जिभेवरील शब्द –
एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून बांगड्या विकायचे. त्यांच्याकडं एक मोठी बांबूची टोपली होती. टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या. हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला. आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली.
बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले. यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचे राणीशी चाललेले संभाषण. पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे,” राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडे बाजूने चाल.”
कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे,” अग राणी, थोडे लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत.”
राणी कधी वेगाने जाऊ लागली, जे फारच क्वचित व्हायचे तर म्हणायचे,” काय बेटी, आज काय हरीण झालीस का? जरा जपून पाय टाक. बांगड्या फुटतील ना!” ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला कळत असेल का याचे आश्चर्य सर्वांना वाटायचे.
एक दिवस एका आजीने त्यांना असे बोलत चालताना पाहिले आणि विचारले, ” बाकीचे जे लोक गाढव पाळतात, ते हातात काठी ठेवतात, अधूनमधून गाढवाला मारतात, शिव्या देतात ओरडतात हे आम्ही पाहिले आहे पण गाढवीला राणी बेटी म्हणणारे, इतके गोड बोलणारे तुम्ही पहिलेच दिसता. असे कसे काय?”
“आजी, तुम्हाला सांगू का? माझा व्यवसाय आहे बांगड्या विकण्याचा आणि भरण्याचा. माझा संबंध येतो मुली आणि बायकांशी. मी जर राणीला गाढवी म्हणायला लागलो, शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडात तेच शब्द बसतील. एकदा कुठलाही शब्द आपल्या जिभेवर बसला तर अनवधानाने तो कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. मग बांगड्या विकताना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील. मी चुकून असा शब्द गावातल्या मुलींशी, सूनांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील? म्हणून मी माझ्या तोंडातून कधीच चुकीचा शब्द येवू देत नाही. माझ्या जिभेला अशा शब्दांची सवयच लागू देत नाही.”
ही गोष्ट फक्त धंद्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, समाजात वावरण्यासाठी, संघटनेमधील सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी, गोडवा निर्माण करण्यासाठी अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील व्यक्तिन्मध्ये ममता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे.