अप्रिय नवीन प्रजातीच्या मुंग्यांनो

bhampak-banner

अप्रिय नवीन प्रजातीच्या मुंग्यांनो –

प्रिय… नाही नाही… अप्रिय नवीन प्रजातीच्या मुंग्यांनो,

नमस्कार, —  घालायचा नव्हताच मनात; पण ती पत्रलेखनाची रीत आहे, म्हणून लिहिलंय.

तुमच्याशी संवाद साधण्याची माझी बिलकुल इच्छा नाही, पण आईने संगितले आहे, जितके होईल तितके सामोपचाराने वागायचे. त्यातच आपले मोठेपण आहे. म्हणून फक्त आईला दिलेल्या शब्दाखातीर तुमच्याशी संवाद साधतोय. त्याला प्रतिवाद करून संवाद चालू ठेवायचा की वाद घालून विवाद वाढवायचा हे मात्र सर्वस्वी तुमच्यावर आहे. जाऊ द्या, मी मूळ मुद्द्यालाच येतो.

काय गं भवान्यांनो, तुम्हाला काही लाज शरम? खरे तर तुमच्याकडून तशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे म्हणा… पण तुमच्याच दोन प्रजातींना मी लहानपणापासून बघत आलोय. एक म्हणजे काळी मुंगी. जिला आम्ही देवाची मुंगी म्हणायचो. कारण ती अंगावर चढली तरी फक्त गुदगुल्या व्हायच्या. ती चावत नव्हती कधी. दुसरी म्हणजे लाल मुंगी. जी सैतानाची मुंगी होती. अगदी कडकडून चावायची आणि मग फटका खाऊन मरून जायची. या दोन्ही प्रजाती एका रेषेत चालायच्या. त्यांचे पाऊल सहसा वाकडे पडत नव्हते. परंतु तुम्ही? ना तुमचे चालणे एका रेषेत, ना तुमच्या गतीत सातत्य. कुठेही कशाही हिंडतात, बऱ्हाण्यासारख्या. एखाद्या अन्नपदार्थाला तुम्ही लक्ष करतात त्यावेळी समजण्यासारखे आहे; पण laptop? ती काय खायची गोष्ट आहे? त्यालाही लागतात तुम्ही? बरे तेही एकवेळ मी समजून घेईन; पण चष्मा… फिरण्याची जागा आहे का ती? तोही घातलेला असताना? बरे नुसते फिरलात तर हरकत नाही… पण त्या लाल मुंग्यांसारखे चावण्याची काय गरज? चावक्या कुठल्या…

मला एक गोष्ट समजत नाही, तुम्हाला लोकांना चावण्यात असा काय आनंद मिळतो? नाही म्हणजे मी लहान असताना खूप लाल मुंग्यांना विनाकारण रिफील जाळून त्याचे वितळलेले प्लास्टिक त्यांच्यावर टाकून मारून टाकायचो. पण त्यावेळी मला कळत नव्हते. लहान होतो मी. मोठे झाल्यावर सुधारलो. पण तुम्ही तर लहान नाही आहात ना? आकाराने नाही, मी विचाराने म्हणतोय. आणि तसेही तो माझ्यातला आणि लाल मुंग्यांमधील इश्यू आहे. आमचे आम्ही बघून घेऊ. तुम्हाला त्यांचा बदला घेण्याची काय गरज? आधीच सांगून ठेवतो. तुम्ही चावल्या तर नकळतपणे माझ्याकडून तुमच्यावर हात टाकला जाईल आणि याचा परिणाम तुम्ही कायमच्या स्वर्गवासी व्हाल. त्यावेळी म्हणू नका, मी तुम्हाला याची पूर्वसूचना दिली नव्हती म्हणून.

बघा, विचार करा… मी तुमच्या वागण्याची घोर निंदा करतोय. यापुढे तुम्हाला माझ्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येईल. मग माराल बोंबा माझ्या नावाने, ‘मिलिंद आमच्याशी तुसड्यासारखे वागतो, आमचा पदोपदी अपमान करतो’ म्हणून. पण आधीच सांगून ठेवतोय. तुम्ही तुमचे वर्तन सुधारले नाही तर मी रस्त्यारस्त्यात तुमच्या निंदानालस्तीचे फलक लावेन… अर्थात स्वतःच्याच पैशाने. आणि त्यानेही फरक पडला नाही तर सरळ पेस्ट कंट्रोल करून घेऊन. साला तुम्ही इतक्या निर्लज्य आहात की मी मुंग्यांचा खडू आणला तर तुम्ही तोही खाऊन टाकला? काहीतरी शरम? जनाची नाही… मनाची तरी? हाड, तुमच्याशी बोलणेच व्यर्थ आहे.

तुमचा तर बिलकुलच नाही…

वैतागलेला सहिष्णू नाशिककर, मिलिंद जोशी…

Leave a comment