.
दुसऱ्याचे ऐकून घेण्याने माणसाचे ज्ञान आपोआप वाढत जाते आणि असा ज्ञानसंपन्न माणूस काहीतरी बोलावा, त्याचा प्रत्येक शब्द आपल्या फायद्याचा आणि उपयोगाचा आहे, अशी समाजाची धारणा बनते. हा समजून घेण्यातला पहिला फायदा आहे. समजून घेण्याचा दुसरा फायदा, आपण ज्याला ऐकून घेतोय, समजून घेतोय, तो माणूस आपला होतो.
आपल्याला कोणीतरी समजून आणि ऐकून घेणारे आहे, ही भावना माणसाला खऱ्याअर्थाने सनाथ बनवत असते. आपल्याला कोणीच समजून घेत नाही, आपले कोणीही ऐकत नाही, ही भावना माणसाजवळ सर्व काही असून, त्याला अनाथ बनवत असते.
ऐकून आणि समजून घेण्याचा तिसरा फायदा म्हणजे आपल्या मनाचा थांगपत्ता समोरच्याला लागत नाही. ज्याचे मन समोरच्याला समजत नाही किंवा तो ओळखू देत नाही, तो सर्वात धूर्त माणूस असतो. अशा धूर्त माणसाला कोणीही फसवू शकत नाही, खरेतर त्याला हरवणे केवळ अशक्य असते. आपल्या मनातील भाव चेहऱ्यावर, देहबोलीवर आणि मुखातून आपोआप व्यक्त होत असतात, अशी माणसे सामान्य असतात.
ज्याच्या मनातील भाव गुप्त राहतो, कोणत्याही अवस्थेत चेहरा निर्विकार, देह स्वस्थ आणि मन शांत राहते किंवा ज्याला हे साध्य होते, तो असामान्य माणूस असतो. याच्या भविष्यातील कृतीचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही.
मनात आलेले समोरच्याला पटवण्यात आणि ऐकवण्यात आपण पटाईत होणे, याला आपण आपली हुशारी समजत असतो, वास्तविक ही एक समाजाच्या दृष्टीने विकृती असते आणि आपला मूर्खपणा असतो. दुसऱ्याचे ऐकून आणि समजून घेण्यासाठी स्वतःला खूप आवरावे लागते.
ज्याचा स्वतःवर स्वतःचा ताबा आहे, त्यालाच हे शक्य होते. मनाने आपल्या देहाचा आणि सर्व इंद्रियाचा ताबा घेणे, हा सर्वांचा अनुभव आहे, परंतु आपल्या मनावर आणि परिणामी सर्व इंद्रियावर आपला ताबा असणे, हा अनुभव असामान्य आहे आणि त्यासाठी साधना गरजेचे आहे. आपण मरेपर्यंत खरेतर स्वतःलाही स्वतः नीट समजू शकलेलो नसतो कारण आपण स्वतःलाच स्वतः ओळखलेले नसते. ज्याने स्वतःलाच समजून घेतलेले नाही, तो दुसऱ्याला काय समजून घेणार ? समजून घेणे हे दिव्य लक्षण आहे, ज्याच्या कडे ते आहे त्याचा प्रभाव प्रगट झाल्याशिवाय राहत नाही.
समज समज कर समज को समझो l
समज समजनाही एक समज है l
डॉ. आसबे ल.म.