मला जे वाटले ते…
21 व्या आधुनिक युगात वावरणारे आपण. इथे दिवसादिवसाला तंत्रज्ञान बदलत आहे. विज्ञानात प्रगती होत आहे. मानवी आयुष्य अधिकाधिक विकसित व सुखकर कसे होईल याचा सतत विचार करणारे आपण. आपले विचारही आधुनिक आहेत असे आपणच धरून चालतो. पण बऱ्याच जणांना हा प्रश्न अगदी मनापासून विचारावासा वाटतो. खरंच आपण असे आधुनिक विचार करतो का? का कोणा मानवी विकासाच्याच आड येतो आपण?
आपल्या राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीला मनासारखे आयुष्य जगण्याचा म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पण हे व्यक्ती स्वातंत्र्य आपण त्या व्यक्तीला अनुभवू देतो का? का सतत त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या मार्गाने सामाजिक दडपणाखाली ठेवतो? तरुण वयातही एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघेच जर कॉफीला गेले, फिरायला गेले तर आजही समाजाच्या नजरा ह्या वेगळाच अर्थ घेतात. त्या दोघांमध्ये कधी त्या नात्यापलीकडे मित्रत्वाचे नातं नसूच शकतं का? म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, ते एका अर्थी येथे जाणवतेच. समाजाच्या नजरा ह्या ह्या आजही दुसऱ्यांचे काय चालले आहे या वरच आहेत. पण स्वतःची मुले काय करतात यावर ही त्यांनी जरूर विचार करायला हवा ना.
चार मित्र-मैत्रिणी एकत्र जमले की त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते. व्यक्ती विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडते. सभोवताली असलेल्या शिक्षणाच्या संधी, व्यवसायाच्या संधी, अनेक क्षेत्रात होत असलेली प्रगती, चालू असलेल्या घटना यावरचे चर्चासत्र हे चालूच असते. या साऱ्यांमुळे आत्मविश्वास वाढतो. समाजात कसे वावरायचे ते कळते. सामाजिक जाणिवांचे भान राहते. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे आहोत याची जाणीव होते. यामुळे किमान जगाबरोबर चालायचे पाठबळ मिळते. यासाठी अजून एक महत्वाचे असते ते कुटुंबाचे सहाय्य. मुलांवरील जर पालकांनी थोडी निर्बंधे कमी केली तर याचा मुलांच्या प्रगतीसाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. स्वतःची ध्येय गाठण्यासाठीची त्यांची धडपड ही पालकांनी देखील विचारात घेतली पाहिजे. त्यांना प्रगती मध्ये अडथळा येण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे समर्थन केले पाहिजे. दिवसभराचे वेळापत्रक ठरवून एका साच्यात ठेवण्यापेक्षा त्यांची privacy जपली गेली जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. चुकत असतील तर नक्की प्रेमाने, न चिडता, न रागावता समजवावे. त्यांना आपल्या दबावाखाली ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते जोडावे. तरच त्यांच्या पालकतत्वाचा ही मुले नक्कीच आदर करतील यात शंका नाही.
मला जे वाटले ते
हे झालं मुलांच्या बाबतीत. यातीलच काही मुली लग्न करून सासरी जातात. आई-वडिलांची मुलगी न राहता,नवऱ्याची बायको होते आणि सासू सासऱ्यांची सून. सासरी असलेल्या चालीरीती, परंपरा तिला आत्मसात कराव्या लागतात. सुदैवाने परीस्थिती बदलत चालली आहे. लग्नानंतरसुद्धा मुलींना शिक्षणासाठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बरेचश्या घरातून पाठबळ मिळत आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आल्यागेल्याचं पाहुणचार, चूल आणि मूल एवढंच काय ते त्यांचं आयुष्य. नाहीतर याचा मध्य काढायचाच झाला तर बाहेर नोकरीकरून चार पैसे कमवायचे शिवाय आल्यावर घरातली कामं सुद्धा करायची. मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम कारणारी ती स्त्री, घरी आल्यावरपण तिनेच सगळी कामं करायची ही कुठली अपेक्षा! खरे तर, आपल्याला जे वाटेल, जे आपल्या सद्सदविवेकबुद्धीला पटेल ते करणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. मग एखाद्याला वाटेल की आपण इकडे फिरावे, या व्यक्तीला भेटावे-बोलावे, स्वतः पैसे कमवावेत आणि स्वतःला हवे तसे खर्च करावेत यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही. हे झाले कौटुंबिक पातळीवर. सामाजिक स्थरावर बघायचे झाले तर
विषयाशीच निगडित एक whatsappवर आलेला संदेश येथे नक्कीच नमूद करायला आवडेल. एकीकडे 377 सारखे कलम येतात. पण त्यात सुद्धा तू आपल्याच जातीतील मुलाशी/मुलीशीच लग्न कर, असा संदेश दिला जातो. काय म्हणावं याला!
हे धर्म-जाती खरे तर माणसानेच तयार केले आहेत. पण तरीही आजकाल व्यक्ती स्वतंत्र्यानुसार आपल्याला हवा तो धर्म-जात निवडण्याची मुभा आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट मूळची अमेरिकन वंशाची तिने सुद्धा हिंदू धर्म स्वीकारला. यातून फक्त एवढेच म्हणायचे आहे, ज्याला जो धर्म आवडतो त्याला तो धर्म स्वीकारायचा पूर्ण अधिकार आहे.
मला जे वाटले ते
पण सध्या याच धर्म आणि जाती वादावरून आपल्या भारतीयांना मध्येच भांडण , तिरस्कार चालू आहेत. यातून समाजात पुन्हा विविध गट पडण्याची शक्यता दिसत आहे. जेथे आपण राष्ट्रीय प्रतिज्ञेमध्ये ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे म्हणतो. मग तिथेच जाती भेद का केला जातो? बऱ्याच जातींच्या संघटना तयार झालेल्या आहेत. ते लोक फक्त त्यांच्या जातीतील लोकांना प्रोत्साहन देत आहेत, तेथेच त्यांचे व्यवसाय आहेत, त्यांची वरवधू सूचक मंडळे ही त्यातच आहेत. हे सारे जात-समाज विकासासाठी आहे, पण मग संपूर्ण मनुष्य जातीचा विकास व्हावा असा हेतू नसतो का त्यांचा?
इतिहासातील घटनांतून शिकून पुढे जाण्यापेक्षा आजही आपण त्या घटना चघळत बसतोय. इतिहासातून बाहेर येऊन वर्तमानात जगण्यात आयुष्याची खरी मजा आहे. इतिहासात लक्ष घालण्यापेक्षा आपला इतिहास कसा घडेल याकडे लक्ष ठेवले तर नक्कीच प्रगतीच्या दिशेने पाऊले पडतील. आपल्या झालेल्या चुका आणि मनाचा मोठेपणा दाखवून केलेलं माफ यामध्येच आपले हित आहे. याचे एक उदाहरण नक्की द्यावेसे वाटते. ते म्हणजे दुसरे महायुद्ध. अमेरिकाने जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर झालेले परमाणु हल्ले. यामुळे जपानचे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय त्यांच्या पुढील काही पिढ्या या अपंगत्व घेऊनच जन्माला आल्या. पण तरी उध्वस्त झालेल्या जपान राखेतून भरारी घेणाऱ्या जटायू पक्षाप्रमाणे आकाशात उंचच उंच झेप घेत आहे. कुठल्याही प्रकारचा बदला न घेता, भांडण-तंटे यांपासून लांब राहून त्यांनी स्वतःच्या प्रगतिकडे लक्ष दिले. केवळ इतिहासात न रमता भविष्याची भव्य स्वप्ने उरी बाळगून प्रगतशील देशांपैकी एक म्हणजे जपान. आपणही यातून काहीतरी शिकायला हवे, केवळ भूतकाळात झालेल्या जातीवादातुन बाहेर येऊन ‘माणुसकी’ हेच तत्व जपायला हवं. भारतीय म्हणून एक व्हायला हवं.
वर्तमानपात्रातील एक बातमी अजूनही आठवते. शासकीय कामकाजात नोंदणी फॉर्म भरताना जात विचारली असता एका भारतीयाने ‘भारतीय’ असे नमूद केले. त्यांचाच आदर्श घेऊन जर सारे पुढे आले तर एक दिवस हा जातीवाद मुळापासून नष्ट होईल यात काही शंकाच नाही.
थोडक्यातच काय… व्यक्ती स्वातंत्र्य हे सामाजिक आणि कौटुंबिक अश्या दोन्ही घटकांवर अवलंबून आहे आणि या घटकांमुळे व्यक्तीच्या विकासावर अनुकूल परिणाम झाला पाहिजे. कारण व्यक्ती विकास म्हणजेच देशाचा विकास हे लक्ष्यात घेतले पाहिजे. व्यक्तीची प्रगती तरच देशाची प्रगती!